जेंव्हा मुख्यमंत्री कलेक्टरने केलेल्या पाहुणचाराची परतफेड ६ रुपये २५ पैशांचा चेक देऊन करतात

‘If you want to test a man’s character, then give him power’

अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे हे वाक्य आहे, जे थोडक्यात राजकारण आणि सत्तेचे विश्लेषण करते. थोडक्यात माणसाकडे जेंव्हा सत्ता असते तेव्हाच त्याचे खरे रूप कळते. अगदी सरपंच, नगरसेवक यांपासून ते आमदार, खासदार, मंत्री इथपर्यंत. भ्रष्टाचाराचे किस्से दाबून ऐकले असतीलच आपण….

अहो येथे पदानुसार गाड्यांचे ब्रँड ठरलेले असतात. राजकारण हे समाजकारणाचे एक माध्यम असते हे ऐकायला बरं वाटतं पण समाजकारण करता करता काही राजकारणी मंडळींचे घरं मात्र पद्धतशीर भरले जातात.. भारतीय राजकारणाचा इतिहास बघता असे भ्रष्टाचाराचे किस्से काय कमी नाहीत. पण भ्रष्टाचाराला स्वतःपासून दूर ठेवत तत्वनिष्ठ राहून राजकारण करणारे राजकारणी आपल्याला क्वचितच  आढळतात. काही निष्कलंक राजकारणी देखील इतिहासात होऊन गेले. 

हे सगळं सांगायचं निमित्त म्हणजे, आजचा किस्सा आहे चौधरी चरण सिंग यांचा. ज्यांनी यूपीच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत जबाबदारी सांभाळली, परंतु त्यांनी आपली देशी शैली सोडली नाही. आपल्या वैयक्तिक सिद्धांतासाठी ते आपल्या लोकांशी देखील भांडायला कचरले नाहीत. वैयक्तिक जीवनात ते जितके कठोर दिसत होते तितकेच त्यांचे जीवन साधेपणाने भरलेले होते.

तर हा किस्सा आहे १९६७ सालचा जेंव्हा चौधरी चरण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. एकेदिवशी त्यांचा दौरा हरिद्वार येथे होता. त्यावेळी हरिद्वार हे उत्तर प्रदेशचा भाग होते. दौरा करून झाल्यानंतर उशीर झाल्यामुळे रात्री त्यांना तिथेच मुक्काम करावा लागला होता. गंगा किनाऱ्यावर ती असलेल्या एका सर्किटाऊस मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

चौधरी चरण सिंग यांचा उपवास होता.

चौधरी चरण सिंग यांची व्यवस्था ज्या सर्किट हाऊस मध्ये करण्यात आली होती. त्याच्या शेजारीच डीएम चा बंगला होता. उत्तर भारतात कलेक्टरला डीएम म्हणतात. त्यावेळी हरिद्वार चे कलेक्टर होते चंद्रशेखर द्विवेदी. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांचा सर्व बंदोबस्त करण्यात आला. अगदी साग्रसंगीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. परंतु आपले व्रत असल्यामुळे आपण आज जेवण करू शकत नाही असे बोलून त्यांनी ते जेवण टाळले.

जेवण नाकारल्यानंतर चरण सिंग झोपण्यास निघून गेले. अशात रात्री बारा साडे बारा वाजेच्या सुमारास  दरवाजाची बेल वाजते बाहेर एक सरकारी अधिकारी काही फळे आणि गरमागरम दूध घेऊन उभा असतो .आपल्याला कलेक्टर कडून पाठवण्यात आल्याचे तो सांगतो. मग मुख्यमंत्र्यांचा उपवास असल्यामुळे कलेक्टर उपवासाचे पदार्थ पाठवतात. तसेच आपण कृपया याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो..तितक्याच आदराने चौधरी चरण सिंग त्याचा स्वीकार करतात. 

आणि रोजच्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी आपल्या दिनक्रमात व्यस्त होतात. दोन दिवसानंतर काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन व ठरलेले सार्वजनिक कार्यक्रम उरकून मुख्यमंत्री जायला निघतात. हरिद्वार रेल्वे स्टेशन गाठतात व रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यात जाऊन बसतात. हो मुख्यामंत्री असून सुद्धा हेलिकॉप्टर ,विमान प्रवास नाही किंवा गाड्यांचा फौज फाटा नाही…सरळ ट्रेनने प्रवास..अगदी कसं सगळं साधं व्यक्तिमत्व होतं. 

गाडी निघायला अजून वेळ होता तेवढ्यात त्यांनी हरिद्वारच्या डीएम ला भेटायचे आहे असा निरोप पाठवला. काही वेळानंतर डीएम तिथे हजर होतात. सीएम कडून अचानक बोलावणे आल्यामुळे कलेक्टर बुचकळ्यात पडतात. पण मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यास वेगळंच चित्र दिसतं..

मुख्यमंत्री आपल्या कोटमधून चेकबुक काढतात आणि सहा रुपये २५ पैशाचा चेक लिहून डीएमच्या हाती सुपूर्त करतात.

त्यांच्या अशा कृतीमुळे कलेक्टर चंद्रशेखर द्विवेदी गोंधळून जातात, नेमकं काय चाललंय हे त्यांना कळेना… त्यांची संदिग्धता मुख्यमंत्र्यांपासून लपून राहत नाही. आणि मग मुख्यमंत्री उत्तर देतात कि, “तुम्ही माझ्या उपवासासाठी फळे आणि दूध पाठवले होते. त्यांची किंमत ६ रुपये २५ पैसे असल्याचे मला समजले. हा धनादेश त्याचाच आहे”. 

ते तर आमचे कर्तव्य होते असे बोलून चंद्रशेखर द्विवेदी ते घेण्याचे टाळतात. परंतु चरण सिंग आपल्या जिद्दीवर अडून राहतात. “तुम्हांला माझ्या उपवासाचे महत्त्व समजले आणि एवढ्या रात्री फराळाची व्यवस्था केली, म्हणून तुम्हांला ते घ्यावेच लागेल”. यावर कलेक्टर द्विवेदी फार काही बोलू शकत नाहीत आणि तो चेक खिशात घेऊन शांतपणे निघून जातात.

मात्र या कलेक्टरच्या मुलाने गौरव द्विवेदी यांनी एकदा सांगितलेलं कि, “माझ्या वडिलांनी तो धनादेश एक स्मृतिचिन्ह म्हणून आयुष्यभर जपून ठेवलं आहे”.

तर मंडळी हा किस्सा अशा जननायकाचा होता की ज्यांनी फक्त एका अधिकाऱ्याकडून पाहुणचार घेतला तरी त्यांचे पैसे परत केले होते…अन आत्ताचे राजकीय नेते कोट्यवधींचा भ्रष्टाचार करूनही  उथळ माथ्याने समाजात फिरतांना दिसतात.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.