बँकेचा साधा कॅशियर ६ वेळा निवडणूक जिंकू शकतो हे विष्णू सावरांनी दाखवून दिलं होतं

२०१४ ची विधानसभा निवडणूक जाहिर झाली होती. भाजप – शिवसेनेची युती तुटल्यामुळे निवडणूक कडवी होणार हे जगजाहिर होत. फक्त सगळ्यात अटीतटीची सामना कोणत्या मतदारसंघात होणार हे बघावं लागणार होतं. त्यातही दोन्ही पक्षांच समान प्राबल्य असणारे काहीच मतदारसंघ होते.

अशाच मतदारसंघांपैकी एक होता, पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ.

तसा हा मतदारसंघ भाजपकडेच होता. कै. खा. चिंतामणराव वनगा २००९ ला इथून आमदार होते. पण २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेल्याने इथे भाजपला दुसरा उमेदवार द्यावा लागणार होता.

अशा वेळी भाजपने अनुभवी आणि आदिवासी भागात अनेक वर्षापासून ओळखीचा चेहरा असलेल्या विष्णू सावरा यांना इथून मैदानात उतरवले. विरोधात होते शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे नेते प्रकाश निकम.

या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची असण्याचं मुख्य कारण म्हणजे विष्णू सावरा अनुभवी असले तरी विक्रमगड हा मतदारसंघ त्यांना पुर्णपणे नवीन होता. उमेदवार म्हणून इथे नवखे होते. त्यांचा पारंपारिक मतदारसंघ हा वाडा / भिवंडी ग्रामीण हा होता.

पण २०१४ मध्ये ठाण्याचे विभाजन होवून नवीन पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला आणि त्यांना विक्रमगडची उमेदवारी दिली.

तर सेनेच्या प्रकाश निकम यांच स्थानिक नेते म्हणून पारडं जड होतं. लढत मुख्यत्वे भाजप – शिवसेनेमध्येच होती. प्रचार चालू झाला. वारं पुर्ण शिवसेनेच्या बाजूने होते. मतदान झाले, निकाल लागला.

विष्णू सावरा ३ हजार ८४५ मतांनी विजयी.

सावरांनी पुन्हा मैदान मारलं होतं. राजकीय अनुभवावर युती नसतांनाही वेगवेगळे लढत आपल्या व भाजपच्या विजयाची परंपरा तेथेही कायम ठेवली. आणि सलग सहाव्यांदा विधानसभेत एन्ट्री केली.

विधानसभेला सावरा हे सुंदर हस्ताक्षर असलेले, गोड गळ्याचे व भजनांची आवड असलेले आमदार म्हणून परिचीत होते. आमदार झाल्यानंतर देखील वाडा तालुक्यातील डोंगरी भागातील गालतारा गावात ते अद्याप पर्यंत वडिलोपार्जित शेती कसत होते.

त्यांचा जन्म १९५० मधला. गालातारामध्ये शिक्षणाची सोय नसल्याने आपल्या गावापासून दूरवर असलेल्या गोऱ्हा वाडा येथील शाळेत पायी चालत जाऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरावी ते बी.कॉम.पर्यंत भिवंडी येथील स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब जाधव शिक्षण संस्थेत पूर्ण केले.

पदवीच शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.

१९७३ साली पदवीधर झाल्यावर त्यांनी डहाणू तालुक्यातील दापचरी येथे शेतकरी व आदिवासींच्या विकासासाठी निर्माण केलेल्या राज्य सरकारच्या दुग्ध व्यवसाय प्रकल्पात कॅशियरची नोकरी पकडली. तिथे जवळपास ३ वर्ष काम केले.

बी. कॉम झालेले, त्याकाळी पदवी म्हणजे अतिउच्च शिक्षण होते. त्यामुळे त्यांनी बँकिंग स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. परिक्षा दिल्या आणि पास होवून स्टेट बँकेत कॅशिअर म्हणून निवड झाली. १९७६ मध्ये बोईसर शाखेत रुजू झाले.

मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अखेरीस १९८० मध्ये उच्च पदाची आणि प्रतिष्ठेची सरकारी नोकरी सोडत त्यांनी अनिश्चिततेच्या राजकारणात उडी घेतली.

सुरुवातीला ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य झाले.

त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणूकीत वाडा मतदारसंघातुन तिकीट मिळवले. मात्र १९८० ते १९९० या दहा वर्षांच्या काळात या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे शंकर गोवारी हे या मतदारसंघाचे आमदार होते. त्या तुलनेत भाजप नवीन होता. त्यामुळे सलग दोन्ही निवडणूकीत सावरांचा पराभव झाला.

खचून न जाता समाजाचे काम चालू ठेवले. सावरांनी आदिवासी भागात पक्षाला रुजवण्याचे काम चालू ठेवले.

त्यानंतर १९९० च्या विधानसभा निवडणुकीत सावरांनी काँग्रेसच्या लक्ष्मण दुमाडा यांचा १२ हजार ५२८ मतांनी पराभव करून हा मतदार संघ भाजपकडे खेचून घेतला. १९९० च्या निवडणुकी विष्णू सावरा यांना ४८ हजार मते मिळाली होती तर काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा यांना 35 हजार मते मिळाली होती.

१९९५ च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली. त्यातील सगळ्यात महत्वाचा आणि दुरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणजे राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला.

विक्रमगड तालुक्याची निर्मिती, वाडा येथील २२० के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय काॅलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली.

२००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाडा मतदारसंघ जावून भिवंडी ग्रामीण म्हणून हा मतदारसंघ अस्तित्वात आला. थोडीफार राजकीय समिकरण बदलली. पण सावरांनी पुन्हा मैदान मारलेच. काँग्रेसकडून खेचून घेतलेला हा मतदार संघ तब्बल २५ वर्ष भाजपकडेच होता. सलग पाच वेळा ते इथून आमदार होते.

विशेष म्हणजे २०१४ ला सावरांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर इथे भाजपचा पराभव झाला. त्यावरुन कळते की सावरांनी हा मतदारसंघ वैयक्तिक सहसंबंधातुन बांधला होता.

२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले. ते विक्रमगडमधून आमदार होते. त्यांना पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही मान त्यांना मिळाला.

मंत्री झाल्यावर लगेचच त्यांनी थांबलेली विकास काम पुन्हा हातात घेतली. पालघरमध्ये १३ कोटींच्या रस्ते बांधणीच भुमिपूजन करुन बांधणीला सुरुवात देखील झाली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी जव्हार, विक्रमगड, वाडा, पालघर या चार तालुक्यांत २० कोटी रुपये खर्चाची विकास कामांची सुरुवात झाली.

जनतेच्या प्रश्नांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असत. शेतकऱ्यांचा कर्ज मुक्तीचा लढा, दुष्काळाचा प्रसंग, कुपोषणाचा प्रश्न अतिवृष्टी सारखे संकट, जिल्हा विभाजनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे एक प्रतिनीधी म्हणून पालघरच्या जनतेच्या कायम आठवणीत राहतील.

फडणवीसांच्या मंत्रीमंडळात अखेरच्या टप्प्यातच त्यांना यकृताचा त्रास चालू झाला. परिणामी ते मंत्रीमंडळातुन बाहेर पडले. २०१९ च्या निवडणूकीपासून देखील ते लांब होते. अखेरीस काल रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.