जगातील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर भारतात नाही परदेशात आहे

जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे कुठे आहे? असा प्रश्न तुम्हाला केला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? असेल भारतातच कुठेतरी नाहीतर स्पेसिफिकली साऊथमध्ये असेल, असं उत्तर असू शकतं. मात्र हे सपशेल चूक आहे. जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून दुसऱ्या देशात आहे. जवळपास शेकडो वर्ष असं एखादं हिंदू मंदिर अस्तित्वात आहे, हे जगाला माहित नव्हतं. 

हा देश आहे कंबोडिया आणि मंदिराचं नाव आहे अंगकोर वाट.

अचानक हा विषय घेण्याचं कारण म्हणजे… परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा कंबोडिया दौरा. एस. जयशंकर ३ ऑगस्टला भारत-आशियन मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी कंबोडियाला गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कंबोडियातील अंगकोर वाट या मंदिराला भेट दिली. त्यानंतर…

“या मंदिराची भव्यता पाहून खूप आश्चर्य वाटलं. हे मंदिर म्हणजे भारताचे इतर देशांशी असलेले खोलवर रुजलेले ऐतिहासिक संबंध दाखवतात” 

असं ट्विट त्यांनी केलं. सोबतच भारतीय पुरातत्व विभाग देखील याच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. 

त्यांच्या या ट्विटनंतर कंबोडियाचं अंगकोर वाट मंदिर चर्चेत आलंय. हे हिंदू मंदिर बाहेरच्या देशात कसं उभारलं गेलं? याचा इतिहास काय आहे? असं सर्व जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. तीच माहिती देणारा हा लेख… 

भारतापासून जवळपास ४९३३ किलोमीटर अंतरावर कंबोडियाच्या अंगकोर शहरात हे मंदिर आहे. सुमारे ४०२ एकरमध्ये विस्तारलेलं हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. इतिहासतज्ञांच्या म्हणण्यानुसार, २ व्या शतकात खमेर वंशाचे राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी मंदिराची निर्मिती केली होती. मात्र नंतर याचं रूपांतर बौद्ध मंदिरात झालं. यामागे एक कथा सांगितली जाते… 

अंगकोर शहराचं प्राचीन नाव यशोधरपूर असं होतं. यशोधरपूरचा राजा सूर्यवर्मन अत्यंत धार्मिक होता. म्हणून त्याने सगळ्यात जास्त संपत्ती साम्राज्यात मंदिरं बांधण्यासाठी खर्ची केली. त्यात सूर्यवर्मन राजाची भगवान विष्णूंवर जास्त श्रद्धा होती. त्यामुळे त्याने भगवान नारायणाचं सर्वात मोठं मंदिर बांधण्याचं काम हाती घेतलं. 

मात्र संपत्ती अपुरी पडल्याने त्याच्या काळात मंदिर पूर्ण होऊ शकलं नाही. इतकंच काय ११५० ते ११८१ दरम्यान राज्यात कोणतंही मंदिर किंवा शिलालेख देखील लिहिला गेला नाही. 

नंतर राजा धर्मेंद्र वर्मन यांनी मंदिर पूर्ण केलं. १४ व्या शतकात खमेर साम्राज्यावर परकीयांचं आक्रमण वाढलं तेव्हा इथल्या रहिवाशांनी त्याविरुद्ध लढा न देता घाबरून शहर सोडलं. त्यानंतर बौद्ध धर्मांचे लोक इथे आले आणि या हिंदू मंदिरांचं परिवर्तन बौद्ध मंदिरांत झालं. 

WhatsApp Image 2022 08 05 at 8.04.07 PM 1
source – social media

बौद्ध धर्माच्या शासनानंतर १६ व्या शतकापर्यंत अंगकोर शहर सुमसान झालं आणि इथली मंदिरं खंडर झाली. तिथे मोठं जंगल तयार झालं आणि त्यामुळे जगाच्या नजरेतून अंगकोर वाट मंदिर लुप्त झालं. मात्र १९ व्या शतकाच्या मध्यात ‘हेन्री माहोत’ नावाच्या एका फ्रेंच पुरातत्ववाद्याने हे मंदिर शोधून काढलं.

