इंग्रजांना कोणत्याही परिस्थितीत उमाजी नाईक हवे होते पण का ?

आद्य क्रांन्तीकारक उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या रक्षण करणाऱ्या कुटुंबात झाला. शिवरायांच्या काळापासून रामोशी बेरड समाजाला गडकिल्ल्यांची रखवाली करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बाळकडू उमाजींना बालपणीच मिळाले होते.

१८०३ साली दुसरा बाजीराव पेशव्याला इंग्रजांनी गादीवर बसवले. इंग्रजांच्या मर्जीप्रमाणे त्याने रामोशी समाजाकडून गडकिल्ल्यांची जबाबदारी काढून घेतली. रामोशी उघड्यावर आले. त्याच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. इंग्रजाची सत्ता आली आणि जनतेवरचा जुलूम वाढला.

अशा परिस्थितीत चिडलेल्या उमाजीने साथीदारांना घेऊन जेजुरीच्या खंडोबा पुढे भंडारा उधळून इंग्रजांना पळवून लावण्याची शपथ घेतली .

इंग्रजा विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले. फक्त इंग्रजच नव्हे तर सावकार वतनदार यांना सुद्धा धडा शिकवण्याचा त्यांनी चंग बांधला. डोंगर कपाऱ्यावर लपून बसून गनिमी काव्याने लढण्यात ते वाकबगार होते. उमाजींचा दरारा सर्वदूर पसरला. जवळपास ५००० जणांची त्यांची टोळी होती. पुण्यावर चाल करून त्यांनी सरकारी खजिना लुटला. तो पैसा गरिबांना वाटून टाकला.

उमाजी नाईकने यांनी स्वतःचे स्वराज्य स्थापन केले.

स्वतःचा दरबार भरवून तिथे ते न्यायनिवाडा करायचे. १८३१ साली त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आता इंग्रजांना कोणी शेतसारा देऊ नये, त्यांच्या नोकऱ्या करू नये, त्यांच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन उठाव करावा. असे न करणाऱ्याला नवे शासन शिक्षा करेल हे आवाहन उमाजी नाईकांनी केले. इंग्रज आपला देश सोडून जाणार याची त्यांना खात्री होती.उमाजींना हरवण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी केले. सासवडच्या मामलेदाराने केलेल्या हल्यात इंग्रज सैन्याचा दारूण पराभव झाला.

५ इंग्रज सैनिकांच शिर त्यांनी भेट म्हणून सरकारला पाठवलं.

उमाजी नाईकांची वाटचाल पाहता त्यांना रोखणे गरजेचे आहे हे सरकारच्या लक्षात आले होते. इंग्रजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध नीतीचा म्हणजे “फोडा आणि राज्य करा” चा वापर करायचे ठरवले.

उमाजींची माहिती देणाऱ्याला १०,००० रुपये रोख आणि ४०० बिघा जमीन बक्षीस देणार असे जाहीर करण्यात आले. त्याकाळात एका घराचा एक वर्षाचा बाजाराचा हिशोब काढला तर तो एक रुपयापेक्षा जास्त भरायचा नाही. अशावेळी हे बक्षीस म्हणजे फारच मोठी किंमत होती.

ही रक्कम पाहून उमाजीच्याच टोळी मधल्या काहींची बुद्धी भ्रष्ट झाली.

बाईवर हात टाकल्यामुळे हात कलम करण्यात आलेला काळोजी रामोशी इंग्रजांना जाऊन मिळाला. तसेच नाना रामोशी सुद्धा फितूर झाला. बापू सिंग वर हल्ला करण्यासाठी उमाजींना त्याने उद्युक्त केले आणि त्याची माहिती इंग्रजांना दिली.

भोर तालुक्यातील उत्रोली गावात इंग्रजांनी उमाजी नाईकांना जेरबंद केलं. उमाजी नाईकांना पुण्याच्या खडकमाळ जवळच्या मामलेदार कचेरीत ठेवण्यात आलं. तेथे त्याच्यावर खटला चालला.

या दरम्यान मॅकिंटोश नावाच्या अधिकाऱ्याने त्यांची पूर्ण कहाणी समजावून घेतली आणि ती व्यवस्थित लिहून ठेवली. महिन्याभरातच ३ फेब्रुवारी १८३२ साली उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली.

त्यांच प्रेत इतरांना दहशत बसावी म्हणून ३ दिवस कचेरी बाहेर लटकत ठेवण्यात आलं.

स्वातंत्र्याची पहिली क्रांती शांत झाली होती. पुढे बहिर्जी नाईक पासून हेरगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रामोशी समाजाला इंग्रजांनी स्वातंत्र्ययुद्धाची शिक्षा म्हणून गुन्हेगार जमात म्हणून घोषित केले.

हे ही वाचा – 

3 Comments
  1. Ajitkumar says

    लाखमोलाची नव्हे तर कोटी मोलाची माहीती मिळाली.
    आमच्या ज्ञानात भर घालण्याचे मोठे काम केलेत.
    धन्यवाद , बोल भिडूचे.

Leave A Reply

Your email address will not be published.