पुण्याचे कॉंग्रेस उमेदवार मोहन जोशी नेमके कोण ?

गेली कित्येक दिवस पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु होती. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ पण निवडणुका अवघ्या तेवीस दिवसावर आल्या तरी उमेदवार कोण असणार हे निश्चित होत नव्हते.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या पासून ते मराठा महासंघाचे प्रवीण गायकवाड, उल्हास पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नगरसेवक अरविंद शिंदे अशा अनेक नावांची चर्चा झाली. प्रवीण गायकवाड यांनी पक्ष प्रवेश केला आणि त्यांचे तिकीट अल्मोस्ट फायनल झाले आहे अशा बातम्या मिडियाने लावल्या. पण या सर्व निव्वळ अफवा ठरल्या. 

काल माजी आमदार मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर करून पक्षनेतृत्वाने चर्चेचा धुरळा खाली बसवला. तेव्हा काही जणांना प्रश्न पडला की हे मोहन जोशी नेमके कोण? कोणी कोणी चुकून सिनेकलाकार मोहन जोशी यांचाच फोटो शेअर केला.

मोहन जोशी यांची सर्वात महत्वाची ओळख काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी आहे. गेली पंचेचाळीस वर्ष मोहन जोशी कॉंग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत.

पुण्यात एका गुजराती दांपत्याच्या घरी मोहन जोशी यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झालं. घरच्या परिस्थितीमुळे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करावी लागली. सुरुवातीला त्यांनी गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. त्यानंतर स्थानिक मराठी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून रुजू झाले.

पत्रकारीता करत असताना त्यांनी पुणे शहराशी संबंधित अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाणीव झाली. याच काळात आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. पत्रकारीता करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे त्यांचा कल वाढला व १९७२-७३ च्या सुमारास युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

युवक कॉंग्रेसमध्ये काम करत असताना इंदिरा गांधी यांच्या  सभेचे आयोजन वगैरे जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. ते दहा वर्षे पुणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ही होते. 

१९९९ साली शरद पवार यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातले अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये गेले यात कॉंग्रेसचे पुण्याचे खासदार विठ्ठलराव तूपे यांचा पण समावेश होता.

पण मोहन जोशी यांनी पक्ष बदलला नाही. याचेच बक्षीस म्हणून १९९९ सालच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली .पण त्यावेळी भाजपाच्या प्रदीप रावत यांनी त्यांचा पराभव केला.  मोहन जोशी यांची २००५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. २००८ साली विधानपरिषदेवर आमदार म्हणून त्यांची निवड झाली.

कॉंग्रेस विचारसरणीचे खंदे शिलेदार म्हणून मोहन जोशी यांना ओळखलं जातं. महात्मा गांधी यांच स्वप्न असलेल्या हरिजन सेवक संघ या संघटनेचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय स्वतः गिरणी कामगार म्हणून काम केलेले असल्यामुळे कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे. कित्येक वर्ष पुणे जनरल वर्कर्स युनियनचे ते अध्यक्ष होते. राजस्थान , छत्तीसगड , गुजरात विधानसभा निवडणूकीवेळी पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी काम ही पाहिलं होतं.

मोहन जोशी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही.

विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी अशा मातब्बर नेत्यांच्या जोरावर कॉंग्रेसने पुण्याला आपला बालेकिल्ला बनवले होते. पण आता तशी परिस्थिती उरली नाही. पुणे कॉंग्रेसची अनेक शकले झालेली आहेत. पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संपर्क नाही.

त्यातच भाजपाने गिरीश बापट यांच्यासारख्या ताकदवान उमेदवाराला तिकीट देऊन आव्हान अधिक तगडे बनवलेले आहे. त्यांना हरवण्यासाठी मोहन जोशी यांना आकाश पाताळ एक करावे लागणार आहे हे निश्चित.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.