बाजीराव पेशवेसुद्धा पिलाजीराव जाधवरावांना युद्धशास्त्रातला गुरू मानायचे

मराठयांना धुळीत मिळवायचं या एकाच उद्देशाने औरंगजेब बादशाह दक्षिणेत आला होता. संभाजी महाराजांना त्याने पकडलं. त्याला वाटलं मराठे हार मान्य करतील पण तसं घडलं नाही. राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यांनी सुरवातीला पन्हाळा आणि नंतर जिंजी वरून स्वराज्याचा कारभार पहिला.

राजाराम महाराजांच्या नंतर ताराराणी बाईसाहेब यांनी स्वराज्याचा लढा सुरूच ठेवला. 

संताजी धनाजी सारख्या लढवय्या सेनापतीमुळे मावळ्यांमुळे औरंगजेबाला मराठ्यांवर पूर्ण विजय कधी मिळवताच आला नाही. हीच हाय खाऊन तो मराठी मातीत गाडला गेला.

औरंगजेबाच्या मृत्यू नंतर त्याच्या मुलाने आपल्या ताब्यात असलेल्या शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली.

शाहू महाराज हे स्वराज्याचे युवराज होते. त्यांनी आपल्या हक्काच्या छत्रपती पदाच्या गादीची मागणी केली. संकट काळात लढा देऊन स्वराज्याच रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंनी यास नकार दिला. त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं होतं.

शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही राजधानी घोषित केली. छत्रपतींच्या घराण्यात वाद झाले. स्वराजाची सातारा आणि करवीर अशी दोन शकले झाली होती.

मराठा सरदारांनी देखील दोन्हीपैकी एका झेंड्याखाली आश्रय घेतला. 

शाहू महाराजांची बाजू घेणाऱ्यामध्ये होते खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ भट, हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधवराव.

पिलाजी चांगोजी जाधवराव पुण्याजवळील वाघोली गावचे. तिथली परंपरागत पाटीलकी त्यांच्याकडे चालत आलेली. जिजाऊंचं माहेर लखुजीराव जाधवांशी त्यांचं नातं सांगितलं जातं. शाहू महाराज परत आले तेव्हा त्यांना सामोरे जाणाऱ्यामध्ये पिलाजीराव सर्वात आघाडीवर होते.

सरसेनापती धनाजी जाधवांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे म्हणजेच चंद्रसेन जाधवांकडे सेनापती पद आले होते. पण  त्याचे आणि बाळाजी विश्वनाथ या दोघांच्यात काही कारणामुळे वितुष्ट आले.

बाळाजी विश्वनाथ भट हे एकेकाळचे धनाजी जाधवांच्या सैन्यातील कारकून आता शाहूमहाराजांच्या विश्वासातील सरदार बनले होते. त्यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती केली होती. त्याच्याकडे पुण्याची सुभेदारी होती. पण सेनापती चंद्रसेन जाधवांसोबत त्यांचे वाद वाढले. सेनापतींनी त्यांंच्यावर हल्ला केला. घाबरलेले बाळाजी विश्वनाथ भट पळाले व आपल्या बायका पोरांसहित पांडवगडावर आश्रय घेतला.

चंद्रसेन जाधवांनी पांडव गडावर वेढा टाकला.

छत्रपती शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवांचं पारिपत्य करण्यासाठी हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधवराव यांना पाठवले. पांडवगडच्या लढाईत पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथ आणि कुटुंबाची सुटका करवली.

बाळाजी विश्वनाथांंचा मुलगा पहिला बाजीराव तेव्हा अवघ्या 12 वर्षाचा होता. पिलाजीराव जाधवांचा पराक्रम आणि त्यांची मुत्सद्देगिरी अगदी जवळून पाहिल्यामुळे त्याच्या मनात पिलाजीरावाबद्दल शेवट पर्यंत आदर व प्रेम कायम राहिलं. 

पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाकडे पेशवाईची वस्त्रे दिली. पेशवा बाळाजी विश्वनाथांंनी करवीर गादीचा प्रांत साताऱ्याला जोडण्याचा प्रयत्न चालवला. यातूनच करवीर संस्थानचे सरदार दामाजी थोरात यांनी त्यांना पकडले व हिंगणगाव च्या गढीत कैदेत टाकले.

यावेळीही पेशव्याला सोडवण्यासाठी पिलाजीराव जाधवांना जावे लागले.

