१९९६च्या वर्ल्डकपचा खरा हिरो गोल गुबगुबीत अर्जुन रणतुंगा होता.

१९८३ला क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर कपिल देवने वर्ल्ड कप उचलला. हा विजय फक्त भारतिय टीमच नाही तर संपूर्ण क्रिकेटसाठी क्रांतिकारी ठरला होता. तो पर्यंत सगळ्यांना वाटायचं वर्ल्ड कप फक्त वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्या सारखी बलाढ्य टीमच जिंकू शकते. पण भारताच्या विजयामुळे हा गैरसमज मोडीत काढला गेला.

श्रीलंकेचा एक वीस वर्षाचा खेळाडू इंग्लंडमध्ये टीव्हीवर ही मॅच बघत होता. भारताने वर्ल्डकप जिंकलेल सेलिब्रेशन त्यान डोळ्यांनी पाहिलं होत. त्याच्याही मनात विचार चमकला आपण ही कपिल देव प्रमाणे आपल्या देशाला वर्ल्ड कप मिळवून द्यायचा.

जर त्याने कोणाला हा विचार सांगितला असता तर त्याला नक्कीच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं असत. एकवेळ भारत ठीक आहे पण श्रीलंका कसं काय वर्ल्ड कप जिंकणार??

त्या दिवास्वप्न पाहणाऱ्या खेळाडूचं नाव अर्जुन रणतुंगा.

arjuna 650 020615124944

श्रीलंका हे भारताच्या दक्षिणेकडच एक छोटसं बेट. कायम राजकीय अशांतता, गृहकलह, दहशतवाद या समस्यांनी ग्रासलेलं. इंग्रजांनी आणलेल्या क्रिकेट या खेळाने पूर्ण भारतीय उपखंडाला वेड लावलं होत. श्रीलंका त्याला अपवाद नव्हती. या बेटावर क्रिकेट इर्ष्येवर खेळली जायची.

भारत पाकिस्तान सारख्या टीम फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला या आपल्या छोट्या भावाकडे यायच्या पण कसोटी खेळाची मान्यता मिळायला त्यांना १९८१ हे साल उजाडले. त्यापूर्वी मात्र पहिल्या वर्ल्डकप पासून वनडे सामने ते खेळत होते.

१९८८ साली अर्जुन रणतुंगा श्रीलंकेचा कप्तान बनला. पहिल्यापासून त्याला एकच ध्यास होता, लंकेला वर्ल्ड कप मिळवून देणे. १९९२ साली ऑस्ट्रेलिया मध्ये इम्रान खान ने पाकिस्तानला वर्ल्डकप मिळवून दिला तेव्हा रणतुंगाचा ध्यास वेडात रुपांतरीत झाला. दिवस रात्र तो १९९६च्या वर्ल्डकपची तयारी करत होता. त्याच्या मदतीला आला लंकेचा पहिला कोच डेव्ह व्होटमोर.

डेव्ह व्होटमोर आणि रणतुंगाने बऱ्याच रणनीती बनवल्या ज्या तेव्हा क्रिकेट मध्ये नवीन होत्या.

यातच सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी होती ओपनिंग पार्टनरशिप. वनडे क्रिकेटच्या नियमानुसार पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये फक्त दोनच खेळाडू वर्तुळाच्या बाहेर फिल्डिंगला उभे असतात या रेस्ट्रीक्शणमुळे तेव्हा उंच फटके मारायची संधी असते.

पूर्वी भारताचा के श्रीकांत हा ओपनर सुरवातीपासून फटकेबाजी करायचा पण त्यामागे कोणती स्ट्रॅटेजी नव्हती. पण त्याची बॅटिंग बघून रणतुंगाच्या डोक्यात या रणनीतीने आकार घेतला.

सनथ जयसूर्या आणि रोमेश कालूवितरणा या लंकन ओपनर्सना पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये १०० धावा काढण्याचे टार्गेट दिलेले होते. त्यासाठी उभे आडवे कसेही फटके मारा पण १०० धावा काढा असे त्यांना सांगितलेलं असायचं.

१९९६चा वर्ल्डकप भारत पाकिस्तान श्रीलंका मध्ये होणार होता. घरच्या कंडीशनचा योग्य फायदा उठवत जयसूर्या आणि कालूवितरणाने  पॉवरप्ले मध्ये खरा पॉवरप्ले सुरु केला.

भल्या भल्या दिग्गज फास्टर बॉलरना कळेना झालेलं की या दोघांना कसं आवरायचं.

