मंडईच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलगी व्हावी म्हणून नवस बोलला जातो

संपुर्ण भारतात पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे देखील पुणे हे माहेरघर आहे. गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू आहे. गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यात झाली आणि याबद्दल पुणेकरांना अभिमान आहे. त्यात मंडई ही पुण्याची ओळख आहे आणि मंडईचा शारदा गणपती हे पुण्याचे भुषण आहे. म्हणुनच या मंडईच्या बाप्पाच्या दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्र येतो.

अगदी पूर्वी या मंडईमध्ये अठरापगड जाती व बारा बलुतेदार व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी संघ नावाची एक संस्था उभारली होती. या संस्थेमध्ये मुख्यतः कांदा-बटाट्याचे व्यापारी, दलाल, मंडईमधील काही गाळेधारक इत्यादींचा समावेश होता. पुढे जाऊन गणेशोत्सवातून सुरू झालेल्या चळवळीचा प्रभाव या संघावर पडला व त्यांनी १८९४ साली गणेशोत्सवाची सुरूवात केली.

पूर्वी मंडईत मिनर्व्हा नावाची टॉकीज होती. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी संघाचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. त्यानंतर थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी संघ या संस्थेचे रूपांतर “अखिल मंडई मंडळ” असे झाले. आणि मिनर्व्हा टॉकीज जवळचा गणपती मंडई गाडीतळावर आला. तेव्हापासून आजपर्यंत हा गणेशोत्सव येथेच साजरा केला जातो.

आता ज्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी पूर्वी गाडीतळ होता. पुण्याच्या परिसरातील शेतकरी या ठिकाणी बैलगाडीतून माल घेऊन यायचे व येथेच गाड्या सोडायचे म्हणून त्याला गाडीतळ असे नाव पडले होते. याच गाडीतळावर त्याकाळी कार्लेकरांची सर्कस उतरायची. एकदा या सर्कशीतील हत्तीचे पिल्लू तिथं मरण पावले व त्याला याच गाडीतळावर मूठमाती देण्यात आली. तिथेच दरवर्षी अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन गणेशोत्सवात विराजमान असतो.

आता मंडईच्या प्रसिद्ध शारदा गजानन मूर्ती विषयी जाणून घेऊया.

पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असलेले पैलवान लक्ष्मणराव डोंगरे हे या मंडळाचे संस्थापक आहेत. ते मंडईमधील एक व्यापारी होते. तसेच लक्ष्मणराव हे तुळजापूरचे निस्सीम भक्त होते. लक्ष्मणरावांना पोरगा होत नसल्या कारणाने त्यांनी तुळजापुरच्या देवीला नवस केला की,

‘मला जर मुलगा झाला तर मी तुझ्या कळसावर असलेली शारदा गजाननाची मूर्ती घडवील आणि त्याचा उत्सव माझ्या गावी (म्हणजे पुण्यात) करील”.

लक्ष्मणराव रहायला पुण्यातील काची आळीमध्ये होते. तसे त्यांचे मुळ आडनाव काची.

लक्ष्मणरावांनी ही शारदा गजाननाची मूर्ती त्याकाळी लेले नावाच्या मूर्तिकारांकडून सांगलीचे संस्थानिक राजे पटवर्धन यांच्या देखरेखखाली बनवुन घेतली. ही मुर्ती कागदाचा लगदा, चंदन व लाकडाच्या भुशापासून बनवली गेली होती. गणेशोत्सवास सुरवात होण्या अगोदर पासुनच या मूर्तीचा उत्सव हा लक्ष्मणरावांच्या घरापाशी सुरू होता.

पुढे जाऊन १८९४ साली या मुर्तीची स्थापना मंडई येथे करण्यात आली. नवस पूर्णतेतून स्थापन झालेल्या या मुर्तीला म्हणुनच नवसाचा गणपती असे म्हणतात. विशेष म्हणजे मुलगी व्हावी म्हणुन या गणपतीला भरपुर नवस केले गेलेले आहेत.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपती बाप्पाचे मानकरी बुरूड समाजाचे आहेत.

बुरुड समाजाच्या कित्येक पिढ्या मंडईत वास्तव्यास आहे. बांबूच्या टोपल्या, करंड्या बनवणे हा बुरूड समाजाचा व्यवसाय आहे. विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती मांडवातून खाली आणल्यानंतर ती बुरुडांच्या ताब्यात दिली जाते व विसर्जनापर्यंत ती त्यांच्याच ताब्यात राहते. हे मानाचं पान बुरुड समाजाला आहे. तसेच तांबोळी व मुस्लिम अत्तर समाजाचे तोरण सुद्धा या गणपतीस जाते.

अजुन एक गोष्ट म्हणजे या मंडळात काही घराणी अशी आहेत की त्यांच्यातील तीन पिढ्या या अप्रत्यक्षपणे गणरायाची सेवा करत आहेत.

पहिले घराणं हे मांडववाले दाते. गणपतीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत हेच घराणं गणपतीचा मांडव घालत आलेले आहेत. दुसर घराणं म्हणजे सनईवाले खळदकर. आणि तिसरे म्हणजे मुर्ती रंगविणारे पालकर घराणे.

आणि या मंडळाची खास बाब म्हणजे, या मंडळातील काही कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन समाजात विविध मानाची पदे भूषविली आहेत. त्यामध्ये पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस, पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव उरसळ, आमदार वसंतराव थोरात, उपमहापौर शिवाजी ढमढेरे, नगरसेवक आण्णा थोरात इत्यादी नावे आहेत.

आजच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मागच्या पिढीची वारसदारी समर्थपणे चालविण्याचे सामर्थ्य आहे. युवाशक्ती कडून समाजाची सेवा घडवून आणण्याचे उपक्रम गेली कित्येक वर्ष हे मंडळ राबवित आहे.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.