फक्त आनंद दिघेंच्या सांगण्यावरून बाळासाहेब त्या आदिवासी खेड्यात प्रचाराला आले.

नव्वदच्या दशकातील गोष्ट. राज्यात विधानसभा निवडणुका आल्या होत्या. जोरदार प्रचार सुरु होता. नेतेमंडळी पायाला भिंगरी लागल्या प्रमाणे राज्यभर फिरून प्रचारसभा रंगवत होते. काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप युती असा अटीतटीचा सामना रंगला होता.

युतीचे स्टार प्रचारक होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सेनेतर्फे एक हाती त्यांनी प्रचाराचा किल्ला लढवला होता. त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे शिवसेनेचा जोर वाढला होता. प्रचाराचा शेवटचा टप्पा जवळ आला होता. दौरा आटपून बाळासाहेब मुंबईला परत निघाले होते.

त्यांची एक सभा पालघर मतदार संघामध्ये होणार होती. आदिवासी खेड्यांचा हा दुर्गम भाग. ठरल्याप्रमाणे बाळासाहेबांचा ताफा पालघर जवळच्या नंडोरे गावात आला. तिथल्या साध्या भोळ्या शिवसैनिकांनी त्यांची घरे साधी असल्यामुळं बाळासाहेबांची थांबण्याची व्यवस्था एका काँग्रेस नेत्याच्या बंगल्यात केली होती.

बाळासाहेबांचा ताफा गावात आला तोवर संध्याकाळ उलटली होती. अनेक दिवस तो बंगला बंद पडलेला होता. बाळासाहेब तिथे पोहचले तेवढ्यात लाईट देखील गेली. सगळा किर्रर्र अंधार. विजेची पर्यायी सोय नाही, नळाला देखील पाणी नाही अशी ती अवस्था.

बाळासाहेबांनी विचारलं सभा किती वाजता सुरु होणार आहे? उत्तर आलं उद्या संध्याकाळी.

बाळासाहेबांना धक्काच बसला. ते नियमाला काटेकोर होते. त्यांच्या पुढच्या सभा ठरलेल्या होत्या. वेळेच्या बाबतीत गलथानपणा त्यांना सहन व्हायचा नाही. संतापलेल्या स्वरात त्यांनी आनंद दिघेंना बोलावण्याचा आदेश दिला.

धर्मवीर आनंद दिघे यांना ठाण्यात बाळासाहेबांचा छावा म्हणून ओळखलं जायचं. शिवसेनेच्या कडवट हिंदुत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. ते आक्रमक होते. जनतेच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवताना बघतो, नंतर पाहू अशी राजकीय नेत्यांची ठरलेली भाषा त्यांच्या तोंडी कधीच दिसायची नाही. आपल्या माणसांच्या साठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची तयारी असायची.

त्या दिवशी मात्र बाळासाहेब दिघेंवर प्रचंड संतापले होते. त्यांना समोर पाहताच ते म्हणाले,

 “काय रे! मला कुठे आणून ठेवले आहेस? मला काय हवे, काय नको, हे तुला माहीत नाही का?” 

सभा उद्या असताना आजच या खेड्यात उगीचच चोवीस तास अगोदर आणले याबद्दल बाळासाहेबांनी आनंद दिघे ऐन सुधीर जोशी यांची खरडपट्टी काढली.कोणालाच कळेना कि आता नेमकं करायचं काय ? संतापलेल्या स्वरात बाळासाहेबांनी आपल्या सहाय्यकाला थापाला सामान भरायला सांगितलं,

“आता या क्षणाला मुंबईला निघायचं आहे.”

आनंद दिघे यांना घाम फुटला. एवढी सभेची तयारी केली होती. बाळासाहेब रागावले की कोणालाच ऐकत नाहीत याचा त्यांना अनुभव होता. तरी सुधीर जोशी यांच्याकडे जाऊन त्यांना समजावून सांगायची विनंती दिघेंनी केली.

“आनंद, मी काही बोलणी खाणार नाही. तू असे केलेच का? आता तुझे तू बघ. त्यांना कोणी आता थांबवू शकणार नाही?”

अखेर आनंद दिघेंनी स्वतःच तोफेच्या तोंडी जायचं ठरवलं. सामान बांधाबांधी सुरु होत आणि बाळासाहेब शांतपणे एका खुर्चीत बसले होते. दिघे नम्रपणे पण ठामपणे त्यांना म्हणाले,

“साहेब हवं तर उद्याच मला शिवसेनेतून काढून टाका, पण तुम्ही जाऊ नका! ही सभा व्हायलाच हवी! एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. साहेब! तुम्ही थांबलेच पाहिजे.”

बाळासाहेबांनी एकवार  अगतिक झालेल्या त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि अचानक शांत होत म्हणाले,

“ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबावेच लागेल!”

आनंद दिघेंच्या त्या धडपडीमागची तळमळ बाळासाहेबांच्या लक्षात आली होती. पुढच्या सभा रद्द करायला लागल्या तरी चालेल पण हि सभा झालीच पाहिजे असं म्हणत ते त्या दिवशी पालघर मध्ये चोवीस तास थांबले.

दुसऱ्या दिवशी तुफान गर्दीत त्यांची जोरदार सभा झाली. आनंद दिघे भरून पावले. बाळासाहेबांच्या भाषणातील त्या ऊर्जेमुळे पेटलेल्या शिवसैनिकांनी सेनेच्या पालघर मधल्या उमेदवार मनीषा निमकर यांना भरघोस मतांनी निवडून आणलं.

बाळासाहेब प्रत्येक क्षणी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करणारे नेते होते, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील त्यांचं पुत्रवत प्रेम होतं हे हे एका साध्या प्रसंगावरून लक्षात येत.

संदर्भ- प्रकाश पाटील दैनिक सकाळ 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.