वाजपेयी ABVP ला म्हणाले, तुमची चूक मान्य करा आणि कॉंग्रेसची माफी मागा

होय होय होय. एखादा किस्सा टाकलाच की लगेच बघा बघा कशी कॉंग्रेसची बाजू रेटत्यात म्हणून तूम्ही सूरु करणार हे माहिताय. पण भावांनो कधी तरी लेख वाचा की. वाचून शिव्या घाला चालतय. पण न वाचताच कशाला चालू करता.

असो हा ही हेडलाईन वाचून आत आलेल्यांच स्वागत आणि पहिली ओळ न वाचता देखील बोलभिडूच्या नावाने टाहो फोटणाऱ्यांसाठी दोन मिनटांची भावपूर्ण श्रद्धांजली.

आपण आत्ता किस्सा सांगण्यास सुरवात करू. 

हा किस्सा अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशयन एन्ड पैराडॉक्स या पेंग्विन पब्लिकेशनच्या पुस्तकातला आहे.

 झालेलं अस की १९७६ चा उत्तरार्ध चालू होता. म्हणजे ३१ डिसेंबर १९७६ ही एकदम करेक्ट तारिख. अटल बिहारी वाजपेयी विरोधात होते. पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान होत्या आणि आणिबाणी चालूच होती. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVP चे जनरल सेक्रेटरी म्हणून राम बहादुर राय यांच्या हातात ABVP चा कारभार होता. 

राम बहादुर राय यांच्या कानावर या काळात एक बातमी आली. बातमी होती ती म्हणजे वाजपेयी यांनी गृह राज्यमंत्री ओम मेहता यांची भेट घेतली. ही भेट का झाली, कधी झाली, कशासाठी झाली. याबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण वाजपेयी यांची ओम मेहता यांनी भेट घेतली इतकीच त्यांना बातमी मिळाली. 

साहजिक आणिबाणीला विरोध, त्यातून विरोधी पक्षातील नेत्यांना झालेली अटक, देशभर सुरू असणारे आंदोलन अशा पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींचे अगदी जवळीक असणारे व गृहराज्यमंत्री पदाचा कारभार पहाणारे ओम मेहता वाजपेयींची भेट घेतात हे विश्वासात कुठेतरी कटूता आणणारं प्रकरणं होतं. 

राम बहादुर यांना तर या प्रकरणाचा पूर्ण तपास करायचा होता. पण ही भेट का घेतली याची नेमकी माहिती दूसरीकडून मिळणं अशक्य होतं. म्हणून आपण थेट वाजपेयींची भेट घेवून त्यांनाच विचारू असा विचार राम बहादुर रॉय यांनी केला व ते थेट १ फिरोद शहा रोडवर असणाऱ्या वाजपेयींच्या बंगल्यात भेटण्यासाठी गेले. 

राम बहादुर आलेत हे पाहून वाजपेयींनी चहाची ऑर्डर दिली. दोघे बंगल्याच्या आवारात चहा पित चर्चा करू लागले. मुख्य विषयाला हात घालायचा म्हणून राम बहादुर रॉय यांनी वाजपेयींना विचारलं, 

खरचं तूम्हाला भेटण्यासाठी ओम मेहता आले होते का? 

यावर वाजपेयी म्हणाले,

ते तर मोठ्ठे व्यक्ती आहेत. ते कसे मला भेटायला येतील. मीच त्यांना भेटायला गेलो होतो. 

आत्ता रॉय यांची उत्सुकता ताणली गेली. कारण ओम मेहता हे तत्कालीन गृहमंत्री ब्रम्हानंद रेड्डी यांच्यापेक्षा इंदिरा गांधींच्या जवळचे होते. मेहतांना भेटणं म्हणजे इंदिरा गांधींना भेटण्यासारखच होतं. साहजिक गेल्या कित्येक दिवसांपासून आणिबाणी विरोधात तापवलं जाणार वातावरण, झालेली जाळपोळ आणि वाजपेयींनी घेतेलेली भेट यामागे काहीतरी ठोस कारण असणार याचा अंदाज त्यांना आला. 

या भेटीत नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी रॉय उत्सुक होते पण विषय तोडत ते ABVP च्या गेल्या आणिबाणीनंतर लागू केलेल्या कार्यक्रमांवर बोलू लागले. वाजपेयींनी ABVP मार्फत ठिकठिकाणी झालेल्या जाळपोळीचा, सरकारी संपत्तीच्या नुकसानीचा आणि गुंडगिरीचा हिशोब सांगण्यास सुरवात केली. 

त्यानंतर वाजपेयी रॉय यांना म्हणाले, 

ABVP ने आपली चूक मान्य केली पाहीजे, तूम्ही सरकारला माफी मागायला हवी. 

सरकारला माफी मागणं म्हणजे कॉंग्रेसला माफी मागण्याचा प्रकार होता. राम बहादूर रॉय यांना या गोष्टीचा प्रचंड राग आला. पण वाजपेयी यांच्या विरोधात ते बोलू शकत नव्हते. पण त्यांनी ठामपणे वाजपेयींना नकार दिला. 

ते म्हणाले, 

आमच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत. सरकारने वाटलं तर आम्हाला जेलमध्ये टाकावं पण कोणत्याही किंमतीत ABVP माफी मागणार नाही. 

रॉय यांच्या उत्तरावर वाजपेयी म्हणाले, 

तूमच्यासारख्या तरूणांसाठी अशा गोष्टी बोलणं सोप्प आहे. माझ्यासारखे म्हातारे लोकं लोकशाहीवर विश्वास ठेवतात. आम्हाला निवडणूक व्हावी अस वाटतं, म्हणून या गोष्टी सुरू आहेत. कारण आम्हाला फक्त लोकशाही हवी आहे. 

यानंतरही राम बहादूर रॉय माफी न मागण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.