दिल्लीत दूध वाटणाऱ्या पोराने राजकारणात राजेश पायलट होवून दाखवलं
राजाबाबू पिक्चरमधला ओपनिंग सीन. गोविंदाच्या एन्ट्री पूर्वी कादरखान बंगल्याच्या हॉलमध्ये बसलाय. तिथेच वरती गोविंदाचे वेगवेगळे फोटो लटकवलेत. एका फोटोत गोविंदा डॉक्टर झालाय तर दूसऱ्या फोटोत गोविंदा वकिल झालाय. तिसऱ्या फोटोत गोविंदा नेता झालाय. घरात आलेला पोस्टमन कन्फ्यूज होवून जातो.
राजाबाबू पिक्चरमधला हा सीन कुणाच्या आयुष्यात परफेक्ट बसत असेल तर राजेश पायलट यांच्या. फक्त पिक्चरचा राजाबाबू यापैकी काहीच नव्हता पण पायलट खऱ्या आयुष्यात सर्वकाही होते.
राजेश पायलट हे मुळातच राजेश पायलट नव्हते. त्याचं खरं नाव राजेश्वर प्रसाद. माणसं फिल्म लाईनला आली की स्वत:च नाव बदलतात. तसं यांनी पोलिटिक्समध्ये आल्यानंतर स्वत:च नाव बदललं.
राजेश्वर प्रसाद अर्थात राजेश पायलट कधीकाळी ल्युटियन्स दिल्लीत दूध वाटणाऱ्या पोऱ्याचं काम करत होते, त्यानंतर ते एअरफोर्समध्ये भरती झाले, १९७१ सालचं युद्ध देखील लढले, अपघाताने गांधी परिवाराच्या ओळखीचे झाले, पुढे राजकारणात आले आणि राजेश पायलट झाले.
आज सचिन पायलट काय करतात यांच्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलं आहे, पण राजेश पायलट या माणसाच्या बेसबद्दल माहित देखील हवं. कसय,
बापाबद्दल पुरेशी माहिती असली तर पोराच्या इच्छाशक्तीचा अंदाज लागू शकतो, म्हणूनच हा लेख.
राजेश पायलट यांचा जन्म यू.पी. मधील गाझियाबादच्या एका छोट्याश्या गावातला. त्यांचं मूळ नाव राजेश्वरप्रसाद पण घरी सगळे राजेश म्हणायचे.
वडील मिलिट्रीत शिपाई होते. घरात शेतीचं वातावरण होते. वडीलांची इच्छा होती की राजेशने भरपूर शिकून मोठे नाव कमवावे. राजेश ही आज्ञाधारक होते त्यांनी ही वडीलांना शब्द दिला शिकून यशस्वी होण्याचा. त्यांनी मनापासून अभ्यास केला. गाझियाबाद वरून दिल्लीला शिकण्यास आल्यानंतर सुरवातीचा काळ त्याच्यासाठी संघर्षाचा होता.
शिक्षण घेत असताना ते आपल्या चुलत भावाबरोबर एका डेअरीत राहत होते. याच काळात राजेश ल्युटीयनस दिल्ली जिथे अनेक मंत्री, खासदार राहतात त्या भागात दूध वाटत असत. याच काळात त्यांनी अभ्यास केला आणि सैन्यात भरती झाले. लगेचच भारतीय वायू दलात ही त्यांची निवड झाली अणि तिथ ते रुजू झाले.
राजेश हे भारतीय वायुदलात फायटर पायलट होते. त्यांनी १९७१ सालचे युद्ध हि लढले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती दिल्लीला झाली. या काळात त्यांची मैत्री संजय गांधी यांच्यासोबत झाली.
या मैत्रीचं कारण होतं कॅप्टन रॉल्फ.
