नव्वदीत पदार्पण केलं असलं तरी आजही आशाच्या आवाजाची जादू कायम आहे

आज इतक्या वर्षानंतर आपण जेंव्हा आशा आणि आर डी बर्मन यांची गाणी ऐकतो, पहातो तेंव्हा काही बाबी अगदी स्पष्ट जाणवतात. सत्तरच्या दशकात आशाचा स्वर आर डी यांनी प्रमुख नायिकासाठी अभावानेच वापरला. पण आशाने याच नकारात्मक गोष्टीत मोठी बाजी मारली. क्लब सॉंग असो किंवा कॅबरे आपल्या मादक स्वराचा सर्वोत्कृष्ट वापर करत आशा ने हेलन, बिंदू यांच्यावर चित्रित गाणी लोकप्रिय केली. आशाच्या स्वराचा वापर यापूर्वी कुणी अशा रीतीने केला नव्हता. ऐशीच्या दशकात मात्र पंचम ने आशाला मुख्य पर्वात आणून उत्तमोत्तम गाणी दिली. 

आज ८ सप्टेंबर २०२२. ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले वयाची ८९ वर्षे पूर्ण करीत आहेत.

आशा यांच्या आर डी सोबतच्या सुरील्या कालखंडाचा हा आढावा. 

गेली सत्तर वर्षे या स्वराने रसिकांना आपल्या स्वराने मंत्रमुग्ध केले. गाण्यातील कुठलाही प्रकार या स्वराला वर्ज्य नव्हता. उलट स्वरातील वैविध्याने नटलेल्या असंख्य गीतांनी त्यानी आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.

‘दिल लगाकर हम ये समझे जिंदगी क्या चीज है’ सारखी गजल असो, ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ सारखी कव्वाली असो,’इन आंखो की मस्ती में’ सारखा मुजरा असो,’उडे जब जब जुल्फे तेरी’ सारखा भांगडा असो, ‘ तोरा मन दर्पण कह लाये ‘ सारखा सात्विक भक्ती भाव असो , ‘रेशमी उजाला है मखमली अंधेरा’ सारखी मादकता असो किंवा ‘ पिया तू अब तो आजा ‘ सारखा कॅबरे असो या स्वराला काहीही वर्ज्य नाही.

गायकीच्या सर्व क्षेत्रात मुशाफिरी करत आशाने भारतीय सिने संगीतात सर्वाधिक लोकप्रिय गाणी गाण्याचे एव्हरेस्ट उभे केले. १९९४ साली विश्वास नेरुरकर यांनी ‘स्वराशा’ हा आशाच्या हिंदी चित्रपट गीतांची इत्यंभूत माहिती देणारा ग्रंथ प्रकाशित केला. तोवर आशाने २९०७ चित्रपटातून ७५९५ गाणी गायली होती.

संगीतकारांच्या सोबत गायलेल्या गाण्यांचा जर आढावा घेतला तर सर्वाधिक गाणी राहुल देव बर्मन तथा पंचम यांच्याकडे २५० चित्रपटातून ६५२ गाणी गायलेली दिसतात. पंचम सोबतचं आशाचं नातं वेगळंच होतं. त्या दोघांमधील केमिस्ट्री सर्वाथाने जुळणारी होती. दोघातील मैत्रीला नंतर नात्याचे स्वरूप आले आणि संगीताच्या द्र्ष्टीने रूक्ष असलेले ऐशींचे दशक केवळ या दोघांमुळे सुसह्य ठरले..

आर डी बर्मन यांचे रुपेरी पडद्यावर स्वतंत्र रित्या संगीतकार हे नाव १९६१ सालच्या ‘छोटे नवाब ‘ या चित्रपटापासून झळकले असले तरी आशा चा स्वर पहिल्यांदा गाजला १९६६ सालच्या गोल्डीच्या ‘तिसरी मंझिल’ या सिनेमापासून. या चित्रपटापासून आर डी संगीताच्या दुनियेत स्थिरस्थावर झाला. यात आशाची रफी चार युगल गीते होती.’ओ मेरे सोना रे सोना रे सोना ‘,’आजा आजा मै हूं प्यार तेरा’,’देखिये साहिबो वो कोई ‘,’ओ हसीना जुल्फो वाली जाने कहां’ या गाण्यांनी कहर लोकप्रियता मिळवली.

