हे युद्ध अंबाजी इंगळे हरले नसते तर आजही उत्तर भारतात मराठ्यांचं वर्चस्व असतं..

अहद तंजावर तहद पेशावर पसरलेलं मराठा साम्राज्य. एकेकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देखील मराठ्यांचा जरीपटका फडकायचा. मुघल बादशाहला प्रत्येक गोष्टीत साताऱ्याला बसलेल्या छत्रपतींची परवानगी घ्यावी लागायची. मुघलच नाहीत तर अफगाणिस्तानचे पठाण, राजस्थानचे राजपूत, पंजाबातील शीख राजांवर मराठ्यांची दहशत होती.

हे सगळं घडलं होतं महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवे यांच्या सारख्या वीरांच्या पराक्रमामुळे.

याच पराक्रमी मराठा वीरांच्या मांदियाळीत आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अंबाजी इंगळे.  

महादजी शिंद्यांचे एक सरदार. त्यांचे वडील त्र्यंबकजी इंगळे देखील मराठा आमदानीत तलवार गाजवलेले शूरवीर होते. त्यांचा शौर्याचा वारसा अंबाजी इंगळेंकडे चालत आला होता. पानिपतात देखील या कुटूंबाने कर्तबगारी गाजवली. 

१७८४ साली महादजी पातशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीकडे आले तेव्हा अंबाजी इंगळे देखील उत्तर भारतात त्यांच्याबरोबर आले. महादजी शिंदेंचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यांच्याकडे अनेक जबाबदारीची कामे सोपवण्यात आली होती. पहिल्याच वर्षी जुलै- ऑगस्ट महिन्यांत अंबाजी इंगळे हे पंजाब मोहिमेवर गेले होते. तिथे शीख सरदारांसोबत त्यांचा तह झाला.

अंबाजी इंगळेंकडे केवळ लष्कराचा कारभारच सोपवण्यांत आला होता असे नाही तर १७८७ च्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांत महादजी शिंदेनी त्यांची नेमणूक एका विशेष कामासाठी केली होती.

त्याकाळात मुघल बादशहा गुलाम कादरच्या ताब्यात होता. बादशाह वर हा गुलाम कदर प्रचंड अत्याचार करत असे. त्याचा परिपत्य करून बादशाहची सुटका करायची आणि मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोहचवायची असं त्यांच्यामनात होतं. आपली हि योजना बादशहाच्या कानावर घालण्यासाठी अंबाजी इंगळे यांना वकील म्हणून नेमणूक करण्यात आली.

अंबाजी इंगळेंनी आपली जबाबदारी अतिशय कणखरपणे पार पाडली. 

थोड्याच वर्षांनी अंबाजी इंगळेंना जास्त स्वतंत्रतेने कारभार करण्याची संधि मिळाली. १७९१ सालच्या सुमारास महादजी शिंदेनी अंबाजी इंगळेंना उदयपूरच्या राण्याच्या विनंतीवरून त्याच्या राज्यांतील चोंडावत सरदारांचें बंड मोडण्यासाठीं पाठवले. इंगळेंनी हे बंड मोडून काढलं त्याला राण्याची माफी मागायला लावली आणि वीस लाख रुपये दंड दिला. 

याकाळात अंबाजी इंगळेंनी राजपुतान्यात मोठा पराक्रम गाजवला. सर्व राजपूत राजांनी त्यांचा अधिकार मेनी केला. यातूनच मेवाडच्या कारभाराची सर्व सूत्रें अंबाजीच्या हाती येऊन ते आपणास मेवाडचा सुभेदार म्हणवून घेऊ लागले.

महादजी शिंदेंच्या मृत्यूनंतर अल्पवयीन दौलतराव हे शिंदेशाहीच्या गादीवर आले. त्यांच्याच काळात  अंबाजी इंगळे हे शिंद्यांचा प्रतिनिधि म्हणून उत्तर भारतात सर्वशक्तिशाली बनले. पण लवकरच त्यांना लखबादादा लाड हे प्रतिस्पर्धी बनले. या दोघांच्या स्पर्धेचा फायदा राजपूत राजांनी घेतला आणि मेवाड मधील मराठी सत्ता थोडी डगमगू लागली. 

याच काळात उत्तरेत इंग्रजांचं वर्चस्व वाढण्यास सुरवात झाली होती. भारतातील तेव्हा सर्वशक्तिशाली सत्ता असलेल्या मराठा साम्राज्याला हटवुनच भारत आपल्या ताब्यात येईल हे ईस्ट इंडिया कंपनीच्या ध्यानात आलं होतं. पेशव्यांच्या गादीवरून सुरु असलेले वाद, होळकर शिंदे यांच्यासारख्या दिग्गज सरदारांमध्ये उद्भवत असलेला संघर्ष, पराक्रमी सरदारांच्यातील स्पर्धा, शाहू महाराजांच्या नंतर सातारच्या छत्रपतींची क्षीण झालेली ताकद याचा फायदा उठवण्यासाठी इंग्रज तयारच होते.

शिवरायांच्या काळात नजर वर उचलून पाहण्याचं धाडस नसलेले टोपीवाले इंग्रज भारत जिंकण्याचं स्वप्न पाहू लागले होते. वसईचा तह करून त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना आपल्या खिशात टाकलंच होतं. आता शिंदे होळकर भोसले यांची उत्तरेतली ताकद मोडून काढायची होती. 

लॉर्ड वेलस्लीच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी मराठ्यांच्या विरोधात युद्ध सुरु केले यालाच दुसरे इंग्रज मराठा युद्ध म्हणून ओळखलं जाते. यातली महत्वाची लढाई म्हणजे अल्वरच्या लसवारी गावाजवळ झालेली लढाई.

इंग्रजांकडून गेरार्ड लेकच्या नेतृत्वाखाली दहा हजारांचं सैन्य उतरलं होत तर ९ हजारांच्या मराठा फौजेच नेतृत्व अंबाजी इंगळे यांनी सांभाळलं होतं. मराठा सैन्यात ५ हजारांचे घोडदळ देखील होतं. खरं तर नागपूरचे भोसले आणि शिंदे एकत्र आल्यामुळे अंबाजी इंगळेंची ताकद कागदोपत्री जास्त दिसत होती. 

पण रणांगणात चित्र वेगळचं दिसलं. 

इंग्रज आणि मराठ्यांमध्ये घनघोर युद्ध झालं. दोन्ही बाजूच्या योध्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. अनेक जण कामी आले. खुद्द जनरल लेकचा मुलगा मारला गेला. पण इंग्रजांनी हि लढाई जिंकलीच. अंबाजी इंगळे यांना माघार घ्यावी लागली. प्रचंड नुकसान झालं. मराठा सैन्यातील ७ हजार सैनिक मारले गेले. 

पानिपतच्या नंतर मराठ्यांचा हा उत्तरेतील सर्वात मोठा पराभव असावा. याच युद्धातील पराभवामुळे नागपूरकर भोसलेंनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. शिंदेंना देखील त्यांचा कित्ता गिरवावा लागला. होळकर सोडले तर उत्तरेतील दोन्ही मराठी सत्ता धाराशायी झाल्या होत्या.

याच युद्धातील विजयापासून भारतातील सत्तेचा लंबक मराठ्यांकडून इंग्रजांच्याकडे झुकण्यास सुरवात झाली होती असं मानलं जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.