अजयची गाडीवरूनची ती एंट्री म्हणजे त्याच्या वडिलांचं पूर्ण होत असलेलं स्वप्न होतं.

मुंबई या गावाने अनेकांना वेड लावलंय. रोज हजारो लोक इथे हिरो बनायचं स्वप्न घेऊन येतात. यात सगळ्यात जास्त प्रमाण पंजाबमधलं असत. इथले तगडे लोक दिसायला ही देखणे असतात शिवाय  ईथल्या मातीतचं नाच गाण्याचा गुण आहे.  धर्मेंद्र, सुनील दत्त,राज कपूर, जितेंद्र पासून ते आत्ताच्या विक्की कौशल, दिलजित दोसांज पर्यंत हजारो अक्टर्स पंजाबी आहेत.

पन्नासच्या दशकातला काळ. दिलीपकुमार,राज कपूर, देवआनंद यांचं मुंबईवर राज्य होत. त्यांचे सिनेमे बघून अमृतसर मधला एक मुलगा आपल्या घरच्यांना न सांगता दोन मित्रांना घेऊन मुंबईला जाणाऱ्या फ्रंटियर मेल मध्ये चढला. खिशात काहीही पैसे नाहीत. रेल्वेने प्रवास करायचा तर आधी तिकीट काढायला लागते एवढं ही माहित नाही. पूर्ण प्रवास उपाशी पोटी केला. योगायोगाने तिकीट चेकरला सापडले नाहीत.

पण मुंबईत पोहचले आणि नशिबाने साथ सोडली. स्टेशनवर उतरल्या उतरल्या तिथल्या तिकीट चेकरने यांना पकडलं. जेल मध्ये टाकलं. जवळपास एका आठवड्याने त्यांची सुटका झाली. मुंबईने दिलेला हा पहिलाच प्रसाद बघितल्यावर या तिघांपैकी दोघे जण अमृतसरला परत निघाले. हिरो व्हायचं भूत कधीच उतरलं होतं. फक्त एक जण चं थांबला. त्याला या गावाशी दोन हात करायचे होते.

त्याच नाव विरू देवगन.

तुरुंगातल्या जेलरला या पोराबद्दल का कुणास ठाऊक थोडी सहानुभूती वाटली. त्याने त्याला कोळीवाडामध्ये राहायला जा म्ह्नुन सल्ला दिला. त्याकाळात तिथे बरेच पंजाबी राहायचे. ते त्याला मदत करतील याचा त्या जेलरला विश्वास होता. विरू तिथे गेला. तिथे राहायला वगैरे त्याला आसरा मिळाला. रोज टॅक्सी धुणे, सुतारकाम करणे अशी पार्टटाईम कामे करू लागला आणि उरलेल्या वेळात फिल्म स्टुडियोचे चक्कर मारू लागला.

पण काही दिवसात त्याला कळाल हिरो होण्यासाठी आपल्या कडे दिलीपकुमार देवानंदसारखा चिकना चेहरा नाही. पडेल ती कामे करून दिवस काढू लागला. एक दिवस त्याचे काका त्याला शोधत मुंबईला आले. त्याला अमृतसरला परत आणलं. अंगा पिंडाने दणकट असलेलं हे पोरग पुढ जाऊन पोलीस किंवा कमीत कमी टेम्पो ड्रायव्हर तरी होईल आणि स्वतःच बायका पोरांचं पोट भरेल एवढीच माफक अपेक्षा त्याच्या कुटुंबाची होती.

विरूची मात्र मुंबई अजून सुटली नव्हती. यावेळी मात्र त्यानं आपल्या आजोबाना सांगितलं ,

“कुछ भी हो खुद के पैरो पे खुदही खडा होना है और ये अमृतसर मे हो नही सकता. मुझे बंबई जाने दिजीये”

एव्हाना देवगन कुटुंबाला लक्षात आलं होत. त्यांनी त्याला जाऊ दिल. विरू फिल्मइंडस्ट्रीशी दोन हात करायला मुंबईला आला. परत सुतारकाम टॅक्सी धुणे वगैरे काम सुरु झालं, स्टुडियोच्या फेऱ्याही सुरु राहिल्या. हिरो म्हणून जाऊ दे कोणी साईड अॅक्टर म्हणूनही काम देत नव्हतं.

गावात असताना तालीमीत लागलेली कसरतीची सवय मोडली नव्हती. मुंबईच्या रोजच्या संघर्षात कधी कोणाला दोन फटके द्यावे जरी लागले तरी तो त्यासाठी मागे पुढे पाहत नव्हता. मग कोणीतरी त्याला अंधाऱ्या गल्ल्यामध्ये होणाऱ्या फ्रीस्टाईल कुस्तीबद्दल सांगितलं. चार पैसे मिळणार असतील तर काहीही करायला तयार असणारा विरू दिवसभराच्या काबाड कष्टानंतर रात्री स्पर्धेमध्ये माजलेल्या वळूना ठोकू लागला.

काही दिवसातच त्यात त्याच नाव झालं. एक दिवस बॉलीवूड सिनेमासाठी स्टंटचं काम करणारे रवी खन्ना तिथे आले. त्यांना विरूची फायटिंग आवडली. त्यांनी त्याला सिनेमामध्ये स्टंट डबल म्हणून काम करणार का विचारलं. वीरूने नाही म्हणणे शक्य नव्हते. काहीही करून सिनेमाशी जोडले जातोय आणि वरून पैसेही मिळत आहेत यावरूनचं गडी खुश होता.

पहिला सिनेमा अनिता. ज्याच्या प्रमाणे बनायची स्वप्नं पाहिली होती अशा दिलीपकुमार देवआनंद, धर्मेंद्र यांचा स्टंट डमी म्हणून काम करू लागला. त्यांच्या वतीने आगीत शिरू लागला, उंच बिल्डींग वरून उडी मारू लागला, त्यांच्याकडून मार खाऊ लागला. शरीराचे एक आणि एक हाड मोडले आहेत. असंख्य सिनेमांच्या असंख्य आठवणी शरीरावर व्रण बनवून ठाण मांडून आहेत.

हे कष्टाचे दिवस होते. पण विरूने तेही दिवस निभावून नेले. आणि मग एकदिवस त्याला स्वतःला  रवी खन्ना यांच्याप्रमाणे स्टंट डायरेक्टर होणायची संधी मिळाली. पिक्चर होता रोटी कपडा और मकान. हा त्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. त्याच नाव फिल्मी सर्कलमध्ये चर्चिल गेलं. आता येणाऱ्या प्रत्येक सिनेमाच्या पाट्या पडताना विरू देवगनचं नाव  हमखास दिसू लागलं.

विरूची घरची परिस्थिती सुधारली. त्याने अनेक जणांना काम दिल. त्याच्या कडे काम केलेल्या बऱ्याच जणानी पुढे जाऊन स्वतःचं नाव कमावलं. यात रोहित शेट्टीचे वडील एम.बी.शेट्टी, विकी कौशलचे वडील शाम कौशल हे एकेकाळी विरू देवगन यांचे असिस्टंट होते. बॉलीवूडमध्ये स्टंट कोरिओग्राफर म्हणून विरू देवगन यांचं नाव लिजेंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

एवढ होऊन पण विरू देवगन यांना एका गोष्टीबद्दल खंत वाटत राहायची.

“इस इंडस्ट्रीने मुझे नाम शौहरत दे दी मगर हिरो बनणे नही दिया. मेरा ये सपना मेरा बेटा पुरा करेगा. जो लोग मेरे चेहरे पे हसते थे उनके सामने मेरा बेटा सुपरस्टार बनके दिखाएगा. “

त्यांनी अजयला लहानपणापासून तुला सिनेमात हिरो व्हायचं आहे हेच ठसवल. त्याला शिक्षणाबरोबर घोडेसवारी, अभिनयाचे क्लास, उर्दूचे क्लास वगैरे शिकायला लावलं. अजय देवगन सुरवातीला करीयरच्या बद्दल एवढा जागरूक नव्हता. पण विरुनी जिद्दीने त्याच्याकडून म्हेंत करवून घेतली. सुभाष घई यांच्या सेटवर असिस्टंट म्हणून पाठवलं.

 

१९९१ साली फुल और कांटे या सिनेमामधून अजय देवगनची बॉलीवूडमध्ये झोकात एंट्री झाली. स्टंट डायरेक्टरचा मुलगा आहे हे प्रुव्ह करणारी त्याची दोन बाईकवर उभा राहून कॉलेजमध्ये प्रवेश करणारी एंट्री खूप गाजली. आजही तो सीन आयकॉनिक समजला जातो.

पुढे फक्त ऍक्शन हिरो म्हणून ओळखला जाणाऱ्या अजयने जख्म, लिजेंड ऑफ भगतसिंग, ओमकारा या सिनेमामधून आपण अभिनयामध्येही बाप आहे हे दाखवून दिले. आपल्या वडिलाप्रमाणेचं चारचौघाप्रमाणे दिसणारी सामान्य चेहरेपट्टी असूनही अजय आपल्या बोल्क्या डोळ्यानी पब्लिकला जिंकून घेतलं. गेली अनेक वर्ष तो बॉलीवूडच्या आघाडी अभिनेत्यापैकी एक आहे.

पण त्याला आपण आपलं नाही, तर आपल्या वडिलांचं स्वप्नच जगत आहे याची जाणीव आहे…

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Sandip P.Ghole says

    Mast

Leave A Reply

Your email address will not be published.