गरीब म्हाताऱ्याला पोलीसांनी ३५ रुपयांची लाच मागितली, नंतर कळलं ते पंतप्रधान होते..

28 सप्टेंबर 1979. ठिकाण उत्तरप्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या खांटी गाव. संध्याकाळचे सहा वाजले होते. खांटी गावातलं पोलीस स्टेशन म्हणजे विशेष असं काही नव्हतं. मोडकळीस आलेलं स्टेशन. एक फौजदार आणि आठ-दहा जणांचा स्टाफ.. 

अशात त्या संध्याकाळी एक गरिब म्हातारा भितभित पोलीस स्टेशनमध्ये घुसला.

पोलीस स्टेशनमध्ये जायलाच हा म्हातारा भित होता. पायात चप्पल नाही. धोतर फाटलेलं. शर्टला ठिकठिकाणी ठिगळं लावलेली. रस्त्यावरची सगळी धुळ याच्याच तोंडावर असा तो अवतार. म्हातारा भित भित आत आला आणि चौकशी करु लागला… 

म्हाताऱ्याला फिर्याद दाखल करायची होती. ठाणे अंमलदार समोर आला. म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे त्याने एकदा निरखून पाहिलं आणि इथून आपल्याला काय मिळेल याची अपेक्षाच सोडून दिली. तुसड्या स्वरातच त्यानं विचारलं, 

काय पाहीजे.. 

म्हातारा म्हणाला. माझा खिसा कापलाय. पोलीस केस करायची होती. तितक्याच तुसड्या स्वरात ठाणे अंमलदारानं म्हाताऱ्याला विचारलं असे किती रुपये होते, केस करायला आलाय.. 

म्हातारा म्हणाला मी मेरठचा आहे. इथं एका पाहूण्यांनी सांगितलं बैल चांगला आहे. म्हणून मेरठवरून इटावाला आलो. येताना काही शे रुपये होते. शंभरच्या दोन नोटा तरी होत्या. पण रस्त्यात चोरांनी खिसा कापला… 

रपट लिखवा दों… 

म्हातारा अगदी काकुळतीला येवून सांगत होता. पण पोलीसांनी पहिला प्रश्न विचारला. कशावरून तुझ्याकडं पैसे होते. मेरठ वरून इतक्या लांब बैल खरेदी करायला कशाला आलास. काय गरज होती. तुझे पैसे गेलेच कशावरून. तुच दारू पिवून उडवले असतील. चालता हो अन् परत इकडं फिरकू नको.. 

पण म्हातारा ठाम राहिला. काहीही करा पण रपट लिखवा दों… 

ठाणे अंमलदार बघतो, करतो, बसून रहा म्हणून सांगून गेला आणि काही वेळात दूसरा हवलदार आला. त्याने म्हाताऱ्याला समजावण्याच्या सुरात रपट लिखवा दों ची किंमत सांगितली. ३५ रुपये दे तरच तक्रार दाखल करुन घेतो. नाहीतर हे शक्य नाही चालता हो.. 

म्हातारा नाही हो म्हणत तयार झाला. ३५ रुपये दिल्यानंतर ठाणे अंमलदार तयार झाला. त्याने पैसे घेतले आणि तक्रार लिहून घ्यायला सुरवात केली. तक्रार लिहण्यात आली. सगळे सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर ठाणे अंमलदार त्याच तुसड्या भाषेत म्हणाला, 

हं म्हाताऱ्या इथे अंगठा दे.. 

म्हाताऱ्यासमोर अंगठ्याला शाई लावण्यासाठी शाईंची पेटी धरण्यात आली. पण म्हाताऱ्याने ती पेटीपण घेतली आणि टेबलवर ठेवलेला पेन पण घेतला. 

म्हातारा सही करणार की शाईने अंगठा लावणार. दोन्ही पोलीसांच्या तोंडावर प्रश्नचिन्ह होतं. पण म्हाताऱ्याने हातात पेन घेतला. सहीच्या ठिकाणी लिहलं…

चौधरी चरणसिंह… 

अन् खिश्यातून शिक्का काढला. शाईच्या पेटीवर उमटवून तो सहीच्या खाली मारला.. 

त्यावर लिहलेलं होतं. 

पंतप्रधान भारत सरकार.. 

एका क्षणात पोलीस स्टेशन हादरून गेलं. काही मिनटातच पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकारी आले. जिल्हाप्रमुख आणि जिल्हाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तिथल्या तिथे पोलीस स्टेशनमधला संपूर्ण स्टॉफला बडतर्फ करण्यात आलं.. 

पंतप्रधानांवर असं स्टिंग ऑपरेशन करण्याची वेळ का आली होती. तर इंदिरा गांधींच्या आणिबाणीनंतर जनता पक्षाची राजवट आली होती. सुरवातीला असलेली जनता पक्षाची लोकप्रियता ढासळू लागली होती. दूसरीकडे काही महिन्यापूर्वीच चौधरी चरणसिंग पंतप्रधान म्हणून निवडले गेले होते. चौधरी चरणसिंग यांची मदार होती ती दिल्लीच्या आजूबाजूला असणाऱ्या जाट क्षेत्रावर. मात्र शेतकरी असणाऱ्या या जाट समुदायाच्या प्रचंड अडचणी वाढल्या होत्या. दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला लोकल नेते गेले की ते तक्रार करायचे ते पोलीस स्टेशनचीच. 

राजकीय अस्थिरतेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असणारी सरकारची पकड देखील सैल होत होती. तेव्हा खूप विचार करुन चौधरी चरणसिंग यांनी हे स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं. 

यानंतर अपेक्षित तो परिणाम झाला. कोणताही वरिष्ठ अधिकारी कोणत्या रुपात समोर येईल याची शाश्वती देता येत नव्हती. त्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयातला अधिकारी आपल्यावर CCTV कॅमेरा असल्याप्रमाणेच वागू लागला. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.