साधी पिस्तूल देखील नसलेला अमर नाईक थेट गवळी गॅंगला चॅलेंज करू लागला होता..

गुन्हेगारी विश्वावर चित्रपट बनवणे हे काय आपल्याला नवीन नाही. मुंबई सागा नावाचा संजय गुप्ता दिग्दर्शित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला…जसा हा चित्रपट लोकांनी पाहिला आणि लोकांनी गुगल वर अमरत्या राव बद्दल सर्च करायला सुरवात केली. अमरत्या राव कोण आहे ? त्याची काय गोष्ट आहे ?

पण जर तुम्ही गुगल वर सर्च केलं तर अमरत्या राव नावाचा कुणी गुंडचं नाहीये. हे एक काल्पनिक नाव आहे. मुंबई सागा हा चित्रपट त्या गुन्हेगाराचा आहे ज्याने १९९४ साली एक भयंकर कांड घडवून आणलं होतं. 

ज्यावेळी मुंबई व्यावसायिक गोष्टीत पुढे जात होती तेव्हा मुंबईत बऱ्याच कापड गिरण्या होत्या, त्यातली सगळ्यात मोठी मिल म्हणून गणली जाणारी खटाव मिल. यादरम्यान या मिलचा मालक सुनीत खटाव करोड रुपयात जिची किंमत होती ती  मिल विकण्याच्या मार्गावर होता , कॉर्पोरेट सेक्टरला भायखळ्यातील ही मिल विकून बोरिवलीत  स्वस्त पैशात मिळणारी मोठी जागा बघून तिकडे मिल तो  शिफ्ट करणार होता.

साहजिकपणे कामगार संघटनांचा याला विरोध होता, मिल मालकाच्या विरुद्ध आंदोलने सुरु झाली. वाढती आंदोलने बघून सुनीत खटावने त्याकाळचा सगळ्यात मोठा गँगस्टर असलेल्या अरुण गवळीची मदत घेतली.

अरुण गवळी म्हणजे मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातील सर्वात मोठं नाव. त्यांना डॅडी म्हणून ओळखलं जायचं आणि दगडी चाळ हा गवळींचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. गवळीच्या दहशतीचा नावलौकिक ऐकून सुनील खटाव त्यांना भेटायला आला. त्याने आपला प्लॅन सांगितला आणि म्हणाला,

” मला माझी ही मिल मोकळी करून हवी आहे आणि सौद्यातील १५ टक्के रक्कम तुझी असेल. “

त्यादरम्यान गवळी टोळीच्या विरुद्ध अजून एक टोळी कार्यरत होती ती म्हणजे अमर नाईकची टोळी.

सुरवातीच्या काळात  गवळी आणि नाईक टोळीमध्ये शीतयुद्ध होतं. अमर नाईक त्याकाळी चाकूने भांडण करत असे. त्याच नाव अजून मोठं झालं नव्हतं पण त्याने देखील आपली गॅंग बनवून वजन निर्माण करण्यास सुरवात केली होती. गवळी पेक्षा आपलं नाव मोठं व्हावं यासाठी तो संधी शोधतच होता.

जेव्हा नाईक टोळीला कळलं की गवळीने खटाव मिलच्या मालकासोबत गुप्तपणे हातमिळवणी केली आहे आता त्यांची टोळी आपल्या टोळीला अधिकच वरचढ ठरेल आणि  ताकदवान होईल तेव्हा नाईक टोळीने निर्धार केला की ते ही डील पूर्ण होऊच देणार नाही.

आणि तेव्हा ठरवला गेला सुनीत खटाव यांचा मर्डर प्लान.

सुनीत खटाव हा तेव्हा कायम बुलेटप्रूफ मर्सिडीज कार मधून फिरायचा , कारण त्याला माहित होतं की करोडोंचा व्यवहार आहे आणि जीवाला धोकाही तितकाच आहे.  दररोज सवयीप्रमाणे सुनीत खटाव मिलच्या कामाकरिता निघाला.

सकाळच्या ११:५५ ला महालक्ष्मी रेसकोर्सच्या सिग्नलला सुनीत खटावची पांढरीशुभ्र मर्सिडीज येउन थांबली. त्याचवेळी मागून दोन बाईकवर चार गँगस्टर त्याचा पाठलाग करत तिथे येऊन धडकले. आल्याबरोबर त्यांनी सुनितच्या पांढऱ्याशुभ्र मर्सिडीजवर हातोड्याने सलग वार करून काच तोडण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या हल्ल्याने सुनीत खटाव पुरता गोंधळून गेला. अचानक खळकन आवाज होऊन त्या मर्सिडीजची काच फुटली त्या फुटलेल्या काचेतून एक बंदुकधारी हात आत गेला आणि आत बसलेल्या सुनीत खटावच्या शरीरावर गोळ्यांचा पाऊस पडून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुनीत खटाव, काचेचे चुरा झालेले रक्ताने माखलेले तुकडे ह्या सगळ्या भेसूर दृश्याने तिथे कुणीही थांबलं नाही . त्यानंतर ते बाईकस्वार  तिथून पळून गेले.

सुनीत खटावच्या या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येचा सगळ्याच क्षेत्रांनी धसका घेतला आणि सगळीकडे भीतीचं सावट पसरलं गेलं. या झालेल्या हत्याकांडाने अमर नाईक हे नाव मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात वर आलं.

सुनीत खटावच्या हत्येने खटाव मिलची डील रखडली गेली त्यामुळे गवळी टोळीच्या संतापाचा उद्रेक झाला.

इथून गवळी-नाईक टोळीत वादाची ठिणगी पेटली.  याला प्रत्युत्तर म्हणून गवळी टोळीने अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईकवर गोळीबार करून हल्ला केला त्याला जखमी केलं आणि कायमचचं व्हीलचेअरवर बसवलं. मुंबईतली सगळी हफ्ता वसुली,दंगे हे अमर नाईकच्या सांगण्यावरून होऊ लागले. असंही म्हटलं जातं की अमर नाईकच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरेंचा हात होता म्हणून तो इतकी मोठी मजल मारू शकला.

अमर नाईकची दहशत इतकी होती की आधी ज्या अमर नाईककडे साधी बंदूक नव्हती त्या अमर नाईकसाठी परदेशातून बंदूक येऊ लागली.

१९९४ ते ९६ च्या काळात नाईक टोळीने भरपूर नाव कमावलं , भरपूर धाक लोकांमध्ये निर्माण केला. गवळी टोळीला डोकं वर काढू दिलं नाही. पण पुढे दिवसा बदलले, अमर नाईकच्या डोक्यावरून बाळासाहेबांचा हात निघाला आणि पोलिसांना दिसेल तिथे  एन्काउंटर करण्याची मुभा देण्यात आली.  पोलिसांच्या विशेष एन्काउंटर पथकाची नेमणूक करण्यात आली आणि काही दिवसातच बातमी येऊन धडकली की चकमकीत अमर नाईक मारला गेला.

मुंबई पोलीसांच बरच कौतुक झालं. अमर नाईकच्या जाण्याने गवळी टोळीला चांगलाच फायदा झाला. गवळी-नाईक टोळी युद्ध संपलं पण कमिशनच्या फायद्यासाठी हे टोळीयुद्ध उभं राहिलं याचीही बरीच चर्चा गुन्हेगारी विश्वात झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.