पुण्यात १५ हजारची नोकरी होती, कोरोना आला अन् गावी आलो. आज गावात १० हजार कमवतोय.

मुलगा काय करतो, तर पुण्यात जॉबला आहे. हे जणू राजाच्या मुकूटातील मोती मिरवावा तसे मिरवलं जातं. पण तिथं प्रत्यक्ष महिन्याच्या शेवटी त्या मुलाची काय अवस्था होते हे त्याचे त्यालाच माहित असते.

मेसचे ३ हजार, कॉटबेसीसवरील रुम भाडे २ हजार आणि इतर खर्च २ हजारच्या आसपास होत असतो. महिन्याचा हा ७ ते ८ हजारांचा खर्च कधीच न थांबणारा असतो. 

१५-१७ हजार रुपये पगारावर आपला हा न थांबणारा खर्च करुन मग उरलेले थोडे फार गावाकडे पाठवायचे. तरीही जॉबला पुण्यात आहे हा आपल्याकडे अत्यंतिक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला जातो. ब्रॅन्डेड शिकुन तुटपुंजा पगारावर स्ट्रगल चालूच असतो.

पुण्यात आल्यावर चांगला जॉब भेटतो, पैसे गाठीशी होतात म्हणत इंजिनिअर होवून देखील ‘त्याचा’ ही असा स्ट्रगल चालूच होता. गावाकडं माघारी जायचा विचार मनात येत नव्हता. पण अशी एखादी वेळ येते की पुणे सोडून गावी जाण्यावाचून पर्याय नसतो. अशावेळी हतबल न होता गावात देखील तात्पुरता आधार मिळू शकतो हे गावाकडे परत आलेल्या अनेकांनी दाखवून दिले आहे.

त्यापैकीच कराडजवळील यशवंतनगर गावातील भिडू शेखरची ही गोष्ट…. 

शेखर संकपाळ, कराड तालुक्यातील सह्याद्री कारखान्ययाजवळील एका छोट्याश्या कॉलनीतील रहिवासी. मार्च २०१८ मध्ये डिग्री पुर्ण करुन मॅकॅनिकल इंजिनिअर झाला. आणि परंपरेनुसार गावाकडून पुण्यात आला. चार महिने फिरल्यानंतर अखेरीस सप्टेंबरमध्ये एका खाजगी कंपनीत १५ हजार रुपयांची नोकरी मिळाली.

१ ऑक्टोंबर २०१८ ला क्लॉलिटी इंजिनिअर म्हणून जॉईन झाला. 

जीव तोड मेहनत करत होता. डॉक्युमेंटेशन, इन्स्पॅक्शन, अशी सगळी काम शिकून घेतली. अखेरीस एका वर्षानंतर काम पाहून ३ हजार रुपयांची इंक्रिमेंट मिळाली. इंक्रिमेंटचा एखादा दूसराच पगार घेतला असेल, तोच कोरोनाच्या बातम्या धडकू लागल्या.

टीव्हीवरील भडक बातम्या पाहून सर्वसामान्य पालकांसारखे त्याच्या ही घरातील काळजी करु लागले. फोनवर-फोन येत होते. अखेरीस १८ मार्चला एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने घरच्यांना समजावून सांगता येईल म्हणून तो घराकडे आला न् इकडेच अडकला.

२३ मार्चला लॉकडाऊन झाले. कंपनी चांगली म्हणून की काय मार्चमधील अर्धा आणि एप्रिलचा पुर्ण अशा या दिड महिन्यांचा कामावरती नसताना देखील पुर्ण पगार दिला. 

अडिच महिने कंपन्या पुर्ण बंद होत्या. जून महिन्यात हळू हळू MIDC चालू होवू लागल्या. कंपनीने पुन्हा बोलावणे केले. पण या अवघड परिस्थितीमध्ये मेडीकल सुविधा, हेल्थ इंश्युरन्स अशा बेसिक सुविधा देण्यास कंपनीने असमर्थता दर्शवली. कंपनीसाठी राबणार असून देखील काळजी घेण्यास नकार दिला.

कमवायचं किती, खायचं किती आणि घरी पाठवायचे किती, आणि अशात काही झालं तर दवाखान्यात खर्च करायचा किती? असा सद्यस्थितील वास्तवाला धरुन विचार केला न् त्याने गावाकडेच थांबण्याचा निर्णय घेतला.

तात्पुरता पर्याय म्हणून तासवडे एमआयडीसीमध्ये दहा हजार पगारावर नोकरी स्विकारली. जास्त पगारावरची सोडून कमी पगारावरची नोकरी स्विकारुन उद्या इंक्रिमेंटला अडचण येणार नाही का? या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर मार्मिक होते.

“तुमच्याकडे असलेल्या स्किलचा आणि नॉलेजचा आत्मविश्वास असला की पगाराला अडचण येत नाही”

सध्या तरी पुण्याला जाण्याचे नियोजन नाही. तिथे मेस, रुमभाडे आणि इतर असा मिळून ७-८ हजारांचा होणारा खर्च जावून जेवढे शिल्लक राहत होते तेवढाच पगार सध्या मिळत आहे. नाऊमेद नाही, वेळ थोडीशी बिकट आहे.. हे ही दिवस जातील, पुन्हा नव्याने उभं राहू असं तो आनंदात सांगतो.

आज अशी अनेक मुलं पुणे मुंबई की गाव या चक्रव्युव्हात अडकली आहेत. त्यांच्यासाठी या भिडूचं उदाहरणं पुरेसं बोलकं आहे. थांबू नका लढत रहा मग ते गाव असो की शहर इतकचं. परिस्थितीशी दोन-दोन हात करणाऱ्या अशा प्रत्येक भिडूला बोलभिडूचा सलाम.

  •  भिडू ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.