एकेकाळी ५००० रुपयांसाठी खस्ता खाव्या लागणाऱ्या मित्तल यांनी एअरटेलचं साम्राज्य उभं केलं

एअरटेल कंपनी देशात टेलिकॉम सेक्टरमधली दुसरी मोठी कंपनी आहे. आज जगभरात कंपनी आपली मोबाईल सर्व्हिस पोहोचवत आहे. कंपनीचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्यामुळे एअरटेल कंपनीचे मालक सुनील भारती मित्तल यांच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ होत चाललीये. आज देशाच्या बड्या उद्योगपतींमध्ये मित्तल यांचं नाव घेतलं जात. 

पण तुम्हाला माहितेय, आज करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या मित्तल यांना एकेकाळी ५००० रुपयांची व्यवस्था करण्यासाठी खस्ता खायला लागल्या होत्या. मित्तल यांनी स्वतः त्यांच्या स्ट्रगलिंग काळातील हा किस्सा सांगितला होता.

तो असा काळ होता जेव्हा लोक चेकचा वापर फार कमी प्रमाणात करायचे. त्यामुळे मित्तल यांच्या खात्यात जास्त पैसे नव्हते. अश्यावेळी अर्जंट पैशांची गरज होती. त्यामुळे पर्याय नसल्याने मित्तल हिरो मोटोक्रॉपचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याकडे गेले आणि त्यांना ५,००० रुपयांचा चेक लिहायला सांगितला. 

ब्रिजमोहन लाल मुंजाल यांनी पुढचा मागचा विचार न करता लगेच होकार दिला. मित्तल चेक घेऊन निघणार तोच मुंजाल यांनी मित्तल यांना थांबवले आणि एक गोष्ट सांगितली. जी मित्तल यांच्या मनाला कायमची भिडली. 

ते म्हणाले, बेटा, ही सवय लावू नकोस. 

मुंजाल यांचा हाच सल्ला मानून मित्तल कामाला लागले. आणि मित्तल यांच्या म्हणण्यानुसार या सल्ल्यानंतरच त्यांना कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागला नाही.

सुनील भारती मित्तल यांनी आपल्या व्यवसायाचं मोठं साम्राज्य उभं केलं ते १९८० च्या सुरुवातीला. त्यावर्षी, सरकारने परदेशातून आयात केलेल्या पोर्टेबल जनरेटर बॅन केले. त्यावेळी मित्तल हे जपानी कंपनी सुझुकीच्या जनरेटरचे भारतातील पहिले डीलर होते.

आता इम्पोर्टवर बॅन लागल्यामुळे सुनील मित्तल यांच्यापुढे अडचण निर्माण झाली. पण त्याचाच विचार न करता मित्तल यांनी  टेलिकम्युनिकेशन बिजनेसमध्ये आपलं नशीब आजमावलं. 

मित्तल सांगतात की,

‘एकदा मी व्यवसायाची शक्यता शोधण्यासाठी तैवानला गेलो होतो. तिथे मला पुश बटन फोन दिसला. यावेळी देशातील लोक फक्त रोटरी फोन वापरत होते. तेव्हाच मी फोन व्यवसायाकडे आकर्षित झालो.’ 

भारतात आल्यानंतर त्यांनी पुश बटन फोनचा व्यवसाय सुरू केला. ज्याला त्यांनी ‘मित्तब्राॅ’ असं नाव दिलं. एखाद्या परदेशी कंपनीसारखे वाटणारे नाव त्यांनी निवडले जेणेकरून लोक कंपनीकडे आकर्षित होतील. त्यावेळी देशात विदेशी कंपन्यांची क्रेझ खूप होती. यानंतर मित्तल हळूहळू फोन व्यवसायात हिट होत गेले.

पुढे १९९२ साली त्यांनी भारतात लिलाव झालेल्या चार मोबाईल फोन नेटवर्क परवान्यांपैकी एकासाठी यशस्वीपणे बोली लावली. दिल्ली सेल्युलर परवान्याच्या अटींपैकी एक अशी होती की, बोली लावणाऱ्याला टेलिकॉम ऑपरेटर म्हणून काही अनुभव असावा.

त्यामुळे मित्तल यांनी फ्रेंच टेलिकॉम कंपनी विवेंडीसोबत करार केला. मोबाईल टेलिकम्युनिकेशन व्यवसायाला एक प्रमुख विकास क्षेत्र म्हणून ओळखणारे ते पहिले भारतीय उद्योजक होते.

त्यांच्या योजना अखेरीस १९९४ मध्ये सरकारने मंजूर केल्या आणि त्यांनी १९९५ मध्ये दिल्लीमध्ये सेवा सुरू केली. या दरम्यान १९९७ मध्ये एअरटेल ब्रँड नावाखाली सेल्युलर सेवा देण्यासाठी भारती सेल्युलर लिमिटेड (BCL) ची स्थापना करण्यात आली. काही वर्षातच २ मिलीयन मोबाईल ग्राहकांचा टप्पा ओलांडणारी भारती ही पहिली दूरसंचार कंपनी बनली.

भारती ने भारतातील STD/ISD सेल्युलर दर सुद्धा ‘IndiaOne’ या ब्रँड नावाखाली खाली आणले आहेत.

२००७ साली मित्तल यांना व्यापार क्षेत्रातील  त्यांच्या या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

भारती एअरटेलचा सध्याचा टर्नओव्हर विचाराल तर वन ट्रीलीयनपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.