लंगोट देखील घेवून न गेलेला पैलवान मैदानात उतरला आणि हिंदकेसरी झाला. 

१९६० सालची गोष्ट. दूसऱ्या हिंदकेसरी स्पर्धा मुंबईच्या वल्लभभाई पटेल मैदानावर भरल्या होत्या. पहिली हिंदकेसरी स्पर्धेची गदा श्रीपती खंचनाळे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आली होतीच. आत्ता वेळ होती दूसरी गदा देखील महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची. 

त्याच वेळी महाराष्ट्राच्या लाल मातीत एक नाव घुमत होतं.

गणपतराव आंदळकर या सहा फुटाहून अधिक उंचीच्या पैलवानाला अनेकांनी प्रतिस्पर्ध्याच्या छाताडावर बसलेलं पाहीलं होतं. गणपतराव आंदळकरांची कुस्ती म्हणजे निकाली कुस्ती अस समीकरण होतं. गणपतराव आदंळकर आपल्या चपळ डावपेचासाठी प्रसिद्ध होते. अनेक देशी विदेशी पैलवानांबरोबर दोनदोन हात करत कुस्तीच्या मातीत त्यांनी आपलं नाव केलं होतं. 

मात्र १९६० साली आयोजित करण्यात आलेल्या हिंदकेसरी स्पर्धेत त्यांचा समावेश नव्हता. मुंबईत स्पर्धा सुरू झाले आणि इतर पैलवानांसोबत गणपतराव आंदळकर देखील या स्पर्धेत सहभागी झाले. पण हा सहभाग फक्त स्पर्धा पाहण्यापुरता मर्यादित होता. ते कुस्ती खेळणार आहेत याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. 

स्पर्धेचे ठरल्याप्रमाणे पहिले दोन दिवस पार पडले. तेव्हा अस लक्षात आलं की,

यावेळीची गदा महाराष्ट्राच्या ताब्यातून जाणार. उत्तरेतल्या ताकदवान पैलवानांसमोर महाराष्ट्रातल्या पैलवानांचा निभाव लागणं अशक्य झालं होतं. महाराष्ट्राची माघार होणार हा अंदाज आल्यानंतर तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी गणपतराव आंदळकरांना बोलावून घेतलं. 

ते आंदळकरांना म्हणाले, 

पैलवान तुम्हाला कुस्ती करायची आहे..? 

आंदळकर म्हणाले, 

साहेब मी लंगोट पण आणली नाही. जेवण करून आलोय. मी सहभागी होणार हे मला काही सांगण्यात आलं नव्हतं आत्ता कस करावं. 

महाराष्ट्राची लाज राखायची असली तर तुला कुस्ती करायलाच पाहीजे. बाळासाहेब देसाईंचे हे वाक्य ऐकताच आंदळकर म्हणाले फक्त एक दिवसाची मुदत द्या. उद्या सहभागी होतो. 

महाराष्ट्राची लाज राखण्याची जबाबदारी आत्ता गणपतराव आंदळकरांच्या खांद्यावर होती. 

आंदळकर दूसऱ्या दिवशी संपुर्ण तयारीनिशी आले. हिंदकेसरी गटात एकूण सोळा मल्ल खेळत होते. पहिल्या दोन कुस्त्यांमध्ये आदळकरांनी बाजी मारली. तिसरी कुस्ती लागली ती बनातसिंग पंजाबी या कसलेल्या मल्लासोबत. अखेरच्या टप्यात गुणांवर आंदळकर विजयी झाले. 

आंदळकर सर्व टप्पे पार करत फायनलला पोहचले. फायनल होती खडकसिंग पंजाबी विरुद्ध गणपतराव आंदळकर. खडकसिंग अंगापिंडा मजबूत पैलवान होता. त्याच्या ताकदीपुढे सहजासहजी निभाव लागणं कठिण काम होतं. पण आंदळकरांची डावांमधली पकड घट्ट होती. आपल्या चपळतेवर त्यांचा विश्वास होता. 

स्टेडियमवर तौबा गर्दी झाली होती. खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. सामना सुरू झाला आणि बघता बघता गणपतराव आंदळकरांनी खडकसिंग पंजाबीला अस्मान दाखवलं.

सलग दूसरी हिंदकेसरी गदा महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राची लाज राखली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.