कोकणचा आंबा जगावर राज्य करतो याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा

आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्याच मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख आणखी पक्की झाली आहे.

पण काही वर्षापूर्वी इथे निबिड जंगल होतं हे कोणाला सांगून तरी पटेल काय?

गोष्ट आहे १७९९ची. ब्रिटीश तेव्हा मुंबईत स्थिरावले होते. त्यांनी रस्ते बांधले, बाजारपेठ उभी केली. कुलाबा ते परळ हा भाग शहर म्हणून ओळख जाऊ लागला. मात्र परळच्या पुढे सायन पर्यन्तचा माग मागासलेला होता. जंगलवजा खेडी होती. हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी एक पद्धत शोधुन काढली होती.

गावे आणि आसपासची जंगले लीजवर द्यायची.

पवई आणि त्याच्याजवळचा भाग स्कॉट नावाच्या ब्रिटीश डॉक्टरला भाड्याने दिला होता. भाडं होत ३२०० रुपये. डॉक्टर एकदम साधेसुधे होते. खूप महत्वाकांक्षी नव्हते. पवईच्या जंगलातून मिळेल तेवढ उत्पन्न काढायचं एवढच त्यांचं ध्येय. आजारी पडल्यावर ते इंग्लंडला गेले. त्यांच्यानंतर या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही या जागेवर दावा केला नाही. अनेक वर्ष ही जागा पडीक राहिली.

अखेर १८२९ मध्ये पवईचे नशीब फिरले. फ्रामजी कावसजी बानजी नावाच्या पारसी म्हाताऱ्याने सरकारकडे अर्ज केला की पवई आणि परिसर लीजवर मिळावा.

तेव्हाचा मुबईचा कलेक्टर जॉर्ज गिल्बर हा खूप धूर्त होता. त्याने सरकारला पवई भाडेतत्त्वावर देण्याची गरज नसल्याच दाखवत फ्रामजी कडून लीजची रक्कम वाढवून घेतली, काही अटी घातल्या . त्या अटी देखील खूप गंमतीशीर होत्या. दहा वर्षाच्या अवधी साठी पवई भाड्याने मिळणार या काळात तिथे विहिरी, तलाव,पिण्याचे पाणी याची सोय करायची. तिथे दारू बनवली तर लोकल लोकांनाच विकायची. जंगल साफ करून शेती योग्य बनवायचे.

फ्रामजी कावसजी या सगळ्या अटीसाठी एका पायावर तयार झाले  आणि लवकरच ते पवईचे मालक बनले.

त्यांनी खतं वापरून जमीन कसायला सुरवात केली. दरवर्षी एक याप्रमाणे 10 विहिरी बांधल्या. गावात धर्मशाळा उभारली, तलावे दुरुस्त केली. थोड्याच दिवसात त्याने इंग्रज सरकारकडून आणखी आसपास ची गावे मागून घेतली.

आज लोक मुंबईत स्क्वेअरफुट स्क्वेअर सेंटीमीटरवर घर घेतात अशा काळात फ्रामजी पवई ते साकीनका चांदिवली विक्रोळी अशा महाप्रचंड भागाचा एकुलता एक मालक होता.

ब्रिटीश खूप हुशार होते. त्यांनी फ्रामजीला ज्या अटी घातल्या होत्या त्यामुळे त्यांना जमिनीचा पैसा तर मिळतच होता शिवाय गावाचा विकास होऊन तिथल्या जनतेचा आशीर्वाद देखील मिळत होता. फ्रामजी सुद्धा धूर्त होता. त्याला माहित होते जर जास्त मेहनत केली नाही तर पवईची मालकी आपल्याला परवडणार नाही. त्याने एक हुशारी केली.

पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमी रोपे लावली. अवघ्या तीन वर्षात ही रोपे बहरून आली. त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मँगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात फेमस देखील झाले. फ्रामजी कावसजीने तुफान पैसा छापला.

इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या आंब्याची चर्चा इंग्लंड पर्यंत पोचली होती. 

फ्रामजी कडे व्यापारी डोक सुद्धा होतं. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येईल याची खुणगाठ त्याने बांधली होती, पण असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते, आपण पारतंत्र्यात होतो.

कोणतीही गोष्ट करायची झाली तर १०० नियम पार करावे लागायचे. फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजाला ते ती करंडी नेऊन ठेवली.

ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.

१८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले,  अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.

व्हिक्टोरिया राणीमुळे भारतीय आंब्याला परदेशी मार्केट खुले झाले. आजही कोकणचे हापूस आंबे जगावर राज्य करतात याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा!

फ्रामजी कावसजी फक्त आंब्यावर थांबला नाही. त्याने पवईमध्ये मलबेरीची झाडे लावली, तिथे रेशीम उत्पादन सुरु केले, ऊस लावला, त्या उसापासून साखर निर्मिती साठी छोटा कारखाना देखील सुरु केला. उसाच्या मळीपासून दारू देखील गाळली जाऊ लागली.

आज जिथे सिमेंटची जंगले आहेत त्या पवईमध्ये फ्रामजीने उसापासून ते सफरचंदापर्यंत अनेक गोष्टीच उत्पादन घेतलंय.

पुढे वय वाढेल तसा फ्रामजीला विरक्ती वृत्ती आली. त्याच लक्ष पैसा कमवण्यापेक्षा मुंबईतील लोकांच जगनं कस सुसह्य होईल याची तो काळजी घेत होता. त्यानेच मुंबईमध्ये पहिली पाईपलाईन टाकली. फ्रामजीने मुगभाटवाडीमध्ये एका मैदानात तीन मोठ्या विहिरी बनवल्या, त्यातून पाणी खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा पंप लावला. शिवाय बैलानी ओढण्यासाठी चारचाकी गाडीही कामाला लावली.

गिरगावला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. तो पर्यंत मुंबईकरांना पाईपलाईन हा शब्दही माहित नव्हता.

इंग्रजांना जे जमल नव्हत ते फ्रामजीने केलं. त्याला तब्बल ३०००० रुपये खर्च आला. आजच्या काळात त्याची किंमत काढली तर अब्जावधी रुपये होतील. पण फ्रामजीने मागेपुढे पाहिलं नाही. त्यानेच मुंबईमध्ये गस बत्तीची सोय केली.

आज मुंबई भारतातील सर्वात अत्याधुनिक शहर आहे, लोक याच श्रेय इंग्रजांना देतात मात्र त्यांच्या बरोबरच काही भारतीय देखील होते ज्यांचा दूरदृष्टीपणा मुंबईला मोठ करून गेला यातील प्रमुख नाव म्हणजे फ्रामजी कावसजी बानाजी.

त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये धोबीतलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव देण्यात आलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.