कॅप्टन राल्फ यांनीच सुरवातीच्या काळात राजेशजीना विमान उडवण्याचे धडे दिले होते, नंतरच्या काळात याच कॅप्टन राल्फ यांनी संजय गांधीना हि विमान उडवायला शिकवले होते. त्यांच्यामुळे ते संजय गांधींच्या ओळखीचे झाले. पुढे मैत्री घट्ट झाली आणि राजेश्वर प्रसाद यांनी वायुदलातील नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निश्चय केला.
ठरवल्याप्रमाणे नोकरी सोडली आणि राजकारणात आले.
राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजेश इंदिराजींना भेटायला गेले. त्या काळात पक्षासाठी जोखीम पत्करणाऱ्या तरुणांना संजय गांधी व इंदिराजी प्रोत्साहन देत. राजेशजीनी उत्तर प्रदेशच्या बागपत मधून लोकसभा लढवायला आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याकाळी बागपत मध्ये चौधरी चरण सिंग यांचा दबदबा होता. चौधरी चरण सिंग जाट समाजाचे मोठे नेते होते. नंतर ते पंतप्रधान ही झाले .
इंदिराजींनी तेव्हा राजेशना विचारले होते,
“तुम्ही गुज्जर आहात तरीपण तुम्हाला जाठ बहुल भागातून निवडणुक का लढवायची आहे?
तिथे हिंसा होण्याची शक्यता आहे तुम्हाला भीती वाटत नाही का ?”
राजेश ठामपणे उत्तरले जो बॉम्बला घाबरला नाही तो लाठ्यांना काय घाबरणार .
पण काही कारणास्तव त्यांना तिथून तिकीट मिळाले नाही. पण त्यांनी निराश न होता प्रयत्न चालूच ठेवले.
शेवटी त्यांना भरतपूर राजस्थान मधून तिकीट देण्यात आले .
राजेशजीनां उमेदवारी अर्ज भरायचा होता. ते कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहचले . तोवर कार्यालयात इंदिराजींनी कोणीतरी पायलट पाठवला आहे याची जोरदार चर्चा सुरु होत्या. इतक्यात राजेशजी तिथे पोहचले अर्ज भरण्यास सुरवात झाली.
सर्वांचा लक्ष या नवीन चेहऱ्याकडे लागलेले होता. राजेशनी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला आपले नाव राजेश्वर प्रसाद असे सांगितले. ते एका कार्यकर्त्यांने ऐकले तो मागून ओरडलाच,
“साहेब इथे सर्वजण तुम्हाला पायलट म्हणून ओळखतात ,तुम्ही राजेश पायलट या नावानेच निवडणुकीत लढा.”
राजेश हसून बोलले नाव काहीपण लिहितो खरं निवडून द्या. सर्वत्र हश्या पिकला. त्याठिकाणी मुळच्या राजेश प्रसाद यांनी राजेश पायलट नावाने अर्ज भरला व त्यानंतर त्यांचे राजेश पायलट हेच नाव कायम राहिले.
राजेश पायलट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाचवेळा विविध मंत्रिपदं भूषवली. मंत्र्यांच्या घरी दुध वाटणारा पोरगा नंतर दीर्घकाळ त्यापेकीच एका बंगल्यात केंद्रीय मंत्री म्हाणून राहिला.हा प्रवास थक्क करणारा होता.
जनतेच्या मनाला स्पर्श करण्याची कला पायलट यांना अवगत होती. त्यांची शैली नम्र व तितकीच बेधडक होती. स्वत:च राजकिय मुल्य तयार करण्यासाठी पक्षांतराची गरज नसते तर धमक लागते हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं पण ही कला मात्र पोराला जमली नाही असच म्हणावं लागतं.
हे ही वाच भिडू.
- टिम संजय गांधी विरुद्ध टिम राहूल गांधी, कोण ठरलं वरचढ..?
- राजीव गांधीचा तो दुर्मिळ व्हिडीओ, ज्यातून समजत ते राजकारणात कसे आले होते.
- संजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली !