अर्णबला गप्प करणाऱ्या कामराचा इतिहास काय आहे?

सब गोलंकारी नावाची एक भूमिका असते. म्हणजे कसं तर हा ही चांगला आणि तो ही चांगला. आमचा अजित देखील चांगला आणि देवेंद्र देखील चांगला. उद्धव देखील चांगले आणि अशोक चव्हाण देखील चांगले. सगळीकडे कशा छान छान गोष्टी. जग सुंदर आहे. माणसं छान आहे. मोगरा फुलला आहे.

मग येतात तिसऱ्या प्रकारची लोकं. अशी लोकं भूमिका घेतात. चांगल्याच चांगल आणि वाईटाचं वाईट सांगतात. कुणाल कामरा या तिसऱ्या प्रजातीतला माणूस. लोक त्याला कॉंग्रेसचं पिल्लू म्हणतात. पाकिस्तानचा हस्तक असण्यापासून ते बांग्लादेशातून फरार झालेला बेरोजगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कॉंग्रेस त्याला पैसे देते अशी टिका होत राहते. पण कुणाल कामरा आपल्या विनोदातून त्यांना विचार करायला लावतो.

विचार करायला लावणारी माणसं भारी असतात विशेष म्हणजे आपल्या जोकमधून ढवळून काढणारी माणसं ग्रेट असतात.

कुणाल कामरा कोण हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे कसं तर त्याचा भूतकाळ काढून त्यातून काही मिळालं तर सोयीचं राजकारण करायला बरं पडावं म्हणून शोध घेतला जातो. म्हणून त्याचा भूतकाळ आणि तो नक्की काय करतोय हे मांडायचा प्रयत्न.

कुणाल कामरावरती लोकं इतकी का चिडतात..?

लोकं म्हणली की संपुर्ण लोकं असा अर्थ निघतो. पण तसं नाही, समाजात थेट दोन गट पडतात. एका गटाला कुणाल कामरा लय बाप माणूस वाटतो. दूसऱ्या गटाला तो कॉंग्रेसचं पिल्लू आणि देशद्रोही वाटतो. कारण काय तर तो मोदी-शहांना थेट नडतो. तो रविश कुमार यांच्यासारखे थेट आकडेवारी सांगून घोळात घेणारे प्रश्न विचारत नाही. तो उत्तम प्रेजेंन्टेशन घेवून मोदी-शहा काय करतायत ते सांगत नाही. तर तो काय करतो, नोटबंदी झाल्यानंतर एक व्हिडीओ करतो.

त्यात काय असतं तर लाईनमध्ये उभा राहिलेला एक पोरगा लाईनमध्ये उभा राहिल्याबद्दल सरकारला शिव्या घालत असतो. तेव्हा मागचा म्हातारा म्हणतो, आपले जवान तिकडे सियाचीनमध्ये दिवसरात्र उभा राहतायत. तेव्हा हा पोरगा म्हणतो, काका मिच तो जवान आहे, चार दिवस सुट्टीला आलो तर सरकारनं लाईनीत उभा केलय. खाज असली तर या माझ्याबरोबर सियाचीनमध्ये उभा राहिला.

इतक्या सहज सोप्या शैलीत तो नडतो. त्यामुळे कुणाल कामराची भिती वाटते. तो अमित शहा आणि मोदींच थेट नाव घेतो. त्यांच्या हुकूमशाही वृत्तीवर मार्मिक टिका करतो. त्याचं म्हणणं इतकंच असतं की लोकांनी विचार करायला पाहीजे. मेंढरासारखं मागं धावू नये.

कुणाल कामराचा नेमका इतिहास काय आहे.

कुणाल कामरा मुंबईचा. शिवाजी पार्क ही त्याची कर्मभूमी. त्याला आयुष्यात काय करायचं होतं तर दुबईतल्या एखाद्या सोन्याचांदीच्या दूकानाचा मॅनेंजर व्हायचं होतं. सेटल होण्यासाठी काहीतरी करावं म्हणून तो धडपडत होता. एका ठिकाणी तो सांगतो लहान असताना त्याला डिसलेक्सिया नावाचा आजार होता. म्हणजे तारे जमिन पर पिक्चरमध्ये असतो तसा. त्यामुळे तो दिर्घ काही वाचू शकत नाही. त्यामुळे शिक्षण नावाची गोष्ट त्याच्या आजूबाजूला फिरकली नाही. आत्ता तुम्ही म्हणाल हाच मोदींना कुठल्या तोंडाने शिक्षणावरून चिडवतो. तर इथंही तो जास्त शिकलेला नाही हे स्वत:च्या तोंडाने सांगतो. मोदी दरवेळी वेगवेगळं सांगतात म्हणून तो प्रश्न विचारतो.

असो, कुणाल कामराने १७ व्या वर्षी कॉलेज सोडलं, पण त्यानं हे आपल्या घरच्यांना  सांगितलं नव्हतं. घरातून तो शाळेची सॅक पाठीवर टाकून बाहेर पडायचा तो थेट MTV च्या ऑफिसमध्ये पोहचायचा. तिथे त्याला छोटंमोठं काम मिळालं होतं. याच कामाच्या जोरावर त्याला प्रसून पांडेच्या कॉरकॉईज फिल्ममध्ये नोकरी मिळी. ॲड फिल्म क्षेत्रात सुपरव्हायजर म्हणून तो काम करू लागला. चांगल नाव होवू लागलं. चांगला पगार मिळू लागला. अस्सल मुंबईकराप्रमाणे त्याने ठाण्यात प्लॅट घेतला. घर, गाडी झालं. थोडक्यात तो रुटिंगला लागला होता.

सेट झाल्यानंतर वेगळं काहीतरी करावं म्हणून त्याने गिटार शिकण्याचा क्लास लावलां होता. त्याच काळात म्हणजे २०१३ साली काय झालं तर मुंबईतल्या लोअर परल मधल्या कॅनव्हास क्लॅबमध्ये त्याचा मित्र करुणेश तलवार हा स्टॅण्ड अप कॉमेडी करायचा. त्याला भेटण्यासाठी कुणाल तिथे गेलेला. पण करुणेश तिथे आलाच नाही. अशा वेळी वेळ मारून न्यायची जबाबदारी कुणाल कामरावरती आली. कुणाल कामराने मोक्याची क्षणी सिक्सर मारलां. अस्सल कॉमेडी झाल्यामुळे माणसं हारकली. प्रेक्षकात बसलेल्या वीर दास आणि अमोघ रणदिवे यांनी त्याला काम दिलं.

आत्ता कुणाल कामरा स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून ओळखला जावू लागला.

२०१३ ते २०१७ या दरम्यान तो फक्त आणि फक्त कॉमेडी करायचा. बायकांवरून जोक मारायचा. कंबरेखालची टाळीखावू चार वाक्य सांगायचा. म्हणजे लोकांच्या कलेकलेनं घेवून तो नाव कमावू पहात होता. अशा जोक्समध्ये स्वत:ची अशी काही मतं नव्हती. हा ही चांगला तो ही चांगला टाईप त्याच काम चालू होतं. बऱ्यापैकी नाव झाल्यामुळे त्याचं चांगल सर्कल झालं होतं.

याच सर्कलमध्ये असणाऱ्या वरुण ग्रोव्हर आणि संजय राजौरा या मित्रांनी त्याला तूझी स्वत:ची मत असली पाहीजेत अस सांगितलं. कॉमेडी ही फक्त हसवण्यासाठी नसून अचूक भाष्य करण्यासाठी आहे हे त्याच्या लक्षात येत होतं पण काय करावं ते समजत नव्हतं.

अशा वेळी देशातलं वातावरण रोहित वेमुलाच्या हत्येमुळे ढवळून निघालं. इथूनच खऱ्या अर्थाने त्याने आपल्या विनोदाला भूमिका देण्याच काम केलं. मोदी शहांसोबत त्याच्या रडारवड संपुर्ण भाजप गॅंग आली. देशभक्तीच्या नावाने कणाहिन झालेली मंडळींना तो सुमडीत घेवू लागला. त्यानंतर शट अप कुणाल नावाचा कार्यक्रम आला. आपल्या कार्यक्रमात बोलावून स्वत: बोलणारे ॲंकर असताना कुणालने वेगळेपण दिलं.

तो लोकांना बोलू देवू लागला. शट अप कुणाल नावाचा कार्यक्रम फेमस झाला. कुणालला वेगळी ओळख मिळाली पण त्याहून जास्त म्हणजे तो थेट नडू लागला.त्याच्यामुळे लोकही बोलू लागले.

रिपब्लिक टिव्हीचे प्रतिनिधी ज्या प्रमाणे प्रायव्हेसी भंग करुन समोरच्याला पिडतात तोच प्रयोग कुणाल कामराने अर्णब गोस्वामीवर काही महिन्यांपूर्वी केला. लखनऊ मधल्या विमानात दोघांची झडप झाली. कुणाल कामरा प्रश्न विचारत होता आणि अर्णब शांत होता.

कामरावर प्रचंड टीका झाली, केसेस दाखल झाल्या, त्याला विमान कंपनीने बंदी घातली. पण तो काही शांत बसत नाही, नुकताच सुप्रीम कोर्टवर ट्विट केल्या बद्दल त्याच्यावर खटला चालणार आहे.

बाकी काहीही असो लोकशाही बोलणाऱ्या कुणाल कामराचा हा वारू असाच चौफेर उधळत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Onkar says

    Shame! u guys have always been glorifying such anti-nationals.

Leave A Reply

Your email address will not be published.