बंगाली जादूसाठी वापरली जाणारी काळी हळद माझा दोस्त कोटभर रुपयाला घेणाराय, काय करु ?

आम्ही लोकांना म्हणतो प्रश्न विचारा, मग लोकांनी आमचा पाक घरचा वैद्य करुन टाकल्यासारखी फिलिंग येत्या. म्हणजे कस भिडू लोक अस्सल प्रश्न विचारतात. विषय सुचवतात. आम्हाला भारी वाटतं. त्यानंतर बोलभिडू कार्यकर्ते एक एक करुन विषय काढतात लेख लिहतात.

असाच एक प्रश्न चार आठ दिवसापुर्वी आलेला. 

प्रश्न होता काळी हळद आणि काळ्या हळदीच्या काळ्या जादुबद्दल. ठिकाय बघून म्हणून आम्ही विषयांतर करायचा प्रयत्न केला तोच पुन्हा भिडूचा मॅसेज आला. लय ताकदवान असते काळी हळद. माझ्या दोस्ताला एकजण विकणाराय?

कोटीत डिल होईल, उगी गंडायला नको दोस्त तुम्ही जरा विस्कटून सांगा की. 

आत्ता कसं इथ आठ रुपयेचा चहा घेतला तरी दोन रुपये मागून घेणारी आमची गॅंग. आणि कोणतर आम्हाला कोटभर रुपयाच्या डिलबद्दल सांगतय म्हणल्यावर मनाला बरं वाटलं. पोराचं नुकसान होवू नये म्हणून म्हणलं चला काळ्या हळदीवर आज लिहून टाकावं. 

पहिली गोष्ट काळी हळद, एकवीस नख्याचं कासव, बोलके घुबड, इस्ट इंडिया कंपनीचा आरसा, इंदिरा गांधीचा कॉईन, पाच रुपयची नोट, विज पडलेलं भांड वगैरे वगैरे गोष्टी सांगून लुटालुटीचा धंदा चालतो. मुळात अशी डिल कधीच कोणाची होत नाही. झालीच तर आपण आठ दहा हजाराला गंडतो. कारण पुड्या सोडणाऱ्याला माहिती असतं, हा काय कोटीत व्यवहार करणारा नाही. कोटीत व्यवहार करणारे अशा गोष्टीत इंटरेस्ट पण घेत नसतात. 

तर अशाच सगळ्या प्रकारातली काळी हळद, 

पहिला प्रश्न काळी हळद हा प्रकार नक्की असतो का? 

तर भिडूनों काळी हळद असते. हळदीच्या आठ-दहा प्रजाती आहेत. त्यात जांभळी हळद, पांढरी हळद, पांढरी हळद असे वेगवेगळे प्रकार असतात. काळी हळद हि त्यापैकीच एक. काळी हळद उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिरचा काही भाग याच्यासह भारतातल्या डोंगराळ भागात मिळते. जिथे पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे अशा भागात काळी हळद येते. काळी हळद दुर्मिळ असण्याच एकमेव कारण म्हणजे हि हळद जंगली आहे. त्याची शेती केली जात नाही. त्यामुळे पोत्याने उत्पादन काढण्यासारखा पर्याय इथे नसतो. साहजिक त्यामुळे काळी हळद दुर्मिळ गणली जाते. पण कसय म्हणावं तितकी दुर्मिळ देखील हि वनस्पती नाही. जादुटोण्यासारख्या गोष्टी काळ्या हळदीसोबत जोडल्या गेल्यावर ती कुंडीत देखील घेतली जावू लागली. 

काळ्या हळदीबद्दल नेमकी काय चर्चा चालते ? 

काळी हळद हि जंगलात मिळते. प्रत्येक काळ्या हळदीचा प्रभाव आपणाला हवा तितकाच असेल अस नसतं. एखाद्याच झाडात हा प्रभाव असतो. काळ्या हळदीच झाड कस ओळखायच तर त्याची पाने कर्दळीसारखी असतात. मध्यभागी एक काळी रेष असते. 

काळ्या हळदीच झाड दिसलं की काही उपाय करायचे असतात. जस की त्या झाडावर प्रभाव आहे का नाही ते पहायला बंद केलेल कुलूप जवळ न्यायचं कुलूप आपोआप ओपन होतं. किंवा कापूर जवळ घेवून जायचं कापूर आपोआप उडून जातो. काळ्या हळदीच्या रोपाजवळ एक छोटी सुई ठेवायची. काही वेळातच सुईचं टोक वाकतं. किंवा काळ्या हळदीच्या जवळ बॅटरी घेवून जायचं बॅटरी आपोआप बंद होते वगैरे वगैरे. 