 भारतीय प्रेक्षकांना हे सारं नवीन होतं. विशेषत: ‘आजा आजा ‘ या गाण्यात आशाने श्वासाचा केलेला वापर अनोखा होता. यात पाश्च्यात्त्य संगीतातल्या जॅझचा सुंदर वापर होता. . ड्रम्स चे अप्रतिम सोलो पीसेस , र्‍हीदम मधील नावीन्यता, ओ हसिना मधला लक्षात राहणारा ट्रॅंगलचा आवाज, याच गाण्यामधे तीन अंतर्‍यांसाठी शम्मीच्या हातात दिलेली सॅक्सोफोन, ट्रंपेट आणि ट्रंबोन ही तीन वेगळी वाद्ये, परीक्षा घेणार्‍या ’आजा आजा’ आणि ’देखिए साहेबो’ अशा जगावेगळ्या चाली… ‘तिसरी मंझिल’ सिनेमा, आशा भोसले आणि पंचम तिघेही सुपर हिट ठरले. 

आशाचा स्वर पंचमच्या सुराचा अविभाज्य भाग बनला. 

१९७० साली पंचमचे पाच चित्रपट आले पैकी ‘कटीपतंग ‘ आणि ‘द ट्रेन’ आशा करीता उल्लेखनीय ठरले. यातील ‘मेरा नाम है शबनम प्यार से लोग मुझे शब्बो कहते है’ हे गाणे बिंदूवर चित्रित होते. या गाण्यातील बिदूंच्या व्हॅंप अदेला साजेसा अभिनय आशाच्या स्वरातून दिसला. 

याच वर्षी आलेल्या ‘द ट्रेन’ मध्ये ‘छईया रे छईया ’ हे गाणे अरुणा इराणी वर चित्रित होते तर पुढच्या वर्षी आलेल्या ‘कारवां’ तील ‘पिया तू अब तो आजा ‘ हे गीत हेलन वर चित्रित होते. तीनही गाणी अफाट गाजली. हि सारी गाणी सह नायिकांवर चित्रित होती. पण आर डी याच काळात नायिकांवर चित्रित गाणी लताला देत होता हे दुर्दैवाने म्हणा पण खरेच होते.

या दशकातील या दोघांचं सर्वात गाजलेलं गाणं १९७२ सालच्या ‘हरे रामा हरे कृष्णा ‘ या सिनेमात होतं. पुढच्या तीन पिढ्या ज्या गाण्यावर झिंगल्या ते गीत बिनाकाचे त्या वर्षीचे सर्वोत्तम गीत होते. ‘दम मारो दम मिट जाये गम ‘ या गीताने सारी तरुणाई नादावली गेली. 

आशाच्या स्वराचा सर्वोत्तम वापर आर डी ने करून घेतला.

विशेषत: मादक पेटत्या ‘seductive’ स्वर हवा असेल तर आशा सर्वोत्तम असायची. ‘कारवां’ सिनेमात ‘अब जो मिले है ‘ या गाण्यात आशा जेंव्हा ‘हाय रे ‘ हाय रे’ ‘ स्स्स्सस्स्स’ असा अफलातून उच्चार करते जे उसासे टाकते त्याला तोड नाही. इतर कुठल्याही गायिकेला असा sensuous स्वर काढता येणार नाही!

‘दम मारो दम ‘ च्या सुरुवातीचा म चा आशाने केलेला दीर्घ उच्चार आणि बेस गिटारचा पीस अफलातून होता. सत्तरच्या दशकाच्या याचा प्रत्यय येत होता. या दरम्यानची आशाची पंचम कडील सोलो आणि ड्युएट गाणी पहा. आओ ना गले लगाओ ना (मेरे जीवन साथी).

या गीतातील आशाचा सुरुवातीचा ज्याला इंग्रजीत व्हिस्पर व्हाईस म्हणतात तो आणि ट्रॅंगलचा आवाज मस्त जमून आला होता. आज की रात कोई आने को है(अनामिका)बेचारा दिल क्या करे (खुशबू) मै चली मै चली देखो प्यार की गली (पडोसन),कोई माने या न माने (अधिकार) , भली भली सी एक सूरत (बुढ्ढा मिल गया) सारे के सारे ग मा को लेकर (परिचय) आओ झुमे गाये (परायाधन)अगर साज छेडा तराने बनेंगे , जाने जा ढूंढता फिर रहा,नही नही अभी नही (जवानी दिवानी)एक मै और एक तू , सपना मेरा टूट गया, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे (खेल खेल में)ओ मेरी सोनी,