पिलाजीरावांच्या कामगिरीवर खुश होऊन शाहू महाराजांनी त्यांना पुणे प्रांतातील मौजे दिवे व मौजे नांदेड ही गावे इनाम दिली. आजची भव्य अशी नांदेड सिटी असणारा हा भाग. पेशव्यांचा देखील पिलाजीरावावर विश्वास होता. त्यांची दोन्ही मुले बाजीराव व चिमाजी अप्पा ही पिलाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध शास्त्र शिकले.

पुढे बाजीरावांंकडे पेशवाईची सूत्रे आली. त्याना निजामावर अंकुश बसवण्यात अपयश येत होते. अखेर त्यांनी ही जबाबदारी आपल्या गुरू कडे म्हणजेच पिलाजीरावाकडे सोपवली. 

रणझुंझार पिलाजीराव जाधवरावानी घोड्याला उलटे नाल ठोकले व सलग दोन महिने घोड्याचे खोगीर न उतरवता औरंगाबादची मोहीम हाती घेतली. निजामावर जरब बसला व कायमची वसूलिची व्यवस्था लावून दिली.

बाजीरावांनी उत्तरेत काढलेल्या प्रत्येक मोहिमेत पिलाजीराव आघाडीवर होते. 1729 मध्ये बाजीराव पेशवे छत्रसालाच्या मदतीला गेले त्यावेळी पिलाजी जाधवराव त्यांच्याबरोबर होते .या युद्धात त्यांनी शत्रूचा  पराभव केला.

त्यावेळी त्यांचा  पराक्रम पाहून छत्रसाल राजाने पिलाजीराव जाधवरावांना सागर प्रांतातील मोठी जहागिरी दिली. माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदुस्थान, सुरत, भेलसा, प्रयाग,बंगाल, नेवासे इथपर्यंत त्यांनी मजल मारली व बंगाल प्रांताची चौथाई शाहू महाराजांना मिळवून दिली.

त्यांना जलादत्त इन्कलाब म्हणजे रणशूर किंवा शौर्य क्रमाचे मर्मज्ञ अशा उपाधीने गौरवले गेले. 1737 मध्ये चिमाजी आप्पाने पोर्तुगीजां विरुद्ध काढलेल्या वसईच्या मोहिमेमध्ये  होळकर शिंदे शितोळे या मराठेशाहितल्या नामांकित सरदारांसह पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते.

या मोहिमेत पाच प्रमुख मोर्चातील हुजुरातीच्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केलं.

पोर्तुगीजाना हरवण्यात चिमाजी अप्पा सोबतच या सर्व सरदारांची तलवार देखील कारणीभूत ठरली. 

बाजीरावांंचे पुत्र नानासाहेब पेशवे देखील पिलाजीरावाचा पराक्रम जाणून होते व युद्धप्रसंगी त्यांची मसलतबजरूर घ्यायचे. पिलाजीराव जाधवांनी शाहू छत्रपती व पेशव्यांच्या तीन पिढ्याच्या कारकिर्दीत सतत पन्नास वर्षे उत्तर व मध्य भारत, बंगाल, कोकण, कर्नाटक या भागात आपली घोडी दौडवली व त्यांच्यावर वचक ठेवला. अनेक लढाया मारल्या.

उत्तरेत अनेक जहागिरी मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून छत्रपतींच्या सैन्याच नेतृत्व केलं. शेवट पर्यंत त्यांची छत्रपती शाहू महाराजांवरील राजनिष्ठा कधी ढळली नाही.

त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश प्रमाण मानला. सासवड जवळील दिवे घाट येथे जाधववाडीमध्ये त्यांनी बांधलेली गढी आजही मराठा वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना म्हणून दाखवली जाते.

त्यांनी वाघोली येथे वाघेश्वराच मंदिर उभारलं.

त्याच्याजवळच त्यांची समाधी देखील आहे. 3 जुलै 1751 मध्ये त्यांचा वाघोली येथे मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जहागिरीच्या ठिकाणी म्हणजेच नांदेड येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नांदेड सिटी येथे समुहशिल्प उभारण्यात आले आहे. 

संदर्भ- मराठी रियासत: गो.स.सरदेसाई

 सरदार पिलाजीराव जाधवराव व्यक्ती व कार्य: डॉ.सुवर्णलता जाधवराव

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.