कॅशमध्ये आयफोन घेतला तरी, या जमाना गाजवलेल्या मोबाईल्सची सर त्याला येणार नाही…

आमच्या चौकातल्या रम्यानं नवा आयफोन घेतला, तेही कॅशमध्ये. नुसतं फोन घेऊन थांबला नाही, विकत घेतानाचं एक रील बनवलं, त्याला चांगले व्ह्यूज आले म्हणून थँक यू म्हणणारं आणखी एक रील बनवलं. कधी नव्हत ते हातात फडकं घेऊन घरातला आरसा पुसला आणि त्याच्यावर हातातला आयफोन दिसेल असा फोटो काढला. आज कालची पोरं आयफोनच्या जीवावर उड्या मारतायत, पण एक जमाना होता जिथं आपण नोकियाच्या बटणाच्या फोनवर पोरींना इम्प्रेस केलंय.

विषय निघालाच आहे, तर जरा या फोनच्या दुनियेतले राजा फोन कोणते होते, याची उजळणी करूयात.

सुरुवात अर्थातच, नोकियापासून. कारण बादशहा हा बादशहा असतोय. नोकिया म्हणलं, की आपल्याला ती फेमस ट्यून आठवते, मग कनेक्टिंग पीपल आणि जोडल्या जाणाऱ्या हाताचं चित्र. नोकियानं नुसती काही वर्ष नाही तर एक जमाना गाजवला. 

नोकियाचा पहिला गाजलेला फोन आपल्या सगळ्यांना माहितीये, पण तो हुकमाचा एक्का शेवटी बघू, आधी जरा इतर मॉडेल्सबद्दल. 

WhatsApp Image 2022 08 06 at 8.38.43 PM
Nokia 6600

हा विषय सुचल्यावर सगळ्यात आधी नोकिया 6600 आठवतो. २००३ मध्ये आलेल्या या फोनला जॉयस्टिक होती, ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा होता, ज्याच्यात फोटो काढण्यात एक वेगळीच शान होती. ८५० एमएएचची बॅटरी होती, पण एकदा चार्ज केला की दोन दिवस टेन्शन नसायचं.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.42.06 PM
nokia 6233

असलाच एक बाप मोबाईल होता नोकिया ६२३३. याचा कॅमेरा २ मेगापिक्सल होता, बॅटरी ११०० एमएएच होती, फोटोच नाही व्हिडीओही दिसायचे पण स्नेकची गेम थ्रीडी आणि रंगीत करुन चव घालवली.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.43.03 PM
Nokia 3315

 

स्नेकवरुन आठवलं, नोकियाचा ३३१५ वापरला होता का ? फोन दिसायचा बारका पण वजनात होता, त्याच्यावर गेम होत्या, निळ्या रंगाला सूट करणाऱ्या पांढऱ्या लाईट होत्या. चार्जिंग करुन ठेवला की आठवडाभर बघावं लागायचं नाही. आजही आई मावशीला फोन लाव म्हणली, की 3315 असता तर बरं झालं असतं असं वाटून जातं.

 याच्यासारखाच ३३१० पण होता, ज्याचं फोरजी मॉडेल नोकियानं २०१८ मध्ये आणलं, पण ते बेक्कार पडलं.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.44.13 PM
nokia 7610

नोकिया ७६१० तर कित्येकांनी कसला भारी दिसतोय, या एकाच बोलीवर घेतला होता. स्पेसिफिकेशन वैगेरेचा विषयच नव्हता, भारी दिसला आणि घेतला असा कारभार.

याचंच पुढचं मॉडेल सुपरनोव्हा होतं, एकदम क्लासी विषय. एका पोरगीला द्यायचा विचार होता, पण तेव्हा आपल्याकडं रिचार्जला पुरतील इतकेही पैसे नव्हते. पण हा क्वालिटीमध्ये व्हिडीओ बघायला हा फोन बाकी भारी होता.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.45.55 PM
Nokia N73

सेल्फीचा ट्रेंडही आला नव्हता, तेव्हा नोकियानं N73 काढला, या फोनमध्ये फ्रंट कॅमेराही होता, ज्याच्यात फक्त मुंग्या दिसायच्या पण भारी वाटायचं. त्यात थीम आणि गाण्याची रिंगटोन लावता यायची, त्यामुळं पैसे वसूल झाले वाटायचं.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.46.57 PM
Nokia N91

फ्युजा उडवणारा एक फोन होता तो म्हणजे नोकिया N91. अरा बाप कसलाच विषय, एन सिरीजमधल्या या फोनमध्ये स्क्रीन, चार बटणं, एक जॉयस्टिक आणि खाली म्युझिक प्लेअर दिसायचा. मग फ्लॅप अलगद खाली ओढल्यावर कीपॅड दिसायचं. पण सगळ्यात भारी गोष्ट होती, ती म्हणजे ऑडिओ क्वालिटी.