पण या सर्वात गुढ निर्माण करणारी गोष्ट सांगितली जाते ती सापाची. प्रभाव असणाऱ्या काळ्या हळदीच्या शेजारी झाडाचं संरक्षण करण्यासाठी नेहमीच एक नाग असतो. (आपल्याकडे देव देवळ, वाड्यातलं गुप्तधन वगैरे वगैरेचं संरक्षण करण्याची जबाबदारी कायम नागांनाच का दिली जाते ते कळत नाही) असो. तर काय करायचं काळी हळद असते तिथे नाग असतो. अस सांगतात की झाडाच्या जवळ गेलात आणि नाग जवळ येवू लागला तर लांब व्हायचं. त्या झाडाची पूजा करायची. त्याची पण प्रोसेस सांगणारे लोक आहेत. आणि नंतर ते झाड घेवून घरी जायचं. 

आत्ता पुढचा मुद्दा या काळ्या हळदीच काय करायचं ? 

काळ्या हळदीने वशीकरण करता येते. तोंडात काळ्या हळदीचा तुकडा असेल तर तुम्ही जे काहीही बोलाल त्याला पुढचा व्यक्ती हो म्हणतो. अशी काळी हळद घरात असेल तर घरात धनदौलत येते. काळ्या हळदीचा तुकडा तुमच्या जवळ असेल तर केलेली करणीबाधा त्याच्यावरच उलटते. काळी हळद तुम्हाला कधीच आजारी पडून देत नाही. काळी हळद घेवून काही तंत्रमंत्र देखील सांगितले जातात. त्याच मुळ शोधल्यानंतर उत्तर येत बंगाली जादूत. बंगालच्या काळ्या जादूत काळी हळद वापरली जाते. त्यामुळे या हळदीच महत्व जादू करणाऱ्यांमध्ये अधिकच असतं. 

आत्ता मुळ मुद्दा हे सगळं येत कुठून ? 

मुळात तुम्ही कोणतिही गोष्ट घ्या, म्हणजे २१ नख्यांच कासव जे मिळणं अशक्य असत. बोलणारं घुबडं ते तर सुपर डुपर अशक्य, इंदिरा गांधीचा कॉइन, वीज पडलेल भांड असल्या दुर्मिळ गोष्टी. काळी हळद तशी जंगली त्यामुळे मार्केटमध्ये सहजासहजी मिळत नाही. मग त्यांच्यामागे अशा गोष्टी जोडल्या जातात. आणि जे प्रयत्न करुन मिळू शकत त्यात काहीना काही खोट काढली जाते. म्हणजे काळी हळद मिळाली, विकत घेतली तर त्यावर प्रभाव नव्हता. चुकून २१ नख्याचं कासव मिळालच तर पोटावर काळा डाग होता, इंदिरा गांधींचा कॉईन मिळाला तर इथे स्टार पाहीजे होता, पाच रुपयेची नोट मिळाली तर त्यात चार नाही पाचच हरणं पाहीजे होती. म्हणजे काहीही करुन गोष्टी अवघड करुन टाकायच्या आणि डिल डिल खेळत रहायचं. 

राहता राहिला मुद्दा अशा व्हिडीओंचा जे प्रभावी काळी जादू असल्याचा दावा करतात तर भावांनो ते फक्त त्यांचे व्ह्यू वाढवत असतात. आपल्याकडे JCB चं उत्खनन बघत बसतात तर काळी हळद आणि जादूचे प्रयोग म्हणजे सोने पे सुहागा. त्या व्हिडीओचे व्ह्यू बघा. त्यांच्या चॅनेलचे सबस्क्राईबर बघा. मग तुम्हाला यातलं आर्थिक गणित समजून येईल. 

राहता राहिलं त्या जो भिडू डिल करणार आहे त्याच्यासाठी तर भावा शिक्षण हि एकमेव गोष्ट श्रीमंत करते. शिक्षण नसेल तर कष्ट कर पैसे मिळव. हळदच काय तर लॉटरी किंवा जुगारातून जरी कोट्याधीश झालास तरी झोप लागणार नाही. कष्टाचे चार पैसै आपले म्हणायचे.

कारण कासवं, काळी हळद शोधण्याच्या नादात इथे लय लोकांची करियर बरबाद झालेत. काय सांगू तूला बोलभिडूतच असले दोघजण आहेत. असो.  

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.