भारत स्वतंत्र होण्यापूर्वी दहा वर्षे एका मराठी संस्थानात लोकशाही सुरू झाली होती.

भारतात गेली हजारो वर्षे राजेशाही चालत आली होती. राजा हाच प्रजेचा मायबाप असायचा. राज्यकर्त्यांनी घेतलेले बरे वाईट निर्णय प्रजेला भोगावे लागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दूरदृष्टी असलेले राजे अपवादानेच सत्तेत आले.

इराण, इराक, अफगाणिस्तान पासून ते पोर्तुगीज इंग्रजांपर्यंत परकीय राज्यकर्त्यांची सत्ता भारताने पाहिली.

लोकशाही ही संकल्पना भारतात कधी काळी होऊन गेली असली तरी आपण वाचतो त्या इतिहासात लोकांनी स्वतःचे राज्य चालवणे हे कधी अनुभवलंच नव्हतं. इंग्रज आल्यानंतर आधुनिक जगाशी आपली ओळख झाली. त्यांच्याशी लढताना स्वातंत्र्याची जाणीव झाली.

अनेक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांनी रक्त सांडलं, कारावास सहन केला. प्रत्यक्ष स्वातंत्र्य उजाडायला १९४७ साल उजाडलं.

पण या सगळ्याच्या आधी १० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका छोट्याशा संस्थानात लोकशाही जन्मली देखील होती.

ते संस्थान म्हणजे सातारा जिल्ह्यातील औंध आणि तिथला राजा म्हणजे भवानराव पंतप्रतिनिधी.

औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. छ.राजाराम महाराजांच्या काळापासून या घराण्याने तलवार गाजवली होती. सातारच्या शाहू महाराजांची पंतप्रतिनिधीवर विशेष मर्जी होती. याच घराण्यातले अनेक संस्थानिक कर्तबगार निघाले.

राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे औंधचा राजा बाळासाहेब भवानराव पंतप्रतिनिधी . औंधसारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी  घेतली होती, इतका हा मोठा माणूस.

त्यांनी आपल्या प्रजेला आपलं कुटुंब समजलं.

शाळा-वसतीगृह काढली आणि तिथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. किर्लोस्करवाडी, ओगले काच कारखाना असे उद्योग त्यांच्यामुळेच तर उभे राहिले. पुरोगामी विचारांचा वारसा चालवला, अस्पृश्यता बंद केली. सूर्यनमस्कार बलोपासना याला उत्तेजन दिलं. संगीत, नाटक, चित्रकला याला राजाश्रय दिला.

त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यात लोकशाही लागू केली.

औंध संस्थानचे अधिपती भवानराव हे उच्च शिक्षित होते. त्यांनी पुणे येथे बी. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. या काळात पुण्यात सुरू असलेल्या टिळक, आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले यांचे वैचारीक चळवळीचा त्यांच्या तरुण मनावर प्रचंड प्रभाव पडला होता. ते भारावुन गेले होते.

पुढे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला गेल्यावर आधुनिक जगाशी खऱ्या अर्थाने त्यांची ओळख झाली.

१९०९ साली ते औंध संस्थानच्या गादीवर आले.

बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. ग्रामोद्योग, साक्षरता या गोष्टींवर त्यांचा विशेष भर होता.

१९३६ साली औंधचा राजा युरोप दौऱ्यावर गेला होता. तिथे त्याने लोकशाही अनुभवली. भारतात सुरू असलेला स्वातंत्र्यलढा इंग्रजांच्या जुलुमी राजवटीविरोधात जनतेत असणारा राग यामुळे येत्या भविष्यात भारतातही लोकशाही येणार हे औंधच्या दृष्ट्या राजाला जाणवलं होतं.

आणि या बदलला सामोरे जाण्यासाठी आपली जनता तयार असली पाहिजे हे त्यांनी डोक्यात घेतलं.

यातूनच सुरू झाला औंध संस्थानचा प्रजासत्ताक होण्याकडे प्रवास.

खरं तर १९१६ सालीच भगवानरावांनी औंध मध्ये ग्रामपंचायतीचा कायदा मंजूर केला होता. पहिली रयत सभा १९१७ साली औंध मध्ये भरली. १९२३ साली आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रजेला एक अनोखी भेट दिली. संस्थानच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी लोकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला. याच्या निवडणूका होऊ लागल्या.

१९३० साली तीन स्तरिय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली.

पण आता संपूर्ण लोकशाही कडे वाटचाल करायची होती.

