NSG ने कमान हाती घेतली नसती तर अक्षरधाम हल्ल्यात मोठे परिणाम भोगावे लागले असते

आज २४ सप्टेंबर आहे आणि आजची तारीख एका थरारक दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे..काय झालं होतं आजच्याच दिवशी? अशा वाईट घटनांच्या आठवणी ताज्या करण्यात काही आनंद नसतो तर अशा घटना आपल्या समाजव्यवस्थेवर मूलगामी परिणाम घडवतो. त्याचमुळे या हल्ल्याची आठवण आणि नोंद महत्वाची ठरते.

२४ सप्टेंबर २००२ रोजी गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात ३० लोक ठार झाले आणि ८० जखमी झाले होते. राज्य पोलीस सेवा अधिकारी आणि कमांडो यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आणखी एक कमांडो, जो गंभीर जखमी झाला होता, दोन वर्षांपासून रुग्णालयात त्याच्या आयुष्याशी लढता- लढता मरण पावला.

या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे मानले जाते. हा इतक्या महत्वाच्या ठिकाणी झालेला हल्ला देशाच्या इतिहासात अत्यंत गंभीर मानला जातो. काय होता या हल्ल्याचा घटनाक्रम पाहूया..

रोजच्याच प्रमाणेच गुजरातच्या गांधीनगरमध्ये असलेल्या या अक्षरधाम मंदिरात भाविकांची गर्दी जमली आहे.

अहवालांनुसार,  दुपारी ४ वाजता मंदिराच्या गेट क्रमांक ३ समोर एक पांढरी राजदूत गाडी थांबते. त्यातून दोन लोकं खाली उतरतात. दोघांकडे एक पिशवी अस्गते आणि दोघांनी एकसारखंच जॅकेट घातलेलं असतं.

त्यांनी कॅम्पस मध्ये प्रवेश करताच त्यांना BAPS च्या स्वयंसेवकांनी सुरक्षा तपासणीसाठी तिथे थांबवले. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) ही मंदिराचे व्यवस्थापन करणारी संस्था आहे.

मात्र अतिरेक्यांनी सुरक्षा तपासणीचे उंच बॅरिकेड ओलांडून मंदिर परिसरात प्रवेश केला. मंदिराच्या आवारात बांधलेल्या मनोरंजन पार्कमधून त्यांनी गोळीबार केला. ते मंदिराच्या मुख्य रस्त्याच्या दिशेने  जाऊ लागले. त्यात त्यांनी आजूबाजूला ग्रेनेड फेकले, तेथील भक्तांवर गोळीबार केला.

हा हल्ला झाल्याचे लक्षात येताच, मंदिराचे पर्यवेक्षक खोडसिंग जाधव आणि बीएपीएस स्वयंसेवकांनी मुख्य मंदिरातील स्वयंसेवकांशी संपर्क साधून त्यांना मुख्य मंदिराचे गेट त्वरित बंद करण्यास सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला या हल्ल्याची माहिती देण्यात आली.

बरोबर ४ वाजून ४८ मिनिटांनी हा हल्ला झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाला कळवण्यात आलं.

१५ मिनिटांनंतर राज्य पोलीस आणि कमांडो युनिट मंदिराच्या परिसरात पोहोचले. या युनिटने शेकडो भाविकांना मंदिरातील या हल्ल्यातून वाचवले. यांच्याशिवाय त्यांच्या मदतीला तेथील स्थानिक लोकं, परिस्थितीचे गांभीर्य पाहून मदतीसाठी पुढे आले, ज्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली.

दहशतवाद्यांनी आपले टार्गेट ऐनवेळेस बदलले होते.

जेंव्हा दहशतवाद्यांना कळलं कि ते मंदिराचा मुख्य दरवाजा उघडू शकत नाहीत, तेव्हा ते प्रदर्शन हॉल क्रमांक १ मध्ये पोहोचले, जिथे मल्टीमीडिया शो चालू होता. त्यांनी सभागृहात उपस्थित पुरुष, महिला आणि मुलांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. आणि त्यात अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि काही जखमी झाले.

प्रदर्शन हॉलमध्ये गोंधळ माजवून ते नंतर मंदिराच्या परिक्रमा मार्गात लपले. 

अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.

सुरक्षा दलांनी मंदिराच्या आवारात दहशतवादी लपलेले आढळल्याने हल्ल्यात अडकलेल्या भाविकांना  हळूहळू बाहेर काढायला सुरुवात केली. मुख्य मंदिरात अडकलेल्या भाविकांनाही सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

जेंव्हा दहशतवाद्यांना वाटले की त्यांना पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही, तेव्हा त्यांनी परिक्रमा भागातून उडी मारली आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या कमांडो फोर्सवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी अडवाणी यांना फोन करून NSG ला पाठवण्याची विनंती .

संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींशी बोलून राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या जवानांना परिस्थितीला सामोरे जाण्याची मागणी केली.

एनएसजी गार्ड रात्री १०.१० च्या सुमारास अक्षरधामला पोहोचले आणि सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे ऑपरेशन सुरू झाले. दहशतवादी मध्यरात्री परिसरात बांधलेल्या स्वच्छतागृहात लपले आणि त्यांचे प्राण वाचवले. तोपर्यंत रॅपिड ऍक्शन फोर्स, सीमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकासह अनेक सुरक्षा संस्था मंदिर परिसरात पोहोचल्या होत्या.

हे सगळं घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहशतवादी मारले गेले.

दिवस उगवताच दहशतवाद्यांचा धीर सुटत गेला. त्यांनी सुरक्षा दलांवर सतत गोळीबार सुरू ठेवला होता.  सकाळी ६:४५ च्या सुमारास कमांडो या दहशतवाद्यांना ठार मारण्यात यशस्वी झाले, जे एक्झिबिशन हॉल क्र. जवळ झाडांजवळ लपले होते.

अशाप्रकारे हे थरारनाट्य संपले पण आपण यात अनेक नागरिक आणि अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना गमावलं. 

त्याच्या खूप दिवसानंतर अक्षरधाम मंदिर पुन्हा उघडण्यात आले.  राज्य सरकार आणि मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या सुरक्षेसाठी विविध नवीन उपाययोजना केल्या आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केल्यानंतर ७ ऑक्टोबर २००२ रोजी मंदिर परिसर भक्तांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.