औरंगजेब ते मोदीजी : आंबा शेकडो वर्षांपासून भावकीचे प्रॉब्लेम सोडवत आलाय

सध्या सिझन सुरू आहे आंब्यांचा. आपल्याला एखादा तरी कोकणी मित्र असावा, आपल्या कोकणातल्या नातेवाईकांना आपली आठवण यावी, घरी एखादी पेटी यावी, पिकलेल्या आंब्यांचा तो टिपिकल भारी वास यावा आणि गरम पुरीसोबत मस्त आमरस खावा… ही लय जणांच्या मनातली गोष्ट.

या सिझनमध्ये कुणीही कुणाकडं जाताना आंबे घेऊन जातंय, कोकणातल्या भावाशी वर्षभर बोलणं झालं नाही तर आंब्याच्या निमित्तानं गप्पा रंगतायत, भेटी होतायत… थोडक्यात काय तर आंब्यामुळं नाती जोडली जातात, भांडणं मिटतात, ओळखी होतात.

पण आंबा फक्त आपल्या भावकीसाठीच नाही, तर कित्येक देशांसाठी, देशातल्या नेत्यांसाठी मांडवली बादशहा आहे आणि याचं कारण आहे…

मँगो डिप्लोमसी.

थोडक्यात एका देशाकडून दुसऱ्या देशाला आंबे पाठवायचे, त्या निमित्तानं बोलाचाली करायच्या आणि जरा संबंध नीट करायचे. आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही आमचे दोस्त आहात असं दाखवायचं.

याची सुरुवात तशी पार औरंगजेबापासून होते, तिकडं आपण जाऊच पण त्याआधी जरा माहितीतला किस्सा बघू.

१९८१ मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष झिया उल हक यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘फक्त पाकिस्तानात मिळणारे आंबे’ असं सांगत आंब्यांची पेटी पाठवली होती, इंदिरा गांधींना हे आंबे आवडले आणि त्यांनी कौतुकही केलं. हा विषय देशभरात पसरल्यावर या आंब्यांच्या जातीवरुन भारत-पाकिस्तानमध्ये राडा झालेला. बोल भिडूनं हा किस्सा इन डिटेल लिहिलाय. त्याची लिंक खाली देणारच, पण त्याआधी जरा बाकीचे गाजलेले किस्से बघूयात.

सगळ्यात पहिला किस्सा औरंगजेबाचा.

मुघल लोक तसे लई शौकीन. जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या तिघांनाही एकाच गोष्टीचा लई शौक होता, तो म्हणजे आंबा. त्या काळात आंबा हे समृद्धीचं प्रतीक मानलं जायचं. औरंगजेब तर आंब्यांचा वापर व्यापार आणि राजकारण असा दोन्ही गोष्टींसाठी करायचा. जेव्हा औरंगजेबानं स्वतःला बादशहा घोषित केलं. तेव्हा पर्शियाचा बादशहा शहा अब्बास आपल्यावर रागावू नये आणि त्याची मर्जी सांभाळता यावी, म्हणून औरंगजेबानं त्याला आंबे पाठवले होते.

पुढं औरंगजेब जेव्हा ताकदवर झाला, तेव्हा बाल्कनच्या राजानं शांततेचा तह करण्यासाठी २०० उंटांवर आंबे पाठवून औरंगजेबाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

दुसरा किस्सा जवाहरलाल नेहरूंचा

भारताचे पहिले पंतप्रधान असणाऱ्या नेहरूंचं आवडतं फळ होतं, पेरू. पण पेरूला तेवढी प्रतिष्ठा नव्हती, जेवढी आंब्याला होती. त्यामुळं जर कुठला परदेशी नेता भारत भेटीला आला, तर त्याला आंबे गिफ्ट दिले जायचे. जर नेहरू कुठं बाहेर गेले, तर ते आंबे घेऊन जायचे. जर आंबे घेऊन जाणं शक्य नसेल, तर समोरच्या देशाशी भारताची सांस्कृतिक नाळ जुळावी म्हणून नेहरू आंब्याचं रोपटं पाठवायचे.

