मुंबई पोलीस आयुक्तांच्या त्या प्लॅनमुळे ‘बाळासाहेब व मुंडे’ यांच्यात कोल्डवॉर सुरू झालं..

90 च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधायला सुरुवात केली होती. पोलिस अधिकारी जीव मुठीत धरून आपली ड्युटी करायचे कारण 90 च्या दशकात गुन्हेगारी वेगाने मुंबईत वाढत होते. गुंडांनी केलेल्या गोळीबारात पोलिसांचे बळी जात होते यामुळें मुंबई पोलीस क्राईम ब्रांच भेदरलेली होती.

अशा वेळी एक पोलिस आयुक्त आले आणि त्यांनी सुरू केलेल्या एका वेगळ्या पॅटर्नमुळे राजकारणात उलथापालथ तर झालीच पण सगळे गुन्हेगार दचकून राहू लागले कारण या आयुक्तांनी एक खतरनाक प्लॅन आणला होता हा किस्सा हुसैन झैदी यांच्या पुस्तकातून. 

1995 साली मुंबई पोलिसांची वाढत्या गुन्हेगारी विषयी एक बैठक झाली.

या बैठकीत पोलिस आयुक्त राम देव त्यागी यांनी एक फतवा काढला आणि त्या बैठकीत बसलेले अधिकारि गारच झाले. त्यांनी काढलेला फतवा असा होता की ,

प्रत्येक पोलिसाने आपापल्या क्षेत्रातल्या किमान दहा गुंडांना तरी शूट आऊट मध्ये माराव… असा आदेश सुद्धा त्यांनी जारी केला. एन्काऊंटर करण्यावर केवळ गुन्हे शाखेचीच मक्तेदारी का असावी ? प्रत्येक पोलिस त्यात सहभागी होऊ शकतात असं त्यागी यांनी जाहीर केलं.

त्या बैठकीत एका अधिकाऱ्याने त्यागी यांना क्रॉस केलं तो म्हणाला की प्रत्येक चकमकीत गुंडांना ठार मारणे शक्य असतेच असं नाही…!

त्यावर त्यागिनी दिलेलं उत्तर पोलिसांमध्ये फार गाजलं, त्यागी त्याला म्हणाले पोरगं कसं जन्माला घालायचं हे तूझ्या बापाला शिकवू नकोस. राम देव त्यागी हे आजवरच्या मुंबई पोलिसांमधील सगळयात खतरनाक आणि बेडर पोलिस अधिकारी होते. मनात येईल ते स्पष्टपणे सांगून टाकायचे. 

जेव्हा दक्षिण मुंबईत दागिन्यांच्या दुकानात चोऱ्यांच सत्र वाढलं त्यावर त्यागीनी लगेच उपाय शोधला आणि जव्हेरी बाजाराजवळ एक सभा घेतली जी की लोकं अजूनही विसरलेले नाहीत. त्यात ते लोकांना उद्देशून म्हणाले,

तुम्ही सगळ्यांनी दुकानात हॉकीची स्टिक ठेवावीत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चोर दुकानात आले की त्यांना स्टिकने असं काही बडवा की त्याचं अंग काळंनिळं पडलं पाहिजे. त्या माराने चोर मेला तर पोलिस तुमच्या पाठीशी असतील. मी तुम्हाला शब्द देतो.

या सभेची अनेक जणांनी टर उडवली. लोकांना कायदा हातात घ्यायला लावून , इतरांना मारायला प्रोत्साहन देणारे पोलिस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. ते जिथं जातील तिथं त्यांची दहशत होती. पोलिस आयुक्त होण्याआधी त्यागी मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी होते.

1993 साली धार्मिक दंगलीच्या वेळी त्यांनी त्यांच्या माणसांना सुलेमान बेकरीच्या वरच्या मशिदीत घुसायला सांगितलं होतं त्यात नऊ निर्दोष मुसलमान मारले गेले होते.

राम देव त्यागी यांचा हा बेधडक स्वभाव बाळासाहेब ठाकरेंना आवडत असायचा. त्यागी हे ठाकरेंचे आवडते तर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंचे नावडते होते. यामुळे गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात एक प्रकारचा कॉल्ड वॉर सुरु झाला होता.

राजकारणात या राम देव त्यागी यांनी केलेल्या अनेक विनाकारण ‘त्यागामुळे ‘ सरकार अडचणीत आलेल होतं त्यामुळे गोपीनाथ मुंडें यांना त्यागी पटत नव्हते.

खंडणी वसूल करणारे, जमिनीचे व्यवहार, चित्रपट क्षेत्र सगळीकडे त्यागिंचा दरारा होता. गुंडांना फक्तं फटक्यांची भाषा समजते असं त्यांचं ठाम मत होतं. गुंडांच्या मनात मृत्यूची आणि मुंबई पोलिसांची भीती त्यांनी निर्माण केली.

अनेक जिगरबाज अधिकारि त्यांनी जमवले आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट पथक स्थापन केले. अंधेरी ते बांद्रा भागात प्रदिप शर्मा आणि सत्यपाल सिंग होते तर अर्ध्या दक्षिण मुंबईत परमबीर सिंग, प्रफुल्ल भोसले आणि विजय साळसकर प्रमुख होते. दया नायक सुद्धा आघाडीला होते.

दया नायक, साळसकर, भोसले आणि शर्मा यांनी अरूण गवळी आणि छोटा शकील यांच्या टोळीतील एकूण 300 माणसं मारली होती. 1993 ते 2003 या काळात मुंबईत सहाशे गुन्हेगार मारले गेले होते.

त्यागी यांनी कधीच गृहमंत्र्यांसमोर मान तुकवली नाही. शेवटी पोलिस आयुक्त पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके असल्याचा फायदाही झाला नाही. आधी गोळ्या घाला आणि मग बोला असं धोरण आणलेला एकमेव आयुक्त म्हणून राम देव त्यागी यांचा दरारा होता. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.