चिमाजी म्हणाले “किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.”

चिमाजी आप्पा अर्थात चिमणाजी अप्पा हे काही बाबतींत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले.

थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठी राहिले. या जोडीला ‘राम-लक्ष्मण, सुद्धा म्हणले जाते, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते हेच खरे आणि तसेच चिमाजींबाबत घडले आहे.

बाजीराव पेशव्यांइतकेच चिमाजी अप्पा हे शुर आणि पराक्रमी होते, रणनीती बनवण्यात ते कायम अग्रेसर असायचे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता.

चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र आणि बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू होते. १७३३ मध्ये चिमाजी अप्पांनी सरदार शंकरबुवा यांच्यासोबत बेलापूर किल्ला जिंकला.

चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली 17 फेब्रुवारी 1739 रोजी मराठ्यांनी वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला.

पोर्तुगीज बलाढ्य होते आणि कुठल्याही परिस्थितीत मागे हटण्याचा त्यांचा विचार नव्हता , मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडवली होती. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला.

आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते. मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या नाकात अशी वेसण घातली की त्यांना मराठ्यांच्या इशाऱ्यावर नाचाव लागत होतं.

16 मे 1739 रोजी वेढा यशस्वी झाला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला.

चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. या मोहिमेत चिमाजी अप्पांसोबत मातब्बर सरदारही सोबत होते त्यात मल्हारराव होळकर, राणोजीराव शिंदे, जानोजीराव, मानाजी आंग्रे, गिरमाजी कानिटकर यांचा समावेश होता.

तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. तोफांचा भडिमार इतका तीव्र होता की किल्ला डचमळू लागला आणि चिमाजी आप्पा यांचा आवेश इतका जबरदस्त होता की किल्ला थेट पाण्यातच विसर्जित करायचा.

जेव्हा किल्ला जिंकून हातात येत नव्हता तेव्हा चिमाजी आप्पा यांनी डरकाळी फोडली किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.’

वसई लढाईतील पोर्तुगीजांकडून जप्त केली घंटा
या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.

वसईच्या लढाईपूर्वी चिमाजी आप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नर ला बळजबरीने धर्मांतरण न करण्याची ताकीद दिली होती. त्याकडे दुर्लक्ष होते आहे असे पाहून चिमाजी आप्पांनी दम भरला होता की,

“जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्ल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या मंदिरात वाजू लागतील.”

हे शब्द खरे ठरले. आज महाराष्ट्रात अनेक मंदिरात या घंटा बघायला मिळतात. नाशिकला असलेली प्रसिद्ध नारोशंकराची घंटा देखील पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक आहे. इतकेच काय नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह म्हणून देखील ही घंटा विराजमान आहे.

चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांच्या तोंडचं पाणी त्यांनी पळवलं होतं. बाजीराव पेशवे जितके पराक्रमी होते तितकेच चिमाजी अप्पासुद्धा पराक्रमी होते.

आपण स्वतः किंवा चिरंजीव सदाशिवराव भाऊ केव्हाही ‘पेशवा’ बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले. 17 डिसेंबर 1740 साली चिमाजी आप्पा यांचं निधन झालं. बाजीराव पेशवे यांच्यासोबत चिमणाजी आप्पा यांचा हा पराक्रम इतिहासात अजरामर झाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.