रायगडने महाराष्ट्राला डमी सुनिल तटकरे दिले… 

महाराष्ट्राचा पहिला मुस्लीम मुख्यमंत्री रायगडने दिला. केंद्रात राज्यात विविध पदे भूषवणारे नेते दिले. स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. या रायगड जिल्ह्याने महाराष्ट्राला खूप काही दिले. यातच भर पडली ती महाराष्ट्राच्या लोकशाहीला दिलेल्या डमी उमेदवारांची.

आत्ता तुम्ही म्हणाल डमी म्हणजे काय? तर डमी म्हणजे त्याच नावाचा माणूस.

सविस्तर सांगायचं झालं तर २०१४ च्या लोकसभा इलेक्शनचा किस्सा सांगतो. त्यावेळी राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे उभा होते तर सेनेकडून अनंत गिते उभा होते. निकाल लागला तेव्हा सुनिल तटकरेंचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला. तटकरेंच्या जिव्हारी हा पराभव लागला. पण इथे दूसऱ्या सुनिल तटकरेंना गोडधोड खायला दिलं जातं होतं. कारण इलेक्शनमध्ये अनंत गिते सुनिल तटकरे यांच्यासोबत अजून एक अपक्ष सुनिल तटकरे उभा होते. त्यांनी ९ हजार ८४९ मते खावून ढेकर दिलेला.  हे आपलेच सुनिल तटकरे म्हणून लोकांनी पक्षाच चिन्ह न बघता डमी सुनिल तटकरेंना मतं दिली.

तब्बल साडेनऊ हजार मते डमी तटकरे साहेबांना मिळाल्याने त्यांची हवा झाली पण इकडे ओरिजनल सुनिल तटकरेंना पराभव पहायला लागला. 

पुढे काय झालं तर अनंत गिते केंद्रिय मंत्रीमंडळात गेले. त्याच श्रेय देखील या डमी सुनिल तटकरे साहेबांना जातं. ते नसते तर अनंत गिते पडले असते आणि ओरिजनल तटकरे विजयी झाले असते. 

डमी उमेदवार उभा करण्याची पद्धत कधीपासूनची ती कोणी शोधली याचा ठावठिकाणा घेणं अवघड जातं पण राज्यात असली अनोखी कन्सेप्ट रायगड जिल्ह्यानेच सुरू केली अस ओरिजनल पत्रकार ठासून सांगतात. 

पत्रकार २००४ सालच एक उदाहरण देतात.

तेव्हा बॅरिस्टर ए.आर. अंतुले लोकसभा निवडणुकीत उभा होते. ते विजय झाले पण डमी ए.आर. अंतुलेनी तब्बल २३ हजार ७७१ मते खाली होती. डमी उमेदवारांनी खालेल्या मतांची ही आकडेवारी आजवरची सर्वोच्च आकडेवारी असेल. हे नक्की. त्या अगोदरच्या इतिहासात गेलं तर १९९६ साली चार दत्ता पाटील उभा असल्याचं सांगण्यात येतं. १९९१ साली दोन दत्ता पाटील उभा असल्याचं सांगण्यात येत. 

त्याच्या पुर्वीचा संदर्भ मिळत नाही पण रायगड जिल्ह्याला या डमी उमेदवारांनी जोराचा हिसका दाखवला असल्याची उदाहरणे मात्र पोत्याने मिळतात. एकीकडं सक्सेस झालं की दूसरीकडे ती पद्धत राबवायची हा लोकशाहीचा नियम आहे. याच तत्वाला धरून आज संपुर्ण महाराष्ट्रात डमी उमेदवार उभा करण्याचे प्रकार चालतात. 

डमी उमेदवार प्रामुख्याने काटा लढत असली तर उभा केला जातो.

म्हणजे मताधिक्याचा फरक हा जास्तीत जास्त दोन चार हजारांचा असेल अस वाटतं की त्याच नावाच्या माणसाला उमेदवार म्हणून विरोधकांकडून उभा केलं जातं. नाही म्हणलं तरी असा उमेदवार दोन चार हजार मतं खातोच खातो. बस्स इतक्यावर काम भागतं. काही वेळा तर त्याच नावाचे चार पाच उमेदवार उभा केले जातात मग काय होतं नावांच गोंधळ उडतो. इथे प्रत्येकजण पक्षाचं चिन्ह बघायला जात नाही.

पहिला नाव दिसत असल्याने तो सरळ सरळ नावासमोरच बटणं दाबतो. पुर्वीच्या काळी म्हणजे EVM मशीन नव्हत्या त्या काळात नाव वाचून शिक्के मारले जायचे. तेव्हा पण लोकांना चिन्ह बघायचा कंटाळा यायचा. 

आत्ता या प्रकारात खरी गंमत कधी यायची तर उमेदवार बंडखोर असला, अपक्ष म्हणून उभा राहिलेला असला तर.

कारण बंडखोरी किंवा अपक्ष म्हणून उभा राहिल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीसाठी चिन्ह मिळतं. प्रचाराला अवघे दहा पंधरा दिवस राहिलेले असताना ते चिन्ह मतदारांपर्यन्त पोहचवणं अवघड असत. मतदारांना नाव माहिती असत पण चिन्ह पोहचत नाही. अशा वेळी डमी उमेदवार आपलं काम इमानेइतबारे करत असतात. संपुर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात एकना एक तरी डमी उमेदवार मिळूनच जातो. जो ऐन टायमला निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाडायची ताकद ठेवतो. 

आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून सुभाष वानखेडे उभा होते त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून पाच सुभाष वानखेडे उभा होते. म्हणजे कस हाय काय नाय काय. बर याचा फायदा फक्त विरोधक घेतात असपण नसतय. आत्ताच्या विधानसभेला एक बातमी आली.  कर्जत जामखेडमधून रोहीत पवारांचा अर्ज बाद. बातमीवर क्लिक करून पाहील तर रोहीत पवार नावाचा जो डमी उमेदवार उभा केलेला त्याचा अर्ज बांद झालेला. याचा फायदा मिडीयाने घेतला आणि लागली हाती हजारभर क्लिक जास्त मिळवून टाकले. 

थोडक्यात काय तर आपल्याकडे डुप्लिकेट माणसं पोत्याने आहेत. कुणाच्या नावाचा किती फायदा होईल ते सांगता येत नाही. शेवटी रायगडचा शेक्सपियर म्हणूनच गेलाय, नावात लय काय काय आहे भिडू..! 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.