जयसूर्याने तर एकदा मनोज प्रभाकरच्या ४ ओव्हर मध्ये ४७ धावा कुटल्या. त्या इनिंगने प्रभाकरचं क्रिकेट करीयर संपवून टाकलं. कधी जयसूर्या आणि कालूवितरणा लवकर आउट झाले तर मागून येणारा अरविंदा डिसिल्व्हा आपल्या स्टाईलिश बॅटीन्गने इनिंग सांभाळायचा.

फक्त बॅटिंग नाही तर बॉलिंगमध्येही जयसूर्याने हवा केली होती. मुथ्थया मुरलीधरन , चामिंडा वास आणि जयसूर्या यांच्या बॉलिंगने विरोधी फलंदाजान खूप जेरीस आणलं होतं.

कोणालाही अपेक्षा नसलेली श्रीलंका सेमी फायनलला जाऊन पोहचला. याच श्रेय मुरलीधरन, जयसूर्या यासारख्या खेळाडूना होतेच पण सगळ्यात जास्त क्रेडीट रणतुंगाचं होतं. त्याने गेली अनेक वर्षे टीम बांधली होती. मुरलीला टीम मध्ये खेळवायचं म्हणून टीम मॅनेजमेंटशी भांडण काढलं.

आपल्या खेळाडूंवर त्याचा असलेल्या विश्वासामुळेच खेळाडूही त्याच्या साठी जीव लावून मैदानात उतरत होते.

इडन गार्डनमध्ये झालेल्या सेमीफायनल मध्ये लंकेची सुरवात काही खास झाली नाही. जयसूर्या आणि कालूवितरणाला श्रीनाथने ० आणि १वर आउट काढलं. पण डिसिल्व्हाने इनिंग सांभाळली त्याच्या जीवावर भारतापुढे २५२ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. ते काही भारताला झेपल नाही.

सचिन सोडून इतर सगळे लंके पुढे ठेपाळले. १२० वर ८ आउट अशी अवस्था भारताची झाली. कलकत्त्याच्या राउडी पब्लिकने सामना बंद पाडला. लंकेला विजयी घोषित करण्यात आलं. आजही विनोद कांबळी मैदानातून रडत बाहेर आलंय हे चित्र कोणीही इंडियन फॅन विसरू शकणार नाही.

फायनल मध्ये श्रीलंकेची गाठ ऑस्ट्रेलियाशी होती.

रणतुंगाने ऑस्ट्रेलियाच्या आधीच स्लेजिंगचं वॉर सुरु केलं. शेन वॉर्न हा ओव्हररेटेड बॉलर आहे असं सांगून त्याने डायरेक्ट वॉर्नशी पंगा घेतला. जखमी वाघाप्रमाणे ऑस्ट्रेलिया फायनल साठी उतरली पण रणतुंगाची टीम सापळा रचून तयार होती.

ऑस्ट्रेलियाने लंकेपुढे २४२ धावांचं टार्गेट ठेवलं. याही सामन्यात जयसूर्या आणि कालूवितरणा फेल गेले पण भरवश्याचा डिसिल्व्हा फेल गेला नाही. त्याने गुरुसिम्हाला सोबत घेऊन जबरदस्त पार्टनर्शीप केली. पण जेव्हा गुरुसिम्हा आउट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला वाटल मॅच आपल्या हातात आली. पण झालं उलटचं.

कधी नव्हे ते रणतुंगा ५व्या नंबर ला खेळायला आला. त्यालाही एक कारण होत..

तेव्हा शेन वॉर्न बॉलिंग टाकत होता. आल्या आल्या रणतुंगाने शेनवॉर्नला स्ट्रेटला डोक्यावरून जोरदार बाउन्ड्री मारली. गोल गुबगुबित रणतुंगाला आपण सहज खिशात टाकू या भ्रमात असणाऱ्या वॉर्नसाठी हा धक्काचं होता. या धक्क्यातून तो सावरला नाही. रणतुंगाने त्याची भयानक धुलाई केली.

s9ua88vdnyly

डिसिल्वाचे शतक आणि रणतुंगाची पाहुण्या कलाकारासारखी झंझावती खेळी यामुळे श्रीलंकेने ती फायनल जिंकली आणि वर्ल्ड कप वर आपले नाव कोरले. डिसिल्वा मॅन ऑफ दी मॅच आणि ऑल राउंडर जयसूर्या मॅन ऑफ दी सिरीज ठरला. पण या वर्ल्ड कपचा खरा हिरो अर्जुन रणतुंगाचं होता.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.