संजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली !

२८ जुलै १९७४.

मेनका आनंद नावाच्या १७ वर्षीय मॉडेलने ‘बॉम्बे डाईंग’साठी केलेल्या ‘बोल्ड’ जाहिरातीचे दिल्लीतील रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे होर्डींग्ज एका रात्रीत गायब झाले होते.

असं सांगण्यात येतं की होर्डींग्ज थेट पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावरून हटवण्यात आले होते. कारण दुसऱ्याच दिवशी एक महत्वाची घोषणा होणार होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मोठे पुत्र संजय गांधी यांच्या साखरपुड्याची घोषणा.

२९ जुलै १९७४ रोजी ती घोषणा झाली आणि संपूर्ण देशाला मेनका आनंद नावाची  १७ वर्षीय मॉडेल नेमकी आहे कोण, जी गांधी घराण्याची सून बनणार होती याची उत्सुकता लागली होती. ठिकठिकाणी या नावाची चर्चा व्हायला लागली होती.

maneka add
मेनका गांधींनी केलेली टॉवेलची जाहिरात फोटो- ओल्ड इंडियन अॅड

गमतीची गोष्ट अशी की मेनका आनंद यांच्या ज्या टॉवेलच्या ‘बोल्ड’ जाहिरातीचे होर्डींग्ज पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावरून एका रात्रीत हटविण्यात आले होते, ती जाहिरात बघूनच संजय गांधी आपल्यापेक्षा १० वर्षे लहान असलेल्या या मॉडेलच्या प्रेमात पडले होते, असं सोनाली पिमपूतकर लिहिलेल्या लेखात म्हंटलय.

मेनका आनंद यांच्या जवळच्या नात्यातली बहिण विनू कपूर संजय गांधी यांची मैत्रीण होती. तिच्या लग्नाच्या कॉकटेल पार्टीमध्येच संजय आणि मेनका यांची भेट झाली होती. त्यानंतर या भेटीगाठी वाढत गेल्या आणि एक क्षण असा आला की संजय गांधींना आपण मेनका यांच्या प्रेमात आहोत हे लक्षात आलं.

….जेव्हा इंदिरा गांधींनी मेनका यांना भेटायला बोलावलं

दिल्लीच्या वर्तुळात जेव्हा या प्रेम कहाणीची चर्चा व्हायला लागली तेव्हा संजय गांधी मेनका यांच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घालायला गेले. मेनका यांचे वडील कर्नल आनंद हे तर लग्नासाठी राजी होते, फक्त संजय यांच्या आई इंदिरा गांधींचा निर्णय नेमका काय असेल याविषयी ते साशंक होते.

संजयने आधी आपल्या आईची परवानगी घ्यावी, असं त्यांनी संजयला सांगितलं.

इंदिरा गांधीसाठी आपला मुलगा लग्न करण्यासाठी तयार झालाय हीच गोष्ट खूप मोठी होती. फक्त मेनका आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून योग्य आहे का, याविषयी जरा त्या संभ्रमात होत्या. त्यामुळे इंदिरा गांधींनी मेनका गांधींना भेटायला बोलावलं.

इंदिरा गांधींनी भेटायला बोलावल्यामुळे मेनका नर्व्हस झाल्या होत्या. थेट इंदिराजींशी भेटायचं आणि त्यांना नेमकं काय बोलायचं याबाबतीतला हा नर्व्हसनेस होता. कारण त्यापूर्वी या दोघींची कधीच भेट झाली नव्हती आणि आता थेट लग्नाचा विषय कानावर गेल्यानंतरच भेटण्यासाठी जायचं तर ते त्यांच्यासाठी थोडंस अवघडल्यासारखं झालं होतं.

शेवटी मेनका इंदिराजींना भेटायला गेल्या. इंदिरा-मेनका यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. इंदिरा गांधींना २ गोष्टींची चिंता होती. एकतर कुठल्याही मुलीने आपल्या मुलासोबत आयुष्य घालवणं, ही एक कसरत असणार याची त्यांना जाणीव होती आणि दुसरं म्हणजे संजय मेनका यांच्यापेक्षा १० वर्षे मोठे होते. दोन्हीही गोष्टींची इंदिराजींनी मेनकांना व्यवस्थित जाणीव करून दिली. इंदिरा-मेनका भेटीवर संजय श्रीवास्तव यांनी आपल्या लेखात प्रकाश टाकलाय.

मेनका मात्र मागे हटायला तयार नव्हत्या. त्या देखील संजयच्या प्रेमात बुडालेल्या होत्याच. या दोन्हीही गोष्टींचा आपल्याला फरक पडत नसल्याचं त्यांनी इंदिराजींना सांगितल्यानंतर शेवटी इंदिरा गांधी लग्नासाठी तयार झाल्या आणि २९ जुलै १९७४ रोजी संजय आणि मेनका यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली.

एका ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट..

साखरपुड्यानंतर दोनच महिन्यांनी म्हणजे २९ सप्टेंबर १९७४ या दिवशी संजय गांधी यांचे खास मित्र आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय मोहोम्मद युनुस यांच्या घरी संजय आणि मेनका याचं लग्न पार पडलं.

लग्नासाठी दोन्ही परिवारातील अतिशय जवळच्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं. माध्यमांना तर लग्नापासून अगदीच दूर ठेवण्यात आलं. पण पत्रकार शेवटी पत्रकार त्यांना स्टोरी हवी असते आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात.

माध्यमांपासून दूर ठेवण्यात आलेल्या या लग्नाचा एक  वेगळाच अँगल ‘इलेस्ट्रेटेड विकली’ने शोधून काढला. ‘इलेस्ट्रेटेड विकली’नुसार मेनका या ‘सिख’ होत्या. संजयच्या आई इंदिरा या ‘हिंदू’ आणि वडील फिरोज हे ‘पारसी’ आणि लग्न पार पडलं होतं मोहोम्मद युनस या एका ‘मुस्लीम’ व्यक्तीच्या घरात. त्या अर्थाने हे एक परफेक्ट ‘सेक्युलर’ लग्न होतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.