थायलंडच्या बौद्ध राजाचे सर्व धार्मिक विधी भारतीय ब्राह्मण पार पाडतात…

आपल्याकडे सत्यनारायणाची कथा असो, गणपतीची प्रतिष्ठापना असो किंवा मग लग्न असो सगळ्यांमध्ये गुरुजी लागतातच. प्रत्येक प्रमुख धार्मिक कार्यासाठी गुरुजींना बोलावलं जातं. एवढंच नाही तर हे धार्मिक कार्य पार पडणारे गुरुजी बहुतांश ब्राह्मणच असतात.

गुरुजी ब्राह्मण असतात हे काही आपल्याला नवीन नाही कारण पूर्वापार पद्धतीने हिंदू धर्मातील धार्मिक पौरोहित्य हे ब्राह्मणांकडेच देण्यात आले आहेत.

परंतु भारतापासून लांबवर असलेल्या थायलंडच्या बौद्ध राजाच्या महालातलं पौरोहित्य सुद्धा भारतीय ब्राह्मणच करतात. 

थायलंडचे राजघराणे जरी धर्माने बौद्ध असले तरी सुद्धा त्यांच्या राज्याभिषेकापासून ते धार्मिक अनुष्ठानापर्यंत सगळे पौरोहित्य भारतीय वंशाचे ब्राह्मणच करतात.  

थायलंड हा बौद्ध बहुसंख्याक देश आहे. सामान्य लोकांप्रमाणेच थायलंडचे राजघराणे सुद्धा बौद्ध धर्मियांचा आहे. मात्र थायलंडच्या बौद्ध राजाला रामाचा अवतार मानलं जातं त्यामुळे त्यांच्या सर्व विधी हिंदू धर्माच्या पद्धतीने भारतीय वंशाचे ब्राह्मणच करतात. 

परंतु थायलंडचे राजे बौद्ध असून ते स्वतःला राम का म्हणवून घेतात हे जाणून घेण्यासाठी थायलंडचा इतिहास समजून घ्यावा लागेल.

तर गेल्या २४० वर्षांपासून थायलंडमध्ये चक्री साम्राज्याची सत्ता आहे. वर्तमानात त्यांचेच दहावे वंशज महावाजीरालोंकोर्न म्हणजेच राम दहावे हे थायलंडचे राजे आहेत. राम यांच्या चक्री साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वी थायलंड आणि कंबोडियाच्या भागावर खमेर साम्राज्याची सत्ता होती.

खमेर साम्राज्य आणि दक्षिण पूर्व आशियातील भागात आज बौद्ध धर्मीय लोकं राहत असली तरी ती एकेकाळी हिंदूच होती. त्यामुळे या भागातील अनेक परंपरा या हिंदू धर्माशी निगडित आहेत. एकेकाळी दक्षिण भारतात असलेले चोळ साम्राज्य दक्षिण पूर्व आशियाच्या अनेक भागात पसरले होते. त्यात इंडोनेशिया, कंबोडिया ते बर्मा असा विस्तृत प्रदेश होता.

त्या काळात चोळ राजांमध्ये देवराज संकल्पना अस्तित्वात होती. या संकल्पनेनुसार राजा हा देव असतो. चोळांचा प्रभाव या भागावर असल्यामुळे देवराज ही परंपरा कंबोडियाच्या खमेर राजवंशाची राजे जयवर्मन द्वितीय यांनी सुद्धा स्वीकारली. काळानुरूप खमेर राजांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला. परंतु त्यांनी देवराज ही परंपरा सोडली नाही.

त्यांनतर खमेर साम्राज्याच्या पतनानंतर त्यांचेच मंडलिक असलेल्या स्थानिक थाई राजांनी सुद्धा ही देवराज परंपरा कायम ठेवली.

४ व्या शतकातील अयुथियाचे पहिले राजे रामथी बोदी प्रथम यांनी आपल्या राज्याभिषेकासाठी भारतातून काशीच्या ब्राह्माणांना थायलंड मध्ये बोलावलं होतं. राजाच्या राज्याभिषेकासाठी काशीहून थायलंडला गेलेल्या ब्राह्मणांनी कायमसाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय ब्राह्मण पहिल्यांदा थायलंडमध्ये स्थायिक झाले. 

अयुथियाचे राजे रामथी बोथी प्रथम यांच्या काळात जे ब्राह्मण थायलंडला गेले त्यांनाच ब्रह्मलुआंग ब्राह्मण म्हणतात आणि तेव्हापासून हेच ब्राह्मण राजाचे पौरोहित्य करतात. 

अयुथियाच्या राज्याच्या पतनानंतर १७८२ मध्ये चक्री साम्राज्याची स्थापना झाली. या राज्याची स्थापना पहरा पुत्थायोतफ़ा चुलालोक महाराज उर्फ राम प्रथम यांनी या राज्याची स्थापना केली. तेव्हापासून आजगायत याच चक्री राघराण्याचे राज्य थायलंडवर आहे. स्वतःला रामाचा अवतार मानणाऱ्या या राजघराण्याने सुद्धा देवराज ही परंपरा कायम ठेवली.

