फतव्यासाठी फेमस असणाऱ्या देवबंद मध्ये प्रचार करणारे अमित शहा पहिले गृहमंत्री आहेत

सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरुये. उमेदवारांची नाव डिक्लेर झाल्यानंतर प्रचार सभांना, रॅलीना गर्दी व्हायला लागलीये. मोठं- मोठ्या नेतेमंडळींनी पावलं कधी नव्हे ते गल्ली- बोळात पडायला लागलीये. अशातचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी देवबंदला  भेट दिली.

पण जिथे प्रचार सभा आणि रॅलीमध्ये नेतेमंडळी २ – ४ तास घालवतात, तिथे गृहमंत्री या देवबंदमध्ये धड २० मिनिट सुद्धा थांबले नाहीत. म्हणजे अमित शहा दुपारी २.३२ ला तिथे पोहोचले, त्यांना समर्थन द्यायला मोठा जमाव सुद्धा होता. ठरवलेल्या प्लॅननुसार शहा डोर-टू- डोर प्रचार करणार होते. पण २.४९ वाजता ते तिथून निघाले सुद्धा. म्हणजे फार- फार तर १७ मिनिटेच गृहमंत्री तिथे थांबू शकले. असं म्हणतात मोठ्या गर्दीमुळे त्यांचा प्रचार मध्येच थांबवण्यात आला आणि तिथून शहा थेट सहारनपूरला रवाना झाले. 

आता तसं पाहिलं तर अमित शहा हे पहिले गृहमंत्री आहेत, जे देवबंदच्या भागात येऊन प्रचार करून गेले. भलेही थोड्याच वेळ थांबल, पण आले हेच जास्त महत्वाचं… त्याचमागचं कारण सुद्धा तसंच आहे म्हणा इथं यायचं म्हंटल कि भल्या- भल्या नेत्यांना धास्ती बसते. कारण देवबंदला फतव्याचं शहर किंवा फतव्यांची फॅक्ट्री म्हंटल जात.

कारण म्हणजे देवबंदमधील दारुल उलूम, जी इस्लामिक मरकजची सर्वोच्च संस्था आहे. ज्यांचं ध्येय म्हणजे भारतातील मुस्लिम समुदायाला  इस्लामिक शिक्षण देणं. दारुल उलूम देवबंदचे इस्लामिक समुदायात एक विशेष स्थान आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण प्रदेशच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायावर आहे. ज्याची स्थापना मुहम्मद कासीम नानोत्वी यांनी १३ मे १९६६ साली केली.  पण सगळ्यांमध्ये या संस्थेबद्दल एकप्रकारची धास्ती आहे कारण इथले फतवे…. 

काही दिवसांपूर्वीच तीन तलाक प्रकरणी मुख्य याचिकाकर्ता फराह फैज म्हणाल्या होत्या कि, 

‘दारुल उलूम फतवा फॅक्टरी आहे, त्यांचे फतवे महिलांना त्रास देण्यासाठी आहेत आणि त्यांनी पुरुषांसाठी कधीही फतवा जारी केला जात नाही. कधी मुस्लिम महिलांच्या खाण्यापिण्यावरून आणि पोशाखाबाबत फतवे काढले जातात तर कधी त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या बाहेर काम करण्यावरून हे फतवे काढले जातात. महिलांच्या मार्गात काही ना काही अडथळे आणण्याच काम त्यांच्याकडून केलं जात.’

तसं पाहिलं तर दारुल उलूम फतव्यासाठी जगभर चर्चेत आहे. देवबंदने गेल्या १२ वर्षांत १ लाख फतवे काढले आहेत. २००५ मध्ये त्यांचा ऑनलाइन फतवा विभागा जारी केला होता. त्यानंतर परदेशी लोकांनीही दारुल उलूम मुफ्तींकडून ऑनलाइन चौकशी करायला सुरुवात केली. त्यांची वेबसाईट सुद्धा आहे ज्यावर उर्दूमध्ये ३५ हजार फतवे आणि इंग्रजीमध्ये ९ हजार फतवे अपलोड करण्यात आलेत. यातल्या काही फतव्यांवर नजर टाकायची झाली तर…

दारुल उलूम देवबंदने ट्रिपल तलाक आणि हलाला निकाहवर फतवा काढला होता. ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलेल्या फतव्यात म्हटले होते की, हलाला इस्लामिक नाही आणि जो कोणी असे करतो त्याला लाज वाटली पाहिजे. आता हलालाबद्दल सांगायचं झालं तर, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे घटस्फोटित स्त्रीला तिच्या पतीकडे परत यायचे असेल तर तिला आधी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावं लागलं.

मुस्लिम महिलांनी अज्ञात व्यक्तीकडून मेहंदी लावणं गैर-इस्लामी आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही लावणं सुद्धा गैर इस्लामी आहे. कारण सीसीटीव्हीत फोटो कैद होतात आणि इस्लाममध्ये गरज नसताना फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.

दारुल उलूमने काही वर्षांपूर्वी एक फतवा काढला होता कि, लाईफ इंश्युरन्स घेणं बेकायदेशीर आहे. कारण त्यातून मिळणारा नफा व्याजाच्या श्रेणीत येतो. दारुल उलूमने मुस्लिम महिलांना बाजारात जाऊन किंवा इतर कुठेही जाऊन  इतर पुरुषांच्या हातून बांगड्या घालण्यावर बंदी घातली होती. एवढंच नाही तर महिलांनी सोशल मीडियावर फोटो टाकणं सुद्धा गैर-इस्लामी आहे. 

तसेच २०१८ साली सौदी अरेबियाने जारी केलेल्या फतव्याचे दारुल उलूम देवबंदनेही समर्थन केले होते. यामध्ये महिलांनी पुरुषांचे फुटबॉल मॅच पाहणे हराम असल्याचे म्हटले होते. दारुल उलूम देवबंदचे मुफ्ती अतहर कासमी म्हणाले होते की, फुटबॉल शॉट्स घालून मॅच खेळली जाते, अशा परिस्थितीत महिलांची नजर खेळाडूंच्या गुडघ्यांकडे जाते, जे पाहणं गुन्हा आहे.

दारुल उलूमचा एक फतवा जास्तच चर्चेत होता. ज्यात म्हटले होते की, महिला जेव्हा घराबाहेर पडतात, तेव्हा सैतान तिच्याकडे टक लावून पाहतो. म्हणूनच स्त्री ही लपवायची गोष्ट आहे. त्यामुळे स्त्रीने गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. जर तुम्हाला घर सोडायचे असेल तर सैल कपडे घाला जेणेकरून शरीराचे अवयव लपतील. घट्ट आणि छोटा बुरखा आणि ड्रेस घालायला इस्लाम धर्मात परवानगी नाही.

आता देवबंदच्या दारुल उलूमचे असे बरेच फतवे आहेत, हे नेहमी चर्चेत असतात आणि त्यावरून मोठा वाद सुद्धा झालाय. आणि महत्वाचं म्हणजे या संस्थेचे सगळेच फतवे हे बहुतेक वेळा महिलांसाठीच असतात. त्यामुळेच या भागाला फतव्याचं शहर म्हणतील जात. 

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.