औंधचे युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे लंडनमध्ये बॅरिस्टरचं शिक्षण संपवून भारतात आले होते. ऑक्सफर्डसारख्या दिग्गज विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं होतं. खऱ्या अर्थाने आधुनिक जग ते जगले होते. खुल्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

आप्पासाहेब जेव्हा आपल्या वडिलांच्या आदेशानुसार धरणे, शेतीउद्योग व कारखाने याचा अभ्यास करण्यासाठी म्हैसूरला आले तेव्हा त्यांची ओळख तिथे काम करत असलेल्या मॉरिस फ्रिडमन या अवलियाशी झाली.

पोलिश ज्यू असलेले फ्रिडमन भारतात येऊन भारतीय संस्कृतीचे पालक झाले होते. त्यांनी संन्यास देखील घेतला होता. गांधी विचारांवर त्यांची भक्ती होती.

मॉरिस फ्रिडमन आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांचे विचार जुळले.

त्यांनी म्हैसूर संस्थानचा राजीनामा देऊन ग्रामविकासाचे काम करण्यासाठी औंधला दाखल झाले. या दोघांनी राज्यभर फिरून प्रजासत्ताक राज्य कसे असावे याची पाहणी केली. आप्पासाहेब यांचे मित्र असणाऱ्या फ्रान्सिस वॉटसन यांची मदत घेतली.

या तिघांनी मिळून बनवलेला प्रजासत्ताकाचा जाहीरनामा २४ ऑक्टोबर १९३८ साली राजाच्या जन्मदिनानिमित्त प्रजेला वाचून दाखवण्यात आला.

‘आता लवकरच औंधची प्रजा संस्थानचा सर्व कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींद्वारे सांभाळेल. तो कसा असावा, लोकप्रतिनिधी कसे निवडावेत वगैरेंबाबत आम्ही लवकरच मार्गदर्शन करू

हे ऐकून अनेकांना धक्का बसला. कित्येकांना यामागे युवराजाचे षडयंत्र असल्याची शंका आली. मात्र औंधचा राजा आपल्या निर्णयावर ठाम होता. गांधीजींशी या विषयावर पत्रव्यवहार केल्यावर त्यांना या अद्भुत राजाचे कौतुक वाटले.

त्यांनी भवानराव पंतप्रतिनिधी यांना वर्ध्याच्या आश्रमात बोलावून घेतले.

तिथे राजव्यवस्था, ग्रामव्यवस्था, लोकनियुक्त मंत्रिमंडळ, शेती, अर्थव्यवस्था, घटना याबद्दल तीन दिवस मार्गदर्शन केलं. मॉरिस फ्रिडमन यांनी याच्या नोट्स बनवल्या. अगदी मतदानाचा हक्क कोणाला असावा इथंपर्यंत प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन बापूंच्या निरीक्षणातून ठरले.

गांधीजींच्या आग्रहामुळे साक्षर मतदारालाच मतदानाचा अधिकार दिला होता व त्यांना इतर गोरगरीब वयस्कर नागरिकांना साक्षर करण्याची जबाबदारी दिली होती.

१९३९ मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. ७०-७५ टक्के साक्षर जनतेने मतदान केले आणि ७० ग्रामपंचायती आणि ५ तालुका पंचायती अस्तित्वात आल्या.

औंधची निवडणूक ही फक्त तिथल्या जनतेसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी लोकशाहीचा पहिला प्रयोग होता.

गांधीजींचे या प्रयोगाकडे बारीक लक्ष होते. आप्पासाहेब पंतप्रतिनिधी,मॉरिस फ्रिडमन यांनी राजाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

स्वातंत्र्यानंतरही आपली सत्ता सोडण्यात तयार नसलेल्या भारतातल्या अनेक राजांपुढे औंधच्या राजाने अनोखा आदर्श घालून दिला.

या लोकशाही शासनाने औंधमध्ये अनेक समाजउपयोगी निर्णय घेतले. याच औंध संस्थानच्या मदतीने स्वातंत्र्यलढ्यातले प्रतिसरकार अस्तित्वात आले. खुद्द आप्पासाहेब पंतप्रतिनिधी ४२ च्या लढ्यात सहभागी झाले होते. नेहरूंच्या खास सहकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश केला जात होता.

औंधच्या राजाने मॉरिस फ्रिडमन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपूर या खुल्या तुरुंगाचा देखील प्रयोग केला जो आजही अस्तित्वात आहे. औंधच्या राज्याचे सुपुत्र ग दि माडगूळकर यांनी लिहिलेला दो आंखे बाराह हाथ हा सिनेमा यावरच आधारित आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.