निव्वळ राज्याभिषेकासाठी थायलंडमध्ये स्थायिक झालेले ब्राह्मण परिवार हळूहळू थायलंडच्या राजदरबारात सुद्धा समाविष्ट झाले. त्यामुळे राजदरबारातील महत्वाच्या पदांवर ब्राह्मणाचं वर्चस्व वाढलेलं होतं. परंतु १८५१ ते १८६१ च्या दरम्यान थायलंडावर राज्य करणाऱ्या राम चतुर्थ यांनी देशात आधुनिकीकरणाला सुरुवात केली. त्या आधुनिकीकरणादरम्यान राजदरबारातील ब्राह्मणाची भूमिका कमी करून टाकली.

राम चतुर्थ यांच्या काळात ब्राह्मणाचे अधिकार कमी झालेच सोबतच १९३२ मध्ये थायलंडमध्ये लोकशाही क्रांती घडून आली. त्या क्रांतीनंतर ब्राह्मणाचे अधिकार आणि संख्या कमी करण्यात आली. एकेकाळी दरबारात बहुसंख्य असलेल्या ब्राह्मणांची संख्या १९३२ मध्ये केवळ ५ राहिली.   

परंतु १९४६ मध्ये सत्तेवर आलेले नववे राम भूमिबोल अदुल्यादेज यांनी दरबारातील ब्राह्मणाची संख्या परत वाढवली आणि बऱ्याच परंपरांना पुन्हा सुरु केलं. त्यामुळे परत एकदा ब्राह्मणांना महत्व प्राप्त झालं. 

ब्राह्माणांकडून जी राज्याभिषेकाची विधी करून घेतली जाते त्याला रिचफीसेक म्हणतात. हा शब्द संस्कृतमधील राज्याभिषेक वरून घेण्यात आलाय. त्याचबरोबर दरवर्षी  त्रियमपवई तिरूपवै नावाचा उत्सव साजरा केला जातो. ज्याला झुल्याचा उत्सव म्हणतात परंतु या उत्सवावर प्रचंड खर्च व्हायचा आणि सुरक्षा पुरवावी लागायची त्यामुळे १९३२ मध्ये तो उत्सव बंद करण्यात आला होता.

मात्र ‘रायक ना ख्वा’ नावाचा पेरणीचा सन आजही थायलंडमध्ये साजरा केला जातो. ज्यामध्ये ब्राह्मण पौरोहित्य करतात. ही परंपरा थायलंड बरोबरच म्यानमार आणि कंबोडिया मध्ये सुद्धा साजरी केली जाते. 

ब्रह्मालुआंग ब्राह्मण वाराणसीवरून आलेले आहेत असा त्यांचा उल्लेख केला जातो मात्र ‘क्रॉनिकल ऑफ ब्राह्मण ऑफ नखोनसीथमारत’ च्या नोंदीनुसार हे ब्रह्मालुआंग ब्राह्मण भारतातील रामरत येथून आल्याची नोंद आहे. ज्याची संस्कृती भारतातील रामेश्वरांशी मिळती जुळती आहे. या ब्राह्मणांच्या परंपरा तामिळ पद्धतीच्या आहेत. तसेच त्यांच्या सर्व विधींमध्ये तामिळ भाषेचा प्रभाव दिसतो.

जेव्हा राम प्रथम यांनी बँकॉक शहराची स्थापना केली तेव्हा त्यांनी या ब्रह्मालुआंग ब्राह्मणांसाठी एक वेगळ्या भागाची सुद्धा रचना केली. त्यात राजदरबारातील ब्राह्मणांची घरे आहेत. या परिसरात विष्णू,शिव, ब्रह्मा, गणेश यान हिंदू देवतांची मंदिरे आहेत. हे ब्राह्मण हिंदू देवीदेवतांची पूजा करत असले तरी स्वतःला बौद्ध म्हणवून घेतात.

राजाप्रमाणे सामान्य लोकं सुद्धा ब्राह्मणाकडून विधी करून घेतात. बहुतांश पौरोहित्य बौद्ध भिक्षु करतात परंतु जर त्यांच्या विधींमुळे काम पूर्ण होत नसेल तर तांत्रिक कामांसाठी ब्राह्मणांना बोलावले जाते. 

ब्रह्मालुआंग ब्राह्मणांसोबतच थायलंडमध्ये ब्रह्मचाओबाण ब्रह्मण राहतात. ब्रह्मचाओबाण ब्राह्मण सुद्धा स्वतःला भारतीय वंशाचे मानतात परंतु त्यांना पौरोहित्याचे फारसे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना फारशी किंमत दिली जात नाही. तसेच अलीकडच्या काळात भारतातून थायलंडमध्ये स्थलांतरित झालेले ब्राह्मण सुद्धा थायलंडमध्ये राहतात. परंतु ब्रह्मालुआंग ब्राह्मणांइतका दर्जा कुणालाच दिला जात नाही. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.