१९५४ च्या आसपास तत्कालीन चायनीज पंतप्रधान झोऊ एनलाई यांनी नेहरूंना मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू दिल्या होत्या. त्यांना रिटर्न गिफ्ट काय द्यायचं म्हणून नेहरु आणि त्यांच्या सल्लागारांनी आंब्याची रोपटं देण्याचा निर्णय घेतला. परवानग्या, निवड, सल्ले अशा अनेक लडतरी करुन २ हापूस, ३ दशहरी, २ चौसा आणि १ लंगडा जातीचं रोपटं हाँगमार्गे चीनला पाठवण्यात आलं. 

मात्र ही रोपटी चिनी मातीत पोहोचली का किंवा मधल्यामध्येच गायब झाली हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही.

पुढे जाऊन पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री मियाँ अर्शद हुसेन यांनी माओला आंब्यांचा एक क्रेट पाठवला. माओनं स्वतः आंबा खाल्ला नाही, पण त्याचे समर्थक आणि चिनी नागरिकांमध्ये आंबा सुपरहिट ठरला. त्यामुळं आजही चिनी लोक आंबा खाताना पाकिस्तानी लोकांचे आभार मानत असतील.

विषय निघालाच आहे, तर तिसरा किस्सा पाकिस्तानचा

झिया उल हक यांच्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांनी भारतीय नेत्यांना आंबे पाठवलेत. २०१५ मध्ये नवाझ शरीफ यांनी तर कहर केला होता. त्यांनी मोदी, वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी १० किलो आंबे पाठवले. तर तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना १५ किलो आंबे पाठवले. यामुळं काय भारत पाकिस्तान संबंध सुधारले नाहीत.

पाकिस्तानला आंबे पाठवायला तसं लई आवडतंय, २०२१ मध्ये त्यांनी भारतासकट ३२ देशांना आंबे पाठवले. कोविडचा काळ होता आणि पाकिस्तानचे परराष्ट्र संबंधही फार सुरळीत नव्हते. त्यामुळं अमेरिका, चायना, फ्रान्स अशा कित्येक देशांनी पाकिस्तानची ही ‘मँगो डिप्लोमसी’ स्वीकारलीच नाही.

चौथा किस्सा शेख हसीना यांचा

भारतानं अनेक देशांना लसीचा पुरवठा केला, यात बांगलादेशचाही समावेश होता. पण गेल्यावर्षी मार्च दरम्यान हा पुरवठा थांबला होता. त्यामुळं या दोन्ही देशांमध्ये तणाव होता. मग बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हरिभंगा जातीचे २६०० किलो आंबे पाठवल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी ३०० किलो आंबे पाठवले होते.

पाचवा किस्सा ममता बॅनर्जींनी मोदींना आंबे पाठवल्याचा

२०२१ मध्ये बंगाल इलेक्शनमुळं सगळ्या देशातलं वातावरण तापलं होतं. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी असा थेट सामना बंगालमध्ये रंगला. निकालात बाजी मारली ती, ममता बॅनर्जी यांनी. निकाल लागल्यावरही बंगालमधलं वातावरण शांत झालं नव्हतं. 

जून महिन्यात त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्मणभोग, माल्डा आणि हिमसागर हे खास बंगाली जातीचे आंबे पाठवले. इतका खुंखार राडा शांत करण्यासाठी आंबाच मदतीला धाऊन आला होता.  

थोडक्यात काय, तर पंतप्रधान असो किंवा अगदी सामान्य माणूस, कुणाच्याही मनाचा रस्ता पोटातून जातो आणि पोटात जाण्याचा आंब्यापेक्षा भारी मार्ग दुसरा कुठला असणार…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.