एवढ्या बलाढ्य बादशाहच्या दरबारात घुसून त्याचा अपमान करणारे पिता-पुत्र याच भारतात होऊन गेले.

‘अबुल मुजफ्फर मुईनुद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर पातशाह गाझी’.. जेवढं लांबलचक नाव तेवढेच सामर्थ्यशाली साम्राज्य असलेला मुघलांचा बादशाह औरंगजेब. अर्ध्याहून जास्त दक्षिण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारा राजा. आपल्या ताकदीची जाणीव त्याला होती आणि त्यामुळे आपल्या विरोधात कुणीही जाणार नाही, याची जाणीव सुद्धा..

पण एवढ्या बलाढ्य बादशाहच्या दरबारात घुसून त्याचा अपमान करणारे पिता-पुत्र याच भारतात होऊन गेले. मुघलांच्या सामर्थ्याची धूळधाण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी एकदोनदा नव्हे, तर तब्बल चार वेळेस औरंगजेबाचा अपमान केला.. ते सुद्धा त्याच्या दरबारात घुसून..

त्याच झालं असं.. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंगासोबत तह करावा लागला. तहात ठरल्याप्रमाणे शिवरायांना आग्र्यास औरंगजेबाच्या भेटीस जाणे भाग होते. त्यात औरंगजेबाच्या वाढदिवसाचे निमित्त सुद्धा जुळून आले. पण, औरंगजेबाच्या दरबारात मात्र शिवरायांना आणि संभाजी महाराजांना जसवंतसिंगच्या मागे उभे करण्यात आले. इथेच ठिणगी पडली.

“तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशहा देख्या | मै ऐसा आदमी हो जो मुझे गोर करने खडा रखो | मैं तुम्हारा मनसबी छोड्या | मुझे खडा तो करीना सीर राख्या होता | म्हारो मरण आयो येतो | तुम मुझे मारोगे या मी अपघात कर मरोंगा | मेरा सीर काटकर ले जावो तो ले जावो | मी पातशहा जी की हुजारी नाही चलता |”

(अर्थ – “तू पाहिलेस, तुझ्या बापाने पाहिले आणि तुझ्या बादशाहने देखील पाहिले आहे मी कोण आहे आणि काय करू शकतो. तरी देखील मला मुद्दाम मान-सन्मानातून वगळण्यात आले. अरे नको तुमची मनसब ! मला जर उभे करायचे होते तर माझ्या दर्जा नुसार उभे करायचे होते. माझा मृत्यूच जवळ आला आहे. तुम्हीच मला ठार मारून टाका नाहीतर मीच स्वतःला ठार करतो. माझे मस्तक कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या पण मी बादशहाची हुजरेगिरी करण्यासाठी येणार नाही.” )

मुघलांच्या तख्ताने त्यापूर्वी आणि त्यानंतरही अशी गर्जना कधीच ऐकली नाही. झालं. एवढा प्रचंड अपमान झाल्यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैदेत बंदीस्त केले. पण संभाजी महाराजांना मात्र आग्रा शहरात, राजदरबारात किंवा इतरत्र संचार करण्याची मुभा दिली.

औरंगजेबाचा झालेला हा पहिला अपमान.

एके दिवशी संभाजी महाराज आणि रामसिंग दरबारात गेले. औरंगजेबाने शंभूराजेंना आपल्या एका नामी मल्लासोबत कुस्ती लढण्यास सांगितले. औरंगजेबाची आज्ञा म्हणजे प्रत्यक्ष देवाज्ञाच होय, असा समज मुघल दरबारात होता. ती कोण नाकारणार? पण अवघ्या नऊ वर्षांच्या संभाजी राजेंनी औरंगजेबाची आज्ञा सरळ सरळ धुडकावून लावली. 

संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, ‘आज्ञा भङगो नरेन्द्रानां अशस्त्र वध उच्यते’ म्हणजेच, राजाची आज्ञा न पाळणे म्हणजे त्याचा शस्त्राशिवाय वध करणे.. 

