आमसूत्र सांगणारी कतरीना अन् सजवलेली हापूसची पेटी कशापुढं बेचव पडते.. तर रायवळ आंबा!!!

एक दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका पुणेरी मित्राकडं जाणं झालं. तसा हा गडी कोकणातला, पण राहिला, वाढला इथंच, त्यात दुपारचाही झोपायचा… त्यामुळं पुणेरी झाला. जेवण-बिवण झाल्यावर भाऊ म्हणला, ‘आंबा खाणार का?’ नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण मनात धाकधूक होती, कारण पावसाची भुरभुर सुरू झाली की, हापूस काय पाहिल्यासारखा लागत नाही.

पण या गड्यानं मन जिंकलं, कारण हा परातभर रायवळ आंबा घेऊन आला.

या जगात फार कमी गोष्टी अशा राहिल्यात ज्या आपल्या ‘आवडीचा’ भूतकाळ डोळ्यांसमोर आणू शकतात. रायवळ आंबा हा त्यातलाच एक विषय. याला हापूससारखा रॉयल फील नसेल, पायरी सारखी चव किंवा तोतापुरीचा आकार नसेल…

पण तरीही रायवळ आंबा म्हणजे ‘माहोल’ बनवणारं फळ.

आपल्या ओळखीत असे अनेक जण असतात ज्यांनी मोठ्या शहरात आल्यावर किंवा वयाची विशी ओलांडल्यावर हापूसची चव चाखलेली असते. पण तरीही रायवळमुळेच त्यांचं आंब्यांशी असलेलं नातं घट्ट असतं.

आता रायवळ आंबा म्हणजे थोडक्यात आपला गावरान आंबा. जो कधी पेट्यांमधून येत नाही, त्याच्या आगमनाच्या बातम्या लागत नाहीत, त्याच्या भावाची चर्चा होत नाही, तो ताटात कधी दिसत नाही… पण हवाहवासा वाटतो.

रायवळ आंबा हा कोकणात तर येतोच, पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या कित्येक भागांमध्येही याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. हापूस किंवा पायरीसारखं याच्यासाठी कलम लावावं लागत नाही, तर पूर्ण पिकलेला रायवळ आंबा खाऊन त्याची कोय मातीत लावली की झाड येत असतंय. बरं हे झाड माती पण घट्ट धरून ठेवतं, म्हणूनच शेताच्या आजूबाजूलाआपल्याला हमखास रायवळ दिसतो.

पावसाळा तोंडावर आला असताना, हापूस-पायरीचं मार्केट किंचित डाऊन झालेलं असताना, मार्केटमध्ये रायवळ आंब्याची एंट्री होते. हापूसच्या एंट्रीला फ्रंटपेज मिळतं, रायवळची बातमी मात्र कोपऱ्यात लागलेली असते.

रायवळ आंबा लाडका असण्याचं कारण त्याच्या झाडापासून सुरू होतं, कारण त्याचं झाड अत्यंत डेरेदार. मैदानात खेळून, आई-बापाच्या मारापासून पळून कुणी सावली दिली असेल, तर या झाडानंच. झाडावर चढणं हे मानाचं स्किलही याच झाडाच्या कुशीत शिकायला मिळालं.

सिझन असला की तर याचा नाद असायचा. कारण आपल्यातली निम्मी जनता बाद कॅटेगरीमध्ये येणारी. सुट्टीचा सगळं दिवस बाहेर उंडारण्यात जायचा, उन्हाळ्यात करायच्या उचापतींमध्ये आंबा पाडणं हा एक मोठा टास्क असायचा.

ऑलिम्पिक शूटर्सला तात्पुरती टफ देणारी जनता हे आंबे पाडण्यात एक्सपर्ट होती. पाडलेल्या आंब्यांचं वाटप हा एक वेगळा सोहळा, कुणी आपल्या चड्डी दोस्ताला द्यायचं, तर कुणी नटीला.

झाडावरचा रायवळ पाडल्या पाडल्या खायचा विषय होता, त्यामुळं निम्मा मालही घरी जायचा नाही.

हापूस कापून खायचा म्हणलं तरी साग्रसंगीत कार्यक्रम करावा लागतो, पायरी तर रसाचा आंबा.. पण रायवळचे हे असले नखरे नसायचे. पाण्यातनं खळाळून काढायचा, चारी बाजूंनी दाबून जरा लिबलिबा करायचा, शेंड्याचं टोक दातांनी उखडायचं आणि डायरेक्ट पिळून विषय सुरू.

