मुख्यमंत्री असलेल्या सासऱ्याचा वशिला लावून जावयाने स्कूटर घेतली पण एक घोळ झाला..

नेते आणि त्यांचे पाहूणे. एखादा माणूस साधा तलाठी झाला तरी तलाठ्याच्या पै-पाहुण्यांचा रुबाब वाढतो. आमचं दाजी तलाठी आहेत म्हणून वाळूच्या ठेक्यावर टॅक्टर लावणारी मंडळी देखील या देशात काय कमी नाहीत. 

मग मंत्र्या संत्र्यांच तर विचारूच नका.

जेवढं काय आपल्या पदरात पाडता येईल तेवढं पदरात पाडून घ्यायच्या नादाला हे नातेवाईक लागतात. बर यात मंत्री तरी मागं असतात का तर नाही? आपल्या नावावर करता येत नाही तर पाहूण्यांच्या नावावर करुन टाकायचा एक अलिखित नियम असतो. थोडक्यात काय तर एक मंत्री आपल्या स्वत:च्या सात पिढ्यांसोबतच आपल्या पाहूण्यारावळ्यांच्या सात पिढ्या देखील वर काढतो हे उघड सत्य आहे.. 

हा किस्सा देखील याच धर्तीचा आहे, 

पण बरोबर पाहूण्या रावळ्यांच भल्ल करण्याच्या बरोबर उलटा…. 

हा किस्सा आहे तो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा. हा किस्सा सांगितला होता तो हर्ष सिंह लोहित यांनी. हर्ष सिंग-लोहित या चौधरी चरणसिंह यांच्या नात. 

चौधरी चरण सिंग यांना एकूण ६ मुलं आणि मुली होत्या. त्यातील सर्वात धाकटी मुलगी म्हणजे शारदा. या शारदा सिंग यांच लग्न वासुदेव सिंग यांच्यासोबत झालं होतं.

म्हणजे वासुदेव सिंग हे चौधरी चरणसिंग यांचे जावई. 

हा किस्सा घडला तेव्हा चौधरी चरण सिंग हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते.

तेव्हा त्यांचे जावई वासुदेव हे दिल्लीत काम करत असत. त्या काळात स्कुटरसाठी चार-चार, पाच-पाच वर्षांचे वेटिंग असे. एखाद्याला तात्काळ स्कुटर पाहीजे असेल तर त्याला कोट्यातून नंबर लावावा लागायचा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील विशेष कोटा दिला होता. मुख्यमंत्री ज्याला सांगतील त्याला या कोट्यातून वेटिंगवर न थांबता लवकर स्कुटर मिळायची… 

दिल्लीत कामासाठी असणाऱ्या वासुदेव यांना स्कुटरची गरज होती. मुख्यमंत्र्याच्या म्हणजे आपल्या सासऱ्यांच्या कोट्यातून आपल्याला लवकर स्कुटर मिळेल याची त्यांना माहिती मिळाली. तात्काळ आपल्या सासऱ्यांच्या पीए ला फोन लावून त्यांनी मुख्यमंत्री कोट्यातून आपणाला स्कुटर बुक करायची ऑर्डर देवून टाकली… 

किती झालं तरी पीए हा नोकरमाणूस. वासुदेव थेट मुख्यमंत्र्यांचे जावई असल्याने पीएनी देखील मुख्यमंत्र्यांना न विचारता मुख्यमंत्र्याच्या कोट्यातून स्कुटर बुक करुन टाकली… 

काही दिवसांनी स्कुटर आली. डिलिव्हरी घेण्यासाठी लखनौला या असा फोन जावईबापूंना आला व ते स्कुटर घेण्यासाठी दिल्लीहून लखनौला आले. आत्ता लखनौला आलोच आहे तर आपल्या सासऱ्यांना म्हणजेच मुख्यमंत्री असणाऱ्या चौधरी चरण सिंग यांना भेटून जावं असा विचार त्यांनी केला.

स्वारी खुषीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचली. गप्पा-टप्पा झाल्या. लखनौला येण्याचं कारण विचारताच जावईबापू म्हणाले, 

स्कुटरची डिलीवरी घ्यायला आलोय… 

इतक्या लवकर स्कुटर कशी मिळाली हे विचारताच जावईबापू म्हणाले, 

तुमच्याच कोट्यातून बुक केलेली. 

यावर चौधरी चरण सिंग काहीच बोल्ले नाहीत. जावईबापू चहा पिवून स्कुटर घ्यायला गेले. इकडे जावईबापू बाहेर पडताच मुख्यमंत्र्यांनी PA ला बोलावून घेतलं. दिल्लीच्या माणसाला तुम्ही युपीतून स्कुटर कशी मंजूर केली म्हणून कान उघाडणी केली आणि तात्काळ स्कुटर कॅन्सल करुन त्यांना पैसे परत देण्यास सुनावलं.. 

झालं जावईबापूंना हे कळालं तेव्हा त्यांच्या फ्यूजा उडाल्या.. 

असाही एक मुख्यमंत्री सासरा…. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.