दिल्लीतल्या राजकारणापेक्षा गल्लीतल्या राजकारणाची ‘इर्सल’ मोठी असते, हेच इर्सल सांगतो

एकीकडे पावनखिंड, हंबीरराव मोहिते अशा ऐतिहासिक सिनेमांची लाट आली असताना रियलिस्टिकी सिनेमा बाजूला तर फेकले जात नाही ना? असं वाटायला लागलं होतं. त्यातच ‘राजकारणात गुलाल शिवाय मजाचं नाय’ म्हणतं ३ जून रोजी इर्सल रिलीज झाला. 

राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव इर्सलमध्ये अगदी स्पष्ट दाखविलं आहे.

मुळात पिक्चर बद्दल उत्सुकता वाटायला सुरुवात होते ते नावापासूनच. इर्सल म्हणजेच ईर्षा. पिक्चरचं पोस्टर सगळं काही सांगून जातं. यात पिस्तूल ताणलेला हात दिसतोय आणि गुलाल उधळलेला दिसतोय. हा गुलाल विजयाचा नाही तर रक्ताचा लाल रंग मिसळून गडद झाल्याचं दिसतोय. 

राजकारण, गुलाल अन् रक्त असं सगळं एकजीव झालं आहे. 

दांडेकर पूल हा पुणेकरांसाठी नवीन नाही. पुणे शहरातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी समजली जाणारी जनता वसाहत, तिथलं राजकारण, गुंडगिरी हे नवीन नाही. महापालिका निवडणुकांमध्ये आजही झोपडपट्टीचं राजकारण महत्वाची भूमिका पार पाडत असते. मात्र त्याचं खरं रूप कोणीही पुढे आणलं नव्हतं.

ज्यांचं झोपडपट्टीवर वर्चस्व त्यांचं तिकीट फिक्स असं गणित मागचे किती वर्ष होऊन बसलं आहे. यात रिक्षा चालक, माथाडी संघटना, झोपडपट्टीवर प्रभाव असणारे नेते याबद्दल पाहायला मिळतं. तळागाळातील राजकारण इर्सल समजून सांगतो.    

याच झोपडपट्टीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी बालपणीचे दोन मित्र कट्टर प्रतिस्पर्धी बनतात. दोघेही एकाच पक्षासाठी काम करत असतात. दोघांनाही मुख्य प्रवाहातील राजकारणात यायचं असतं. एक जण राजकीय आणि गुन्हेगारीचा वापर करतो आणि दुसरा तरुणांचा वापर करतो. 

तरुण स्वतःचा अजेंडा घेऊन राजकीय डावपेच शिकत असतो. आणि झोपडपट्टीतील अल्पवयीन पोरांच्या टोळीचा वापर करून राजकीय खेळ खेळत असतो.

तसा राजकारण विषय मराठी पिक्चरसाठी नवा नाही. सामना आणि त्याअगोदरपासून राजकारणाची दुसरी बाजू तितक्याच ताकतीने दाखवली आहे. राजकारण हा मराठी माणसाचा आवडीचा विषय आहे. राजकारण कुठं नसतं. पण सामान्य कुटुंबातील व्यक्ती राजकारणात जात नाही, त्याचं कारण म्हणजे भीती. 

नेमकी कोणती भीती, हेच या पिक्चरमध्ये दाखविण्यात आलं आहे. 

३ जून पासून राज्यातील सर्व थेटर्समध्ये हा पिक्चर प्रदर्शित झाला आहे.

कार्यकर्ते कशाप्रकारे गोवले जातात, मनात नसतांना राजकीय घोंगडी कार्यकर्त्यांना कशी उचलावी लागते, पडद्यामागील राजकीय कारस्थान कशा प्रकारे रचली जातात, अशा पडद्यामागील सगळ्या घडामोडी यातून दाखवण्यात आल्या आहेत. 

राजकारणामागचं भयाण वास्तव इर्सलमधून दाखवलं आहे.  

डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर सारखी तगडी स्टारकास्ट यात आहे. तर सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम यांच्यासह इतरही कलाकार यात सामील आहेत. विक्रम सूर्यकांत शिवानी मोझे पाटील ही नवीन जोडी इर्सल मधून पदार्पण करत आहे. यात नव्या जुन्याची सांगड घालण्यात आली आहे. दिनकर शिर्के यांनी पिक्चरच्या स्टोरीला साजेस संगीत दिलं आहे.

अनिल नगरकर मुख्य भूमिकेत असणार आहे.

अनिल यांनी काशिनाथ दांगट वस्तीतील दादाचा रोल करत आहेत. चतुर राजकारणी ज्याला ‘वापरणं’ माहित आहे. पुढच्याला कसं वापरून घ्यायचं हे दादाला पुरेपूर माहित असतं. अनिल नगरकर यांनी यापूर्वी ग्रामीण भागातील व्हिलनच्या अनेक भूमिका केल्या आहेत. यावेळी थोड्या वेगळ्या भूमिकेत ते असणार आहेत.

आपल्या आजूबाजूला, चौकात घडणाऱ्या राजकारणामागे नेमकं काय चालू असतं आणि त्यांचानंतर होणारे स्फोट यातून दाखविण्यात आले आहे. मुलांपासून राजकारणातील बुजुर्ग नेत्यांपर्यंत निवडणूकीच्या वेळी कसं राजकारण चालतं, कोण कोणाला वापरून घेतो. हे या पिक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे. 

‘इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय’, ‘इथला भाय कोणंच नाय’, ‘नाद केला ना तर बाद करीन’ किंवा ‘एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा’, ‘तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात’ असे डायलॉग पिक्चरबद्दल उत्सुक्ता निर्माण निर्माण करतात.  

राजकीय धुराळा यात पाहायला मिळणार आहे.

भलरी प्रोडक्शनचा ‘इर्सल’ हा पहिला मराठी पिक्चर असणार आहे. दिग्दर्शक अनिकेत बोन्द्रे आणि विश्वास सुतार यांनी केलं आहे. अनिकेत बोन्द्रे यांनी इर्सल पूर्वी  ‘प्रयत्ने’ ही शॉर्ट फिल्म केली होती. तेव्हा सुद्धा त्यांचं चांगलंच कौतुक झालं होतं.  

निर्माते विनायक आनंदराव माने व प्रस्तुतकर्ता सूरज डेंगळे, ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के ‘इर्सल’चे गीत – संगीतकार आहेत. चित्रपटातील गीते उर्मिला धनगर, पूरण शिवा, गुल सक्सेना, शाहीर लक्ष्मण पवार यांनी गायली आहेत. तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत.

 २०१६ पासून इर्सलची निर्मितीची तयारी सुरु झाली होती. शेड्युल, कास्टिंग सुद्धा ठरलं होतं, काही लोंकाना पैसे सुद्धा देण्यात आले होते. त्यानंतर झालेली नोटबंदी, जीएसटी यामुळे सगळं नियोजन बंद पडलं होतं. दरम्यान फेसबुकवर पोस्ट लिहून पिक्चर निर्मितीत येणाऱ्या अडचणी दिग्दर्शकांनी लिहल्या होत्या. त्यानंतर इर्सलच्या निर्मितीसाठी काही जण पुढे आले आणि हा चित्रपट सगळ्या संकटातून मार्ग काढत ३ जून रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.