थोडासा रवाळ आंबा जिभेवर यायचा आणि थेट जन्नत दिसायची. डोळे मिटून रायवळ खाताना त्याचे ओघळ डायरेक्ट कोपर गाठायचे. आपला हात किती खराब झालाय, याचा विचार न करता वरपायचा ‘रायवळ’ हा दुसरा विषय. 

पहिल्या नंबरवर मटणाचा रस्सा कायम आहे.

या वरपण्याच्या नादात कपड्यावर खवून डाग पडायचे, जे घरी दिसल्यावर तितकाच खवून मारही खावा लागायचा. पण रायवळ म्हणजे मोहब्बत, उसके लिए सब जायज होता है..!

ही तिथून सुरू झालेली मोहब्बत आजही कायम आहे.

रायवळ पिकवणारे शेतकरी बऱ्याचदा हा आंबा शेजार-पाजाऱ्यांपासून गल्लीतही मोकळ्या हातानं वाटतात, मग बाकीचा मार्केटमध्ये येतो. याचा भाव पण टेन्शन देणारा नसतो, तर १००-२०० रुपये किलोनं हा झोपडीपासून बंगल्यापर्यंत सगळीकडे जातो. 

अलीकडच्या बातम्या पाहिल्या तर पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये मुळशीवरुन रायवळ आंबा आलाय. यंदा सिझननुसार यायला त्याला किमान १५ दिवसांचा उशीर झालाय. भाव मात्र आपल्या खिशातली शंभराची एखाद-दुसरी नोटच खर्च करायला लावू शकतोय. 

त्यात चोखून खायचा आंबा असल्यानं याचे फारसे नखरे नसतात, लोणच्यालाही याचीच कैरी वापरली जाते. त्यामुळं काही महिने नाही, तर वर्षभर आपल्या जिभेचे चोचले रायवळच पुरवतो.

आपल्या लहानपणी रायवळची एक वेगळीच हवा होती, आपण घाटावर राहत असलो तर रायवळ बाजारात किंवा घरात येण्याची वाट बघण्यात एक सुख होतं. सध्या मात्र रायवळची जादू काहीशी कमी झालेली दिसते.

यामागचं कारण म्हणजे रायवळचं कमी झालेलं उत्पादन.

रायवळचं उत्पादन कमी झाल्याची बरीच कारणं सांगण्यात येतात. मुख्य कारण म्हणजे हापूसनं व्यापलेलं मार्केट. हापूसमधून मिळणारा नफा जास्त आहे आणि सोबतच हापूसला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठं स्थानही आहे. हापूस जगभरात  निर्यात केला जातो, तुलनेनं रायवळ मात्र राज्यातल्या राज्यातच विकला आणि खाल्ला जातो. 

साहजिकच मोठ्या प्रमाणात मागणी नसल्यानं रायवळ बाबत संशोधनही कमी होऊ लागलं. ज्यामुळे लागवडीत किंवा उत्पादनात फारसे प्रयोग केले जात नाहीत.

लोणच्यासाठी रायवळ आंबा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे व्यवस्थित पिकलेली कोय मिळत नाही आणि तिची लागवड करता येत नाही, ज्याचा परिणाम उत्पादनावर होतो. 

रायवळचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे याची जितकी रूपं तितक्या चवी… 

म्हणजे कधी तुम्हाला पिवळा धम्मक दिसणारा रायवळ आंबट लागतो, कधी कैरी म्हणून खायला जाता आणि अगदी गोड चव लागते, कधी काहीसा आंबटगोड फील येतो आणि कधी फोडून मिरपूड टाकली, तरी रायवळ भारीच लागतो.

रायवळची खरी मजा कशात होती माहिती का? 

उन्हातानातनं घरी यायचं, चुलीच्या खोलीत एखाद्या परातीत पाण्यात रायवळ भिजवलेले असायचे, आई किंवा चुलतीची नजर चुकवून त्यावर डाव हाणायचा, घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात मुद्देमालाचा निकाल लावायचा आणि काहीच केलं नाही अशा थाटात आईसमोर जायचं, मग आई पदरानं आपलं बरबटलेलं तोंड पुसायची आणि तेव्हा आंबा खायचा फील यायचा. 

हि जन्नत फक्त चोखून खायच्या रायवळलाच होती, हापूस किंवा पायरीला नाही… 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.