अंगकोर शहरावर जवळपास २७ बौद्ध आणि हिंदू शासकांनी राज्य केलं म्हणून इथे बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही मूर्ती दिसतात. मात्र त्याची खासियत आहे अंगकोर कोट हे मंदिर. मंदिराची रचना बघता त्याकाळातील कडेकोट सुरक्षा व्यवस्था समजून येते. मंदिराच्या चारही बाजूंनी जवळपास ७०० फूट खोल पाण्याने भरलेले खदंक आहेत.

फक्त एका साईडला लांब पूल आहे जिथून मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिराचा दरवाजा सुमारे १००० फूट रूंद आहे. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची ६४ मीटर आहे तर त्याच्या बाजूने ८ इतर शिखर आहेत ज्यांची उंची ५४ मीटर आहे. मंदिर चारही बाजूंनी साडेतीन किलोमीटर उंच दगडी भिंतींनी संरक्षित आहे. त्याच्या बाहेर ३० मीटर खुली जागा आणि मग १९० मीटर रुंद खंदक आहे. 

या विष्णु मंदिराला मेरू पर्वताचं प्रतीक मानलं जातं. मंदिराच्या कॉरिडॉर आणि भिंतींवर संपूर्णतः रामायण कोरलेलं आहे. शिवाय या शिलालेखांमध्ये रामकथेचं वर्णन देखील आहे. सोबतच भारतीय धर्मग्रंथांतील अनेक कथांचं चित्रण यावर करण्यात आलंय. 

समुद्र मंथन, सीता स्वयंवर, दैत्य-असुर युद्ध,  तत्कालीन सम्राट, नारायणांची रूपं जसं की, बळी, वामन, स्वर्ग-नरक, महाभारत, हरिवंश पुराण अशी अनेक चित्रं रेखाटलेली आहेत. एकेक प्रसंग अगदी विस्तुत कोरण्यात आलाय. या कलाकृती भारताच्या कलाकारांची समृद्धता दाखवून देतात. 

आधुनिक कंबोडियात अशी ४५० स्मारकं सध्या आहेत. यांच्यावर सरकारचा अधिकार असून अंगकोर कोट मंदिर म्हणजे राष्ट्रासाठी सन्मानाचं प्रतीक असल्याचं शासनाचं म्हणणं आहे. म्हणूनच या मंदिराला राष्ट्रध्वजावर जागा देण्यात आलीये. इतकंच नाही तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील या मंदिराला स्थान देण्यात आलंय.

WhatsApp Image 2022 08 05 at 8.04.04 PM
source – social media

वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आणि भारतीय संस्कृती दाखवण्याचं आदर्श ठिकाण म्हणून लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक या मंदिराला भेट देतात. फक्त मंदिरच नाही तर इथला नयनरम्य सूर्योदय आणि सूर्यास्त देखील लोकांना आकर्षित करतो. इथे १ हजार फुटाचा एलिफंट टेरेस सुद्धा आहे. ज्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी वापर केला जात होता, असं म्हटलं जातं.

तर प्रिच खान (Preach Khan) हे अंगकोर वाटमधील सर्वात मोठ्या साइट्सपैकी एक मानलं जातं. इतिहासकार मानतात की, इथे एक मोठं युद्ध लढलं गेलं होतं. १९८६ ते १९९३ या काळात अंगकोर वाट मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घेतली. 

अनेक राजे-महाराजे, साम्राज्यांचा विनाश बघितलेल्या या मंदिराच्या वाटेला देखील फारसे चांगले दिवस आले नाही. आज हे मंदिर मोठमोठ्या झाडांनी घेरलेलं आहे. मात्र तरी या सगळ्यातून ते मंदिर तठस्थ उभं आहे आणि हिंदू धर्माच्या इतिहासाच्या कथा जगाला सांगतंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.