लेकर हम दिवाना दिल ,आपके कमरे में कोई रहता है,चुरा लिया है तुमने जो दिल को (यादोंकी बारात), हवाके साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल (सीता और गीता)दुनिया में लोगोंको धोका (अपना देश) आया हूं मै तुझको ले जाउंगा (मनोरंजन)ये लडका हाय अल्ला, है अगर दुश्मन दुश्मन, मिल गया हमको साथी (हम किसीसे काम नही),आती रहेगी बहारे, मिले जो कडी कडी (कस्मे वादे),पल दो पल का साथ हमारा (द बर्निंग ट्रेन) दो लफ्जो की है ये कहानी (द ग्रेट गॅंबलर)भीगा बदन जलने लगा,जश्ने बहारा महफिल ए यारा (अब्दुल्ला)

जीना क्या अजी प्यार बिना (धन दौलत) ये साये है ये दुनिया है (सितारा)प्यार करने वाले प्यार करते है शान से,जानु मेरी जान (शान). ‘जवानी दिवानी’ सिनेमातील ‘जाने जां ढूंढता फिर रहा’ या गाण्यातील आशाचा बेहोष करणारा स्वर आणि पंचमचा सूर अफाट होता.

ऐंशीच्या दशकात आशा आर डी च्या संगीतमय कालखंडाचा नवा अध्याय सुरू झाला.

१९८० मध्ये त्ते दोघे विवाहाच्या बंधनात अडकले गेले. हे दशक संगीताच्या बाबतीत रसिकांची निराशा करणारे दशक होते. पण अशाही परिस्थितीत आशा-आर डी ची काही गाणी आणि चित्रपट विलक्षण होते. यात १९८६ साली आलेला ‘इजाजत’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

ग्रीष्माच्या असह्य होरपळी नंतर आलेल्या पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने उठणाऱ्या मृद्गंधा सारखी हि गाणी होती. प्रतिभाशाली कवी गुलजार यांच्या काव्याला आशाने समोचीत न्याय दिला. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है,कतरा कतरा मिलती है, खाली हाथ शाम आई है या गीतांनी आशा आर डी ने संगीताला नवा आयाम दिला. 

गुलजार – आशा – आर डी या त्रयीच्या सांगीतिक कारकीर्दीचा हा शिखर बिंदू होता. याच वर्षी ‘जीवा’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्यातील अमित कुमार सोबतचे ‘रोज रोज आंखो तले एक ही सपना चले’ अतिशय मेलडीयस होतं. १९८२ साली आलेल्या ‘नमकीन’ या चित्रपटात या त्रयीचे सर्वांग सुंदर गीत होते ‘फिर से आइ वो बरसा बिदेसी तेरे पंखो से मोती जडूंगी’.

या दशकातील आर डी बर्मन यांच्या कडील आशाची गाणी पहा. क्या गजब करते हो जी (लव्ह स्टोरी) सुन सुन दीदी तेरे लिये इक रिश्ता आया है, पिया बावरी (खूबसूरत),तुम्हे छोडके अब जिनेकी , आऊगी एक दिन आज जाऊ (बसेरा)तुम साथ हो जब अपने,सनम तुम जहां मेरा दिल वहां,जब से तुमको देखा जिते है मरते है (कालिया),पूछो ना यार क्या हुआ (जमाने को दिखाना है)

होठो पे बीती बात आई है, रोज रोज डाली डाली क्या लिख जाय (अंगूर) ओ मारिया ओ मारिया, पास आओ ना (सागर) तू तू है वही दिल ने जिसे (ये वादा रहा)कितने भी तू करले सितम हंस हंस के सहेंगे हम,जाने जां ओ मेरी जाने जां (सनम तेरी कसम)प्यार में दिल पे मार दे गोली (महान) और क्या अहदे वफा होते है (सनी) तू रूठा तो मै रो दूंगी सनम (जवानी),चांद कोई होगा तुमसा (इनाम दास हजार)तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके (परिंदा)

आशाने पंचमच्या संगीतात काही बंगाली गाणी गायली होती. त्यांचा ‘दिल पडोसी है’ हा अल्बम देखील खूप लोकप्रिय ठरला होता.पण गंमत म्हणजे आर डी चा शेवटचा चित्रपट ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या सिनेमात मात्र आशाच्या वाट्याला एकही गीत आले नव्हते!

खैर, आज आपली आशा नव्वदीत पदार्पण करते आहे. ‘बोल भिडू’ च्या वतीने आशाला आरोग्यमय शतायुषी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.