बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान असलेला नाशिकमधला ‘अंजनेरी किल्ला’ !!

मध्यंतरी आपल्या देशात हनुमानाच्या जन्मस्थळावरुन वाद झाला होता, हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केला. तर कर्नाटकचं म्हणणं होतं की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री इथं झाला.

पण महाराष्ट्रात अशी मान्यता आहे की, नाशिकच्या अंजनेरीत हनुमानाचा जन्म झाला. याठिकाणी हनुमानाचे मंदिर आहे. तिथे असलेल्या अंजनेरी गडाबद्दल जाणून घेऊयात.    

एक धार्मिक शहर असण्यासोबतच नाशिक हा महाराष्ट्रातील सर्वाधिक गड-किल्ले असलेला जिल्हा आहे. लहान मोठ्या ऐतिहासिक किल्ल्यांपासून ते महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला साल्हेर किल्ला याच जिल्ह्यात आहे. सह्याद्री पासून वेगळ्या झालेल्या सातमाळा, त्र्यंबकेश्वर, सेलबारी, डोलबारी इत्यादी उपडोंगर रांगा नाशिकातुनच.

याच डोंगर रांगेत अंजनेरी किल्ला वसला आहे.

नाशिकमधून पोटभर मिसळ खाऊन त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडावी. साधारण तासाभराचा प्रवास केला की स्त्याकडेलाच लागलेले “हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी” असे मोठे बोर्ड नजरेस पडते.

तो अंजनेरी फाटा.

त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या एसटी वर इतर गाड्या इथे थांबतात. तिथून डावीकडे अंजनेरी गावात जाण्याचा रस्ता लागतो.  तर गावात प्रवेश करताच नाणे संशोधन केंद्र लागते. समोरच अंजनेरीचा डोंगर नजरेस पडतो. त्याची भव्यता पाहून छाती दडपायला होते. तिथे बसलेल्या आजोबाना विचारलं की गडावर पायी जायला किती वेळ लागतो तर खुमासडर उत्तर मिळत,

“तुम्ही २ तासात पोहचाल, आम्हाला तर ४ तास लागतील.”

अंजनेरी गड हा हनुमानाचे जन्मस्थान असल्याच्या कथा प्रचलित आहेत. गडावर अंजनी मातेचे मंदिर आहे. लोक श्रद्धेने गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. बाल हनुमानाने केलेल्या अनेक बाल करामती तसेच सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका आहे.

गडावर एक तळे आहे, ते हनुमानाच्या पायाच्या ठशामुळे तयार झाले असल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. या गडाला एक धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. अंजनी मातेच्या नावावरूनच गडाला आणि गावाला अंजनेरी हे नाव पडले आहे. शहरातून गावात आल्यावर गडावर जाताना वाटेत लागणारी टुमदार घरे बघून भारी वाटत.

अंजनेरी गडाच्या पायथ्याला सुबक कलाकृती असलेली जुनी प्राचीन मंदिरे आहेत. जवळपास ती १६ मंदिरे असून त्यातली १२ जैन तर ४ हिंदू मंदिरे आहेत. मंदिरे बघून आपल्याला अंदाज येतो की, गड आणि त्याच्या आसपासचा परिसर किती प्राचीन आहे. जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू यांच्या जैन मंदिराची व्यवस्था नीट चालावी म्हणून अंजनेरी येथील वत्सराज, लाई, दशरथ या व्यापाऱ्यांनी तीन दुकाने, काही घरे दान दिल्याचे उल्लेख मिळतात. अजूनही हा भाग बाजारपेठ गल्ली म्हणून ओळखला जातो.

याच काळात अंजनेरी परिसरात लेणी बहरली. परिसरात लहान मोठ्या १०१ लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या लेणींमधील शिलालेखांकडेही दुर्लक्ष झाले आहे. या लेणींचा पुरेसा अभ्यासही झालेला नसल्याने इतिहासाचे अनेक पैलू अजूनही दडलेलेच आहेत.

गडावर पोहचलो असे वाटत असतानाच समोर आणखी एक चढाईचा भाग दिसतो. तो म्हणजे बालेकिल्ला. वर मध्यभागी खालच्याप्रमाणेच अंजनीमातेचे मंदिर. इथली मूर्ती मात्र पाहण्यासारखी. अंजनीमातेच्या मांडीवर बालहनुमान बसला आहे. हनुमानाचे हे असे रूप अजून कुठे बघायला मिळेल असे वाटत नाही. कदाचित हनुमाचे जन्मस्थान म्हटले जात असल्याने अशा मूर्तीची रचना केली असावी.

पठारावर अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पतींचे संवर्धन केले. या सर्वोच्च माथ्यावरून फिरू लागलो, की दूरदूरवरचा प्रदेश नजरेत येतो. आगे्नयेस रांजणगिरी, भंडारदुर्ग, हरिहर, घरगड किंवा गडगडा दुर्ग, पश्चिमेला बलंदड ब्रह्मगिरीचा त्र्यंबकगड, त्याच्या पुढ्यात वसलेले तीर्थक्षेत्राचे त्र्यंबकेशवर गाव, उत्तरेला गोदावरीचे रम्य खोरे, पूर्वेला तळात छोटेसे टुमदार अंजनेरी गाव बघून स्वर्गसुखाचा अनुभव मिळतो, एवढं नक्क्की.   

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.