नोकियानं म्युझिक प्लेअर आणि हेडफोन जॅक देत थेट आयपॉडला नडायचा प्रयत्न केला होता. त्यात यूएसबी केबल, वायफायवरुन गाणी डाऊनलोड करायची सोय, यामुळं नोकियानं विषय गंभीर करुन टाकला होता.

नोकिया एकटाच बादशहा नव्हता, त्याला टक्कर देणारी आणखी एक कंपनी होती, मोटोरोला आणि मोटोरोलाचा विषय एन्ड फोन होता, मोटो रेझर V3.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.48.00 PM
Moto razr v3

एकतर फ्लॅपचा मोबाईल म्हणजे असा उघडायचा, त्यात एक्सटर्नल ग्लास, कॅमेरा लई काय काय, या फोनची क्रेझ इतकी होती, की छय्या छय्यावाले मोबाईलही याच्यासारखेच बनवण्यात आले होते. मोटोरोलाच्या या लेझर सिरीजनं हवा केली, त्यांचा मोटो ME पण चांगलाच गाजला होता. एखादं पोरगं मोटोरोला वापरतंय म्हणजे ते कुल आहे, असा शिक्का फिक्स बसायचा.

जुन्या मोबाईलचा विषय चाललाय आणि सोनीचं नाव येणार नाही असं कसं होईल ?

 साल २००५ , इमरान हाश्मीला मनापासून गुरू मानलं होतं. वांदा एवढाच होता की त्याची गाणी घरात असताना बघणं किंवा ऐकणं शक्य नव्हतं. यातून तारलं ते सोनी एरिक्सन वॉकमन सिरीजनं.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.49.05 PM
सोनी एरिक्सन W800, सोनी एरिक्सन W550 आणि सोनी एरिक्सन लाईव्ह विथ वॉकमन

कानात सिस्टीम लावल्यासारखा चायना मोबाईलसारखा आवाज याला नव्हता, यात गाणी फील घेऊन ऐकता यायची. सोनी एरिक्सन W800, सोनी एरिक्सन W550 आणि सोनी एरिक्सन लाईव्ह विथ वॉकमन हे या सिरीजमधले लई भारी फोन. ३० तासांची बॅटरी लाईफ, ५१२ एमबी मेमरी, डिझाईन या सगळ्याच गोष्टीमुळं हे सोनीचे फोन गाजले. ९०’s किड्सला दुनियाभरची गाणी पाठ आहेत, ती याच सोनी एरिक्सन वॉकमन सिरीजमुळं.

WhatsApp Image 2022 08 06 at 8.51.21 PM
Samsung Corby

 

आता जरा सॅमसंग कॉर्बीबद्दल आठवून बघा. कित्येकांच्या आयुष्यातला पहिला टचस्क्रीन फोन. आत्ताच्या फोनशी तुलना केली, तर हा मोबाईल कित्येकांना बाद वाटू शकतो. पण बटणाच्या फोनची लाज वाटण्याच्या दिवसात नऊ साडेनऊ हजारात यानीच आधार दिला होता. याचा कॅमेरा साधा होता, हेडफोन बसायचा नाही, टच पण अगदी दाबून करावं लागायचं, पण कॉर्बी, कॉर्बी प्रो यांचा नाद नव्हत. 

WhatsApp Image 2022 08 06 at 8.52.57 PM
Nokia 1100

 

नोकिया 1100. मोबाईलच्या दुनियेतला रजनीकांत. हा फोन फुटला, असं सांगणारा एकही माणूस आजवर भेटला नाही. 1100 हँग व्हायचा नाही, याची बॅटरी शेवटची कधी चार्ज केलेली हे आठवावं लागायचं, चार्जिंगच्या एका काडीवरही दिवस निघायचा, मोबाईलकडं न बघता टायपिंगही आपण याचमुळं शिकलो आणि बोर्डाच्या पेपरला घरच्यांनी स्मार्टफोन काढून घेतला तेव्हा नटीला मेसेज करायची सोय याच्यामुळंच लागली. 

स्नेकची गेम, खिशात ठेवल्यावरचं वजन आणि पहिल्या मोबाईलचं सुख, या गोष्टींमुळं काही लाखातले मोबाईल जरी आले, तरी 1100 च्या स्थानाला जरासाही धक्का लागू शकत नाही.

जसजशी टेक्नॉलॉजी बदलत गेली, तसे हे मोबाईल डिसकंटीन्यू झाले आणि आता आयफोन, वनप्लस, रेडमीच्या गर्दीत त्यांच्या फक्त आठवणी टिकल्यात. पण त्याचा लोड नाही, कारण या आठवणी 1100 च्या बॅटरी लाईफसारख्या आहेत, कायम टिकणाऱ्या.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.