अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने लाहोरचा किल्ला सोडून पळून गेला

‘अटकेपार भगवा फडकला’, ‘अटक ते कटक मराठ्यांची सत्ता होती, किंवा ‘अहद तंजावर, तहद पेशावर अवघा मुलुख आपला’ हे वाक्य आपल्या कानावर सतत पडत असतात. मराठ्यांनी आजच्या पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा फडकवला होता. फक्त अटक किल्ल्यापर्यंतच नव्हे, तर त्याच्याही पुढे मराठे गेले होते. ‘अटकेपार झेंडे फडकावणे’ ही म्हण तेव्हापासून उदयास आली. मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर अद्भुत पराक्रम केला होता.पण अटकेपार म्हणजे नेमकं कुठेपर्यंत मराठ्यांचा भगवा पोहचला होता? अफगाणिस्तान च्या सीमेपर्यंत धडक मारणाऱ्या मराठ्यांनी किती किल्ले जिंकले होते?

जानेवारी-फेब्रुवारी 1757 मध्ये अहमदशाह अब्दालीने दिल्लीवर स्वारी केली.

उत्तरेत भयंकर परिस्थिती तयार झाली. मुघलांच्या साम्राज्यावर कुणी आक्रमण केले, तर त्यांचे संरक्षण करायची जबाबदारी मराठ्यांकडे होती. बदल्यात चौथाई गोळा करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला होता. किती ते दुर्दैव.. मराठ्यांना संपवायला दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबाचे वंशज मराठ्यांच्या छत्रछायेखाली गुण्यागोविंदाने राहण्यात धन्यता मानत होते.

अब्दाली दिल्लीत आला, तेव्हा त्याच्याकडे 12 कोटींची लूट होती. दिल्लीत आल्यावर त्याने माजी वजीर इंतीजाम-उद-दौला कडून 4 कोटी, गाