हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा पाया सोलापूरच्या वालचंदंनी रचला, भरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.
मध्यंतरी राफेलच्या वादाच्या चर्चा जोरदार सुरु होती. अनेक आरोपाच्या आणि प्रत्यारोपाच्या फैरी विरोधी पक्ष आणि सरकार कडून केल्या जात होत्या. यामध्ये हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड (HAL) चे नाव सातत्याने चर्चेत होतं.
खुद्द तेव्हाच्या संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी HAL च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा केला होता. आज राफेल भोवतीचे काळे ढग दूर झालेत मात्र काहीजण अजूनही HAL वरती प्रश्नचिन्ह उभे करतात.
आता तर HALचे १५%शेअर्स मोदी सरकार विक्रीसाठी खुले करत आहे अशी बातमी आली आहे. हि सरकारी कंपनी विकली जाणार याचीही नांदी समजली जाते. यावरून मोठा वाद सुरु झाला आहे.
मात्र त्या अगोदर तुम्हाला HAL बद्दल माहिती असायलाच हवं.
हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड हा भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे जिथे प्रामुख्याने लष्करी वैमानिक साधनांची निर्मिती केली जाते. भारताच्या अत्यंत महत्वाच्या नवरत्न कंपनी मध्ये HAL चा समावेश होतो. आशियामधल्या सर्वात मोठ्या एरोस्पेस कंपन्यामध्ये HAL चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ज्या निर्मला सितारमन यांनी HAL च्या कार्यक्षमतेवर टीका केली त्यांच्याच संरक्षण मंत्रालयातर्फे या कंपनीचे कामकाज पहिले जाते.
सुरवातीपासून ही सरकारी कंपनी होती का ? तर नाही.
याची निर्मिती सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी केली.
भारतात विमाननिर्मितीच स्वप्न खूप वर्षापासून वालचंद यांच्या मनात होतं. भारताचे आद्य अभियंता श्री विश्वैशरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली म्हैसूर संस्थान सुद्धा या निर्मिती मध्ये जोडले गेले. अशा महान व्हिजनरी लोकांच्या संकल्पनेतून २३ डिसेंबर 1940 या रोजी बेंगलोर येथे हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड या नावाने ही कंपनी आकारास आली.
HAL च्या फॅक्टरीच्या निर्माणासाठी अमेरिकतून खास याविषयातले तज्ञ असलेले विल्यम पावली यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याच इंटरकॉंटीनेटंल एअरक्राफ्ट कंपनीच्या सहाय्याने सर्वप्रथम अमेरिकन फायटर प्लेन हारलॉ PC-5 या विमानाची निर्मिती करण्यात आली.
या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असणाऱ्या भारतातल्या ब्रिटीश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या प्रोजेक्टचे महत्व ओळखले. त्यांनी या कंपनीचे एक तृतिआंश शेअर्स खरेदी केले. पुढे कंपनीचा ताबा मिळवला.
ब्रिटीश हार्डवेअरचा सप्लाय वाढल्याने बेंगलोर येथे विमाननिर्मितीने वेग गाठला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा प्रवेश झाला आणि जपान विरुद्धच्या हवाई युद्धासाठी त्यांनी HAL ची मदत घेतली. अमेरिकन लढाऊ विमानाची निर्मिती दुरुस्ती बेंगलोरला होऊ लागली. यातून कंपनीला बराच आर्थिक फायदा झाला शिवाय अद्यावत तंत्रज्ञानसुद्धा अवगत झाले.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि HAL चा कारभार भारत सरकारकडे आला.
नव्या भारताचे सक्षम हवाई दल उभारण्यात HAL चा वाटा सिंहाचा आहे. १९४८ साली कोल्हापूरचे विष्णू माधव घाटगे यांची चीफ डिझायनर म्हणून नेमणूक करण्यात आली. यापूर्वी ही HAL मध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव होता. ऑगस्ट १९५१ साली घाटगेंच्या नेतृत्वाखाली HT-2 या ट्रेनर विमानाची निर्मिती करण्यात आली.
भारतीय हवाई दलासाठी बनवण्यात आलेले आणि संपूर्ण डिझाईन व बांधणी भारतीय असलेले हे पहिलेच विमान होते. खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया असलेले हे विमान होते. भारतीय हवाई दळ आणि नौदलासोबतच घाना सारख्या देशांना या विमानाची निर्यात करण्यात आली. १९५७ साली ब्रिस्टोल सिडली ओर्पस या जगात गाजलेल्या विमान इंजिनचे लायसन्स HAL ला मिळाले.
१९६१ साली HF मारुत ची निर्मिती करून अख्या जगभरात आपल्या देशाची मान उंचावली. HF-मारूत हे आशिया खंडात बनलेले पहिले फायटर जेट विमान होते. सोबतच हवाई निरीक्षणासाठी कृषक, फ्लायिंग क्लब साठी पुष्पक, जेट ट्रेनर किरण ही विमाने बनवण्यात आली.
१९६४ साली एरोनोटीक्स मॅन्युफक्चरिंग डेपोला HAL मध्ये विलीन करण्यात आले आणि या कंपनीचे नांव हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड असे करण्यात आले. भारतीय विमाननिर्मितीक्षेत्रातले महर्षी म्हणून ओळखले जाणारे विष्णू घाटगे १९७० मध्ये निवृत्त झाले.
सत्तरच्या दशकात चेतक आणि चिता या हेलीकॉप्टरच्या निर्मितीचे लायसन्स HAL ला मिळाले आणि त्यांच्या निर्मितीसाठी नवीन कारखाना सुरु करण्यात आला. कृषीकामासाठी बसंत विमान ,ट्रेनिंगसाठीचे अजित विमान अशी अनेक निर्मिती सुरु होती. हैद्राबाद आणि लखनऊ मध्ये संशोधन केंद्रे विकसित करण्यात आली.
१९७९ साली त्यांना प्रसिद्ध ब्रिटीश लढाऊ विमान जग्वार बनवण्याचे लायसन्स मिळाले.
१९८२ मध्ये HAL ल रशियाच्या मिग २७-M या अत्याधुनिक विमान बनवण्याचे लायसन्स मिळाले आणि नाशिक मध्ये त्याच्या निर्मितीचा कारखाना सुरु करण्यात आला. याच दशकात विमान निर्मितीमध्ये आपण लक्षणीय वेग पकडला. कोरवा डिविजन मध्ये शस्रभेदी कॉप्युटर, नेव्हिगेशन सिस्टीम, लेसर रेंजर अशा अॅडव्हास तंत्रज्ञानावर संशोधन करण्यात येऊ लागले. १९८८ साली भारतीय स्पेस प्रोग्राम इस्रोला लागणाऱ्या मदतीसाठी HAL ने नवीन डिविजन सुरु केले. १९९२ साली HAL ध्रुव या हलक्या वजनाच्या लढाऊ हेलीकॉप्टरची निर्मिती केली. त्यालाच पुढे अपडेट करून त्याचे रुपांतर रुद्र हेलीकॉप्टर मध्ये २००७ साली करण्यात आले.
२००१ साली जुन्या होत जाणाऱ्या रशियन मिग २१ विमानाला रिप्लेस करण्यासाठी HAL ने HAL-तेजस हे लढाऊ जेट बनवले.
हवाई दलात भारतीय बनावटीच्या तेजसची शानच काही और आहे. जगात सर्वोत्तम म्हणून नावाजले गेलेले सुखोई ३० एमकेआय या विमानाची निर्मिती HAL च्या नाशिक प्लांट मध्ये सुरु करण्यात आली. पुढे ब्राम्होस या सुपरसोनिक क्रुज मिसाईल सुखोई ला बसवण्यात आले. आज सुखोई हे भारताच्या भात्यातले सर्वात खतरनाक अस्त्र आहे. त्याची पूर्ण निर्मिती भारतात करण्यात येते आणि त्याचे तंत्रज्ञान सुद्धा भारताला हस्तांतरित करण्यात आलय. आज पर्यंत २४९ सुखोई विमाने HAL ने बनवली आहेत.
फक्त लढाऊ विमानेच नाही तर आर्द्रा रोहिणी हे ग्लायडर्स, सरस सारखे वाहतूक करणारे विमान, लक्ष्य, निशांत ही मानवविरहीत विमाने यांची देखील HAL ने निर्मिती केली आहे.
हे ही वाचा –
- आजच्याच दिवशी रघुनाथ माशेलकरांनी हळदीचं युद्ध जिंकल होतं !
- ७ बायकांनी ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला लिज्जत पापडचा प्रवास !
२००८ पासून भारतीय हवाई दलाची गरज पाहून भारतीय बनावटीच्या मध्यम पल्ल्याच्या विमान निर्मितीचा प्रोजेक्ट HAL मध्ये सुरु आहे. म्हणावे तेवढी आर्थिक पाठबळ सरकारकडून न मिळाल्याने या प्रोजेक्टचा वेग मंदावला आहे.
दरम्यान २०१२ साली भारतसरकारने फ्रेंच कंपनी DASSAULT शी १२६ राफेल विमान खरेदीचा करार केला. या पैकी १०८ विमाने भारतात HAL मध्ये बनवण्यात यावी अशी अट घालण्यात आली होती. याचे तंत्रज्ञान सुद्धा HAL कडे हस्तांतर करण्यात यावे असे मुद्दे त्यात होते. १३ मार्च १९१४साली DASSAULT ने HAL शी वर्कशेअर करार केला. जवळपास ५२६ कोटी मध्ये हे विमान मिळेल असे जाहीर करण्यात आले. मात्र पुढे सरकार बदलले आणि याची सर्व गणिते बदलण्यात आली. नव्या सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली स्वतः फ्रान्सला जाऊन राफेलशी जुना करार रद्द करून ३६ विमान खरेदीचा नवा करार केला.
या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे आता पर्यंत HAL मध्ये भारतीय हवाई दलाची विमाने निर्मितीची ७० वर्षाची परंपरा खंडीत करण्यात आली.
पूर्वीच्या करारापेक्षा तिप्पट किंमतीमध्ये या विमानांची खरेदी झाली. अनिल अंबानीच्या रिलायन्स डिफेन्स या अनुनभवी कंपनीला या प्रोजेक्ट मध्ये भागीदार बनवण्यात आले. DASSAULT ने यापूर्वीही रिलायन्सचे नांव पुढे करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मागच्या सरकारने तो होऊ दिला नाही.
सुखोईची निर्मितीचे टार्गेट येत्या एक दोन वर्षात पूर्ण होईल. त्यानंतर राफेल विमान निर्मिती येथे होणार होती मात्र हा करार रद्द झाल्याने आज HAL च्या ५००० अधिकारी आणि कर्मचार्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
त्यातच सरकार मधूनच गौरवशाली परंपरा असलेल्या या कंपनी वर टीका करण्यात आल्याने या कर्मचाऱ्याच्या नैतिक धैर्य ढासळत आहे. भारत सरकारने HAL च्या उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळेच तीला नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे. आज त्याच्यावरच जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार कडून कोणते प्रयत्न केले जात आहेत हा सवाल जनतेकडून विचारला जातोय.
नुकतेच निवृत्त झालेले HAL चे संचालक श्री सुवर्णराजू यांनी ग्वाही दिली की जर आम्ही सुखोई विमान बनवू शकतो तर राफेल विमान निश्चित बनवू शकतो…
यामुळेच नागरिकांकडून मागणी येत आहे की सरकारने कंपनीची विक्री करण्याऐवजी त्याची तब्येत सुधारण्यासाठी लक्ष द्यावे. तरच आत्मनिर्भर भारत बलशाली भारत बनेल हे नक्की.
हे ही वाचा –
- वालचंदनगरवाले वालचंद हिराचंद ! – भाग २
- महाराष्ट्राचा आवडता जैन माणूस !
- उद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय !!!