जबडा तुटलेला असूनही १४ ओव्हर टाकण्याची जिद्द एकट्या अनिल कुंबळेमध्येच होती…

साल २००२, भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. तेव्हाची विंडीज टीम म्हणजे अगदीच खतरनाक विषय. ब्रायन लारा, कॅप्टन कार्ल हुपर, शिवनरायण चंद्रपॉल, ख्रिस गेल अशी तगडी बॅटिंग विंडीजकडे होती. फास्ट बॉलिंगही खतरनाक होतीच, पण खरी ताकद बॅटिंगमध्येच होती.

पाच मॅचची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली, दोन्ही ताकदवान टीम भिडल्या. सिरीज विंडीजनं २-१ अशा फरकानं जिंकली. पण सगळ्या जगाच्या लक्षात राहिली ती या सिरीजमधली चौथी टेस्ट मॅच आणि अनिल कुंबळे.

अनिल कुंबळे, उंचापुरा आणि तगडा लेग स्पिनर. गड्यानं इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. पण तिथल्या गणितापेक्षा जास्त रस त्याला बॅट्समनला गणितं घालण्यात होता. कुंबळेनं स्पिनवर जितक्या बॅट्समनला गंडवल असेल, तितक्याच किंवा एखादा टक्का जास्त स्पीडवर.

शेठ होते स्पिनर पण त्याचा बॉल इतक्या जोरात यायचा की कुठं वळेल याचा विचार करायच्या आधीच बॅट्समनचा बल्ल्या झालेला असायचा.

भारतीय क्रिकेटला आधीपासूनच भारी स्पिनर्सची देण मिळालीये. त्यात आपल्याकडच्या पिचवर बॉल सहज हातहातभर वळतात. पण विषय असा असतो की, अशाच पिचवर टप्पा ठेवणं आणि राखणं अवघड काम असतं. कुंबळेला तेच परफेक्ट जमायचं, म्हणून तर तो हिट झाला.

कर्नाटककडून रणजी ट्रॉफी पदार्पण केल्यानंतर कुंबळेनं डोमेस्टिक क्रिकेट गाजवलं आणि त्याची भारताच्या अंडर-१९ टीममध्ये वर्णी लागली. बॉलर म्हणून नावारुपाला आलेल्या कुंबळेनं ११३ आणि ७६ रन्स मारुन बॅटिंगमध्ये जलवा दाखवला होता. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली आणि कुंबळेनं आधी वनडे आणि मग टेस्ट टीममध्ये आपली जागा पक्की केली.

कुंबळेचं नाव खऱ्या अर्थानं गाजलं ते १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये.

भारतीय उपखंडात झालेल्या या स्पर्धेत कुंबळेनं सर्वाधिक १५ विकेट्स घेतल्या. भारताला सेमीफायनलपर्यंत नेण्यात त्याचाही महत्त्वाचा वाटा होता. पण फक्त भारतातच नाही, तर फॉरेनच्या पिचेसवरही कुंबळे यशस्वी होत होता. त्यामुळं साहजिकच कुठल्याही मैदानात मॅच असली, तरी इंडियन टीमच्या बॉलिंग डिपार्टमेंटचं ट्रम्प कार्ड असायचा अनिल कुंबळे.

दिल्लीचं फिरोजशहा कोटला स्टेडियम तर कुंबळेनं अक्षरश: गाजवलं होतं. समोर पाकिस्तानची टीम, खतरनाक प्रेशरवाली मॅच. पण कुंबळेनं पाकिस्तानच्या दहाच्या दहा विकेट्स घेतल्या. एकाच इनिंगमध्ये दहाही विकेट्स काढणारा तो जगातला दुसरा आणि भारतातला पहिला बॉलर बनला.

कुंबळेनं केलेलं प्रत्येक रेकॉर्ड इथं सांगायचं म्हणलं तर लिस्ट लय मोठी आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्यानं भारताला किती मॅचेस जिंकून दिल्या आहेत, याचीही लिस्ट चांगलीच लांबलचक आहे. त्यामुळं सगळं लिहिण्यात मजा नाही.

कुंबळेला वयाचं ३७ वं वर्ष ओलांडल्यानंतर भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यातही त्यानं टीमला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.

असं सांगितलं जायचं की, कुंबळेच्या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिस्त. हीच शिस्त पुढं कुंबळे कोच झाला तेव्हाही त्यानं टीममध्ये भिनवायचा प्रयत्न केला. पण तोवर जमाना बदललेला, कुंबळेची ही शिस्त काही नव्या पोरांना रुचली नाही, बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले आणि परिणाम म्हणून कुंबळेची हेड कोच म्हणून उचलबांगडी करण्यात आली.