औरंगजेबाचा भर दरबारात झालेला हा दुसरा अपमान. या घटनेनंतर औरंगजेब संभाजी महाराजांना विसरणार नव्हता, विसरू शकत नव्हता. त्याच्या खुनशी स्वभावात ते बसत नव्हते.

इसवी सन 1681. संभाजी महाराज आणि मराठ्यांनी बुऱ्हाणपूरची धूळधाण उडवली. एवढं संपन्न शहर, पण बेचिराख झालं. औरंगजेबाला हे सहन झालं नाही. रागारागात त्याने खानजहान ला पत्र लिहिले आणि ‘दक्षिणच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे’ अशी घोषणाच त्याने केली. पण त्याच्या घोषणेचा काहीही उपयोग झाला नाही. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल या चारही शत्रूंना संभाजी राजांनी एकाच वेळेस सळो की पळो करून सोडले. 

अक्षरशः दीड वर्षात बादशाहला महाराष्ट्र सोडून कर्नाटकात आपला मोर्चा वळवावा लागला. जे कधी वाटलंही नव्हतं, ते घडत होतं. आणि औरंगजेब परिस्थितीसमोर हतबल झाला होता. त्याची मानसिक अस्थिरता वाढत होती. सर्वच आघाड्यांवर आलेलं अपयश तो पचवू शकला नाही. रागाच्या भरात त्याने आपल्या डोक्यावरचा किमांश जमिनीवर आपटला आणि प्रतिज्ञा केली,

‘संभाजीला मारल्याखेरीज अथवा त्याला राज्यातून हाकलल्याखेरीज त्याला परत डोक्यावर घालणार नाही’.. बावीस सुभ्याचा, प्रचंड संपत्तीचा, अफाट सैन्याचा अधिपती असलेल्या औरंगजेबाचे राजमुकुट संभाजी महाराजांनी त्याच्याच डोक्यावरून उडवून लावले. अतिश्रीमंत बादशाह म्हणून नावलौकिक असलेला औरंगजेब बोडक्या डोक्याने दक्खनच्या माळावर वणवण भटकत होता.. मराठ्यांचे फटके खात होता. 

त्याच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा तिसरा अपमान होता..

छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारी ‘कवी कलश’ नावाचे श्रेष्ठ कवी होते. कवी कलश शीघ्र कवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे झालेल्या झटापटीनंतर पकडून औरंगजेबासमोर आणण्यात आले, तेव्हा औरंगजेब भारावून गेला. परमेश्वराने केलेल्या कृपेबद्दल त्याला इतकी धन्यता वाटली की तो सिंहासनावरून खाली उतरला आणि परमेश्वराची प्रार्थना करू लागला, आभार मानू लागला. ते दृश्य पाहून कवी कलशाच्या प्रतिभेला स्फुरण चढले. छत्रपती संभाजी महाराजांना उद्देशून त्यांनी एक काव्य क्षणात म्हणून दाखवले. कवी कलश म्हणाले,

‘यावन रावण की सभा, संभु बंध्यो बजरंग ।

लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग ।

ज्यो रवि छवी लखत ही, खद्योत होत बदरंग ।

त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग ।।’

म्हणजे,

“रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर (यावन) उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा सेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने, हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्या प्रकारे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.”

हा झालेला त्याचा चौथा अपमान.. 

मराठ्यांनी औरंगजेबाला वणवण फिरवले. दख्खन जिंकायला आल्या औरंगजेबाला शेवटी याच दक्खनेत ‘दो गज जमीन’ शोधावी लागली. आयुष्यात त्याच्याकडे नजर वर करून पहायची कुणी हिम्मत केली नाही. पण शिवराय आणि महापराक्रमी शंभूछत्रपती यांनी त्याचा त्याच्याच दरबारात घुसून चार वेळेस अपमान केला.

म्हणूनच, शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हे तमाम मराठमंडळींचा स्वाभिमान आहेत. सन्मानाने आणि अभिमानाने जगायचे कसे, याचा वस्तुनिष्ठ परिपाठ घालून देणाऱ्या या जोडगोळीला त्रिवार मानाचा मुजरा..

  • केतन पुरी

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.