श्रीमंत बाप कर्जबाजारी होवून रस्त्यावर आला, पोरानं बापासाठी “पॅनासोनिक” उभारली… 

काळ होता १८९४ चा. जपानचा वाकायामा प्रांत. त्या काळात या भागात एक जमीनदार होता. आपली बायको आणि लहान पोरं आणि आपल्याकडे असणारी संपत्ती. शेतीवाडी असणारा टिपीकल जमीनदार… 

पण या माणसाला एक नाद होता. तो नाद म्हणजे रिस्क घ्यायचा.

खिश्यात असणाऱ्या शंभर रुपयांचे हजार रुपये करायचा नाद. बर यासाठी तो काय वाईट काम करत नव्हता. तर काहीतरी छोटेखानी बिझनेस करुन संपत्ती वाढवायची अस त्याचं स्वप्न असायचं. घरात चार पाच वर्षाचा मुलगा आणि बायको. त्यांच्यासोबतच असंख्य पाहूणे, गाववाले आणि मित्रमंडळी… 

जमीनदाराचं सगळं चांगलं चाललेलं. पण लोकं त्याच्यावर डाफरून असायची. एकतर तो काळ काय नवीन करणाऱ्यांचा नव्हता. एखादा माणूस जरा काही वेगळं करताना दिसला तर प्रत्येकजण त्याला शहाणपणाचा सल्ला देवून घरी बसवायचा. आहे त्यात सुखी समाधानानं रहावं अस सांगणार आजूबाजूचं वातावरण… 

यात या जमीनदारानं एका धंद्यात रिस्क घेतली. रिस्क मोठ्ठी होती. पैपाहूणे, मित्रमंडळी सगळे रिस्क घेवू नको म्हणून सांगत होते पण जमीनदार काय ऐकायच्या तयारीत नव्हता. सगळे पैसे धंद्यात लावून बसला. धंदा बुडाला आणि होती ती श्रीमंती पण गेली… 

घरदार, जमीन सगळं विकायला लागलं. जमीनदार आपल्या बायका पोरांना घेवून रस्त्यावर आला. रस्त्यावर म्हणजे शब्दश: रस्त्यावर आला. आत्ता करण्यासारखं काहीचं नव्हतं. बायको आणि पाच वर्षांच पोरगं. गाव सोडलं आणि दूसऱ्या एका गावात कुटूंब सेटल झालं.. 

पडेल ते काम करायला सुरवात केली. जुन्या श्रीमंतीत कामाची सवय नव्हती. पण हार मानायची नव्हती. दूसरीकडे आम्ही तर आधीच सांगितलेलं म्हणून टोमणे सुरू झाले होते..पण दिवस सरायला लागले.. 

जमीनदाराच्या पोराचं वय १० वर्ष झालं. आत्ता पोरानं एका दुकानात काम करायला सुरवात केली. अवघं दहा वर्षाचं पोरगं पण दिवसरात्र काम करायचं. नाही म्हणायला कुठेतरी आठवणीत श्रीमंती होती त्याच्या.. 

दिवसभर दुकानात काम करायचं आणि झोपायचं. पैसे नसल्यानं शाळा सुटली होती. एक वर्ष झालं आणि दुकानदाराने पोराला कामावरून काढून टाकलं. कारण काय तर ते दुकान पण चालत नव्हतं.. काम सोडून चालणार नव्हतं.. 

वर्ष दोन वर्ष किरकोळ काम करण्यातच गेली. बापाची जूनी श्रीमंती आणि आपल्या बालपणातच आलेलं कष्ट हे दोन्ही घेवून पोरगं नवं काहीतरी करायचं बघत होतं.. 

एका वेळी ओसाका नावाच्या एका इलेक्ट्रिक कंपनीत पोराला जॉब मिळाला. दिवस निघू शकतो इतके पैसे मिळणार होते. पोरानं कामाला सुरवात केली. एक एक करत पोराचं वय आणि कामाचा अनुभव वाढत गेला. 

आत्ता हा पोरगा २२ वर्षाचा झाला. लग्न झालं. कंपनीत प्रमोशन होवून पोरगा आत्ता इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर झाला. पहिल्यासारखी श्रीमंती तर आली नव्हती पण सेटल झालेलं. दोनवेळचं खावून सुखी राहू या लेव्हलला पोरगं आलं… 

पण पोराच्या डोक्यात वेगळीच गणितं होती. जी गणित बापाच्या डोक्यात असायची तीच पोराच्या डोक्यात होती.. या पोरानं एक इलेक्ट्रिक सॉकेट केलं आणि मालकाला दाखवलं. मालकानं याचं काहीही होणार नाही अस सांगितलं. तेव्हा त्यानं या सॉकेटवर स्वत: काम करायचं ठरवलं आणि १९१७ च्या काळात कंपनीचा रितसर राजीनामा देवून टाकला.. 

इथं परत लोकं आली. बापाला शहाणपणा शिकवणारी लोकं. अस करु नको. हातातला जॉब सोडू नको. परत तेच. हा पण बापाचा पोरगा होता. सगळ्यांना फाट्यावर मारून काम सुरू केलं.  

घराच्या बेसमेंटमध्येच काम सुरु केलं. लोकांना एकत्र केलं आणि एक छोटेखानी कंपनी सुरू केली. या कंपनीचं नाव होतं, 

पॅनासोनिक

पॅनासोनिक कंपनीची स्थापना अशी झालेली. कोनोसुके मात्सुशिता अस या पोराचं नाव. कंपनी सुरू झाली. सगळं रितसर सुरू झालं आणि अडचणी सुरू झाल्या. एकएक करुन माणसं गेली. विकाविकी सुरू झाली आणि आपल्या वडिलांवर जी वेळ आली होती तीच या पोरावर आली. परत एकदा गावगोळा झालं. पुन्हा चर्चा सुरू झाल्या. काही गरज होती का नोकरी सोडायची, चांगल चाललेलं का बंद केलं… 

पण पोरगं ठाम होतं. आत्ता नाही.. वडिलांना सोडायला सांगितलं पण मी सोडणार नाही.. परत वेग घेतला. जे हातात होतं त्यावर डाव लावले आणि एक ऑर्डर आली. एक हजार सॉकेट तयार करायचे होते. पोरानं ते काम करुन दाखवलं आणि एकामागून एक ऑर्डरी सुरू झाल्या.. 

कट टू सालं होतं १९८९ चं.

हा मुलगा ९४ वर्षांचा झाला होता. एकदम म्हातारा. जेव्हा तो मेला तेव्हा त्याची कंपनी ४२ बिलीयन डॉलरची झालेली. जगातली सगळ्यात बाप कंपनी पॅनासोनिक… पोरानं जाताजाता काय सोडलं तर बापाचं स्वप्न पुर्ण करुन सोडलं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.