या सगळ्या राड्यात अनेकांनी कुंबळेची मापं काढली, त्याच्या कोचिंगमध्ये भारताच्या टीमनं टेस्ट रॅकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलेलं हे तर कित्येक जण विसरुन गेलेच, पण कुंबळेनं भारतीय टीमला नेमकं काय शिकवलं हे सुद्धा.

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणं कुंबळेनं २००२ ची अँटिग्वा टेस्ट गाजवली होती. खरंतर या मॅचमध्ये कुंबळेनं खेळावं की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

त्याचं झालं असं की, भारताची पहिली बॅटिंग आली. सचिन पहिल्याच बॉलवर शून्यावर गेला, पण वसीम जाफरनं ८६ आणि द्रविडनं ९१ रन्स चोपले. लक्ष्मणनंही १०० लावला. पण या सगळ्यात बॅटिंग करत असताना बॉल कुंबळेच्या जबड्यावर लागला. मर्व्हन डिल्लनचा हा बाउन्सर इतक्या जोरात लागलेला की काही मिनिटं कुंबळेच्या तोंडातून फक्त रक्त येत होतं. आधी त्याला वाटलं की आपला दात गेला असेल, पण दात सगळे जागेवरच होते.

हॉस्पिटलमध्ये नेऊन कुंबळेचे एक्स रे काढण्यात आले, तेव्हा समजलं की त्याच्या हनुवटीला फ्रॅक्चर झालंय आणि यावर दोनच उपाय आहेत ते म्हणजे ऑपरेशन आणि विश्रांती. दुखापत इतकी गंभीर होती की, कुंबळेच्या करिअरवरच प्रश्नचिन्ह उभं राहत होतं. त्याच्या ऑपरेशनचं नियोजनही बीसीसीआयकडून करण्यात आलं.

पण मॅच अजून संपलेली नव्हती, कुंबळे डोक्याला बँडेज गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये बसला होता. मैदानात वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरु होती. होम ग्राउंड असल्यानं त्यांच्यासाठी गोष्टी नव्या नव्हत्या. झहीर खान नेटानं मारा करत होता आणि त्याला साथ द्यायला गांगुलीनं पर्याय निवडला सचिन तेंडूलकरचा. तेंडुलकरचा बॉल चांगला वळत होता. त्यानं हिंड्सची विकेटही काढली. साहजिकच कुंबळेला एक गोष्ट कळून चुकली की, हे पीच फिरकीला साथ देतंय.

त्यानं कॅप्टन गांगुलीकडं आग्रह केला की मला बॉलिंग करायची आहे. गांगुली आधी नाही म्हणला, पण नंतर त्यानंही होकार दिला. डोक्याला बँडेज गुंडाळलेला कुंबळे बॉलिंगला आला.

समोर बॅटिंगला होता, द ब्रायन लारा.

आधीच बॅटिंग पिच त्यात लारा सेट झाला असता, तर भारतीय टीमला सुट्टी नव्हती. त्यामुळं भीती तर होतीच. कुंबळेनी एक खतरनाक स्पेल टाकला, त्यात समोर ब्रायन लारा. कुंबळेकडून प्रत्येक भारतीय चाहत्याला या एका विकेटची अपेक्षा होती आणि त्यानं ती पूर्णही केली.

ब्रायन लारा एलबीडब्ल्यू झाला.

कुंबळेनं या विकेटचं क्रेडिटही आपल्या बँडेजला दिलं होतं. त्याचं म्हणणं होतं की, ‘ब्रायन लारा कंटिन्यू माझ्या बँडेजकडे बघत होता. त्यामुळं त्याचं लक्ष विचलित झालं आणि मी पायावर टाकलेला बॉल त्याला काही झेपला नाही. त्याला याचं दडपण आलेलं की मी बँडेज लागलेल्या अवस्थेतही बॉलिंग कशी काय करतोय ?’

काहीही असलं तरी त्यादिवशी कुंबळेनं भारतासाठीची सगळ्यात मेन विकेट काढली. कुंबळेनं त्या इनिंगमध्ये १४ ओव्हर्सचा स्पेल टाकला. 

त्यानं जशी बॉलिंग थांबवली, तसा विकेट्सचा ओघ आटला. कॅप्टन गांगुलीनं थोडे नाही, तर सगळेच्या सगळे ११ प्लेअर्स बॉलर म्हणून वापरले. पार विकेटकिपर असणाऱ्या अजय रात्रानंही एक ओव्हर टाकली, पण विंडीजचा ऑलआऊट काही काढता आला नाही.

मॅच ड्रॉ झाली आणि अनिल कुंबळेचं भारतीय क्रिकेटमधलं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यादिवशी कुंबळेचा जबडा हलत होता, पण आत्मविश्वास नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.