४ वर्षांमध्ये २२ बदल्या झाल्या तरिही ते झुकले नाहीत…

वारंवार होणारी बदली हा शब्द ऐकताच तुकाराम मुंढे यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण तुम्हाला सांगितलं भारतात एक माणूस असाही होता ज्याच्या ४ वर्षात २२ बदल्या झालेल्या तर? चटकन विश्वास बसणार नाही पण त्याचं माणसाला पुढे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. हिंदी साहित्यातले ते एक मातब्बर होते आणि त्यांची भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यसभेवर वर्णी लागली होती असं सांगितलं तर….

कोण असेल हा माणूस, तर या माणसाचं नाव आहे…

रामधारी सिंह “दिनकर”

हिंदीतले मोठ्ठे साहित्यिक कवी आणि निबंधकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या कवितेच बलस्थान होतं ते राष्ट्रभक्ती, वीररस म्हणूनच त्यांचा उल्लेख राष्ट्रकवी म्हणून केला जातो.

रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ साली बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील सिमरिया गावात झाला. साध्या गरिब अशा शेतकरी घरातला हा माणूस. रामधारी सिंह दिनकर दोन वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांच निधन झालं. त्यानंतर त्यांच्या विधवा आईने पुढे संपूर्ण कुटूंब उभा केलं.

दिनकर यांच प्राथमिक शिक्षण गावातच झालं. त्यानंतर शेजारच्या गावात सुरू करण्यात आलेल्या नॅशनल मिडील स्कूलमध्ये त्यांच शिक्षण झालं. ही शाळा ब्रिटीश सत्तेच्या विरोधात म्हणून सुरू करण्यात आलेली शाळा होती. इथे ब्रिटीश सत्तेच्या विरोधातलं बाळकडू त्यांना मिळत गेलं. पुढे पटना विश्वविद्यालयातून त्यांनी १९३२ मध्ये इतिहासातून BA केलं.

या काळात दिनकर यांच्यावर रविंद्रनाथ टागौर, कवी इक्बाल, कीट्स ॲण्ड मिल्टन यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शिकलेल्या माणसाला सरकार बोलवून नोकऱ्या देत असत. दिनकर BA झाले होते त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना बिहारमध्येच सब रजिस्ट्रार पदावर नियुक्त केलं. १९३४ साली त्यांना ब्रिटीश सरकारमध्ये नोकरी लागली.

यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना सायमन कमिशनला विरोध कऱणाऱ्या आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. नोकरीच्या दरम्यान ते बिहारच्या ग्रामीण भागात रहायला होते. या काळात त्यांच्या कवितांनी खऱ्या अर्थाने भारतीयत्वाचे रुप धारण केले असे सांगितले जाते.

ब्रिटीश शासनापासून लपून त्यांनी अमिताभ या टोपननावाने कविता प्रकाशित करण्यास सुरवात केली होती. १४ सप्टेंबर १९२८ साली जतिन दास यांच्या बलिदाननिमित्त त्यांची कविता प्रकाशित झाली होती. पुढे ब्रिटीश शासनात नोकरीस असून देखील ते कविता करत राहिले. मात्र या गोष्टींच गुपीत जास्त वर्ष टिकून राहिलं नाही.

ब्रिटीशांना रामधारी सिंह दिनकर ब्रिटीश शासनाच्या विरोधात कविता लिहतात यांची कुणकुण लागली. हे समजतातच सुरू झालं बदल्यांच सत्र. दिनकर यांच्या पुढील चार वर्षात २२ बदल्या करण्यात आल्या.

मात्र या बदल्यांचा काहीच परिणाम दिनकर यांच्यावर होत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी त्यांना विचारलं की तूम्ही आमची परवानगी घेवून का लिखाण करत नाही, तेव्हा दिनकर यांच उत्तर होतं,

‘मेरा भविष्य इस नौकरी में नहीं साहित्य में है और इजाजत लेकर लिखने से बेहतर मैं यह समझूंगा कि मैं लिखना छोड़ दूं।’

पुढे भारत स्वतंत्र झाला आणि दिनकर यांना बिहार विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं. पुढे १९५२ साली राज्यसभेवर त्यांना नियुक्त करण्यात आलं. ते १२ वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिले. त्यानंतर १९६२ ते १९६५ साली त्यांची भागलपूर विश्वविद्यालयात कुलपती म्हणुन नियुक्ती करण्यात आली. १९६५ साली भारत सरकारने त्यांची हिंदी सलाहकार पदावर नियुक्ती केली.

त्यांची पुस्तके :

विजय संदेश हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९२८ साली प्रकाशित झाला. त्यांनतर रेणुका, हुंकार आणि रसवन्ती  यांच्यासह कुरूक्षेत्र, रश्मिरथी, परशुराम की प्रतीक्षा, उर्वशी असे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

पुरस्कार :

उर्वशी या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९५९ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. याच वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. १९७२ साली त्यांना ज्ञानपीठ जाहीर करण्यात आला. १९९९ साली भारत सरकारने त्यांचे पोस्टल तिकीट जाहीर केले.

२४ एप्रिल १९७४ साली त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.