“लाईक” नाही “बाईक” पाहिजे 

सदफ नावाच्या मुलाची बाईक काल कुंभार्ली घाटातून चोरीला गेली. महाराष्ट्रात तशी प्रत्येक दिवशी शेकडोत बाईक चोरीला जात असाव्यात. तुम्ही म्हणाल ही तर साधी गोष्ट. त्यात काय विशेष.

पण भिडूंनो विशेष आहे तो सदफ कडवेकर आणि त्याचं काम, त्यांची गाडी किती महत्वाची होती व तो किती महत्वाचा माणूस आहे हे सांगण्यासाठीच हा लेख. 

एक पोरगा आहे सदफ नावाचा. तो काय करतो तर सह्याद्रीच्या घाटात गाडी लावतो आणि घाटमाथ्यावर जातो. कशासाठी तर माणसांसाठी, जनावरांसाठी आणि जंगलासाठी. 

आपण कधी कराडवरून चिपळूणला चाललो तर वाटेत कुंभार्ली घाट लागतो. या घाटात थांबून दूरवर दिसणारं जंगल आपण पाहतो. आपणाला वाटतं हेच ते जंगल आणि हाच तो सह्याद्री, पण तस नसतं भिडू… 

आपणाला जे जंगल वाटतं, ते या खऱ्याखुऱ्या जंगलाचा फक्त काहीच भाग असतं. अगदी साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने सांगायचं झालं तर डांबरीवर गाडी लावायची आणि रस्त्यावरून आत शिरायचं. अगदी पायवाट दिसते ती तुडवत अडीच ते तीन तास चालत रहायचं. उंचचउंच कड्यावरून आत आत गेलात की तूम्हाला दिसतात ते धनगर पाडे, कातकरी पाडे, खरखुरं जंगल आणि खरेखुरे वाघ.. 

सदफ या माणसांसाठी नेहमीच इथे येतो. खरतर हेच त्याचं घर आहे. दहावी झाल्यापासून म्हणजे अगदी दहा बारा पंधरा वर्षांपासून त्याला हा नाद लागला. खोलवर जंगलात जावून तिथल्या माणसांसाठी तो जगू लागला. 

इथली माणसं म्हणजे काय तर धनगर पाडे आणि कातकरी पाडे. अगदी कातडीसोबत असणारं त्यांच अंग. एखाद्या डांबरी रस्त्याला लागायचं झालं तरी तीन तासाचा चढउताराचा, जंगलाचा प्रवास ठरलेला. इथले बांधव उपजिवेकेसाठी फक्त आणि फक्त जंगलावर आधारलेले. जंगल हे त्यांच घर. ते गुरं पाळतात.

गुरांच्या दुधातून जे चार पाच दहा हजार मिळतात तेच त्यांच जगणं.. 

पण गेल्या काही वर्षात या सह्याद्रीकडे अनेकांच्या नजर वळल्यात. कोणी म्हणतं लाकूड चांगल आहे तर कोणी म्हणतं पार्टी चांगली होईल. या गोष्टीतून जंगलाला वणवा लावला जातो. प्राणी घालवून नाहीतर जाळून टाकले जातात.

अशाप्रकारे जंगलांना वणवा लावला जातो

बिबट्या आणि वाघ हा वाईट असतो तो आपली जनावरं खातो, तो दिसला की मारून टाकायची मागणी करायची असते हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचे प्रकार अशाच गोष्टीतून सुरू करण्यात आले.

अगदी अश्मयुगापासून सुरू असणारं वाघाचं आणि माणसांच नात तोडलं जावू लागलं. 

कसं तर परंपरेने केला जाणारा धनगरपाड्यावरचा वाघबारस सण बंद करण्यात आला. हे कधी झालं तर अगदी पाच-दहा-वीस-पन्नास वर्षात. काही ठिकाणी वाघबारस बंद करण्याची प्रथा वीस वर्षात संपून गेली तर काही ठिकाणी तीन पिढ्यांपूर्वीचं. 

सदाफ व त्याच्या टिमने सुरू केलेली वाघबारस

या सगळ्यातून हिरव्यागार झाडाचं लाकूड करायचं आणि मग सरकारकडून झाडं तोडण्याच टेंडर मिळवायचं हा प्रकार सुरू झाला, सह्याद्रीच्या जंगलात पार्ट्या करण्याचं प्रमाण सुरु झालं… 

मग सदफ सारख्या पोरांनी हा डाव ओळखला. हे पोरगं जंगलात येवू लागलं. लोकांना भेटू लागलं.

पहिली समस्या दिसली ती लोकं बिबट्याला मारा अशी मागणी का करतात? तर तो त्यांची जनावरं खातो. वाघाने, बिबट्याने गुरं मारली की पंचनामे करण्याचा नियम आहे. दोन महिन्याच्या काळात ७० टक्के नुकसान शासन देते. सदफ आणि त्यांच्या मित्रांनी शासनाकडे पाठपुरवे करण्यास सुरवात केली. यासाठी महत्वाची गोष्ट होती ती पंचनामे करण्याची.. 

दूरवर घाटात गाडी लावून सदाफ आपल्या सहकार्यांबरोबर अशा रस्त्याने मदत पोहचवत असतो

मग सदफ स्वत: कॅमेरा घेवून अडीच तीन तास घाटमाथ्यावर चालत जावून पाड्यावर जावू लागला. तिथून बिबट्याने जिथे गाई मारली असेल तिथे जायचं. तो पुढचा एक-दोन तासाचा प्रवास. फोटो काढून पंचनाम्याची माहिती गोळा करून फॉरेस्टला देवू लागला. पंचनामे गतीने होवू लागले. पाठपुरावा करणारा शिकलेला माणूस आहे म्हणल्यानंतर गती आली.

वाघ आणि बिबट्याचा प्रश्न संपू लागला. सदाफ सांगत होता की वाघ आणि बिबट्या इथेच आहे. अगदी पुर्वीपासून. तो आणि माणूस एकत्र दिसतो. हळुहळु फरक पडत गेला. 

त्यासाठी सदफ घाटात गाडी लावतो आणि दूर जंगलातल्या पाड्यांवर भटकत राहतो. यातून बंद झालेला वाघबारस पुन्हा सुरू झाला. कोणातरी बाहेरून येतो आणि जंगल वाईट आहे हे सांगतो हे खरं नसतं हे लोकांना समजून गेलं.. 

अगदी सहज सांगायचं झालं तर, 

बिबट्या रोज येतो.

कधी कोंबडी तर कधी कुत्री घेऊन जातो घरातून.

गुरे तर नेहमीचचं खाद्य आहे त्याचं..

आम्हाला काही तक्रार नाही त्याची, जंगल त्याचंच आहे, त्याला वाटेल ते त्याने करावं,

राजा आहे तो जंगलाचा..

एका पाड्याने आपल्या पाड्याचं नाव वाघेरी केलं तर दूसऱ्या पाड्याने वाघपाडा अस केलं. हे सगळं एका दिवसात घडलं नाही. गेली १२ वर्ष त्यासाठी जंगल तुडवावे लागले. रोजचा चार चार तासांचा प्रवास ठरलेला होता. 

यातूनच २१ डिसेंबर २०१७ साली राणी प्रभुलकर यांच्यासोबत सह्याद्री संशोधन व संवर्धन संस्था उभारण्यात आली.

अगदी अन्नधान्यापासून ते जनावरांच्या खाद्यापर्यन्तच्या गोष्टी पुरवण्यासाठी काम करण्यात येवू लागलं. धनगरपाड्यांवर मक्याची शेती केली जावू लागली. रक्षाबंधनाच्या दूसऱ्या दिवसी वृक्षबंधन साजरा केला जावू लागला.

सदाफ व त्याच्या सहकार्यामुळे वृक्षबंधन साजरे केले जाते.

हे जंगल आपलं आहे याची खोलवर जाणीव झाली. 

तर या प्रवासातील सदफची हक्काची स्प्लेंन्डर गाडी कोणीतरी चोरून नेली. सदफ रोज गाडी घाटात लावून पाड्यांवर जातो. तोच क्षण साधून डाव टाकण्यात आला. चोर सापडणं अवघड आहे पण सदफला आपण मदत करायला हवी.

त्याला त्याची गाडी परत मिळवून देण्यासाठी आपण मदत केली तर नक्कीच काहीतरी चांगल घडू शकतं.. 

सदफ वाघांसाठी लढतोय, माणसांसाठी लढतोय पण माणसांतल्या जनावरांनी त्याला दगा दिलाय. सदफ थांबून चालणार नाही. चोर त्याची गाडी आणून देतील अस वाटत नाही, तेवढी माणूसकी त्यांच्यात नसते पण आपण नक्कीच त्याला मदत करु शकतो.

माणूसकी म्हणून सातारा, कराड, पाटण भागात तुमच्याकडे स्प्लेंन्डर सारखी कुठलीही चांगल्या अवस्थेतील, जंगल भागात वापरण्यासारखी बाईक असेल आणि ती तुम्हाला सदफने वापरावी अशी इच्छा असेल तर नक्की देऊ शकता. चांगल्या कामासाठी आपण नाही आपली गाडी तर जावू शकते. 

सदफचा फोन नंबर :

Sadaf Kadvekar:

9881743094

9422688402

98817 43094 

1 Comment
  1. Vishvas sathe says

    I already discussed with sadaf…………

Leave A Reply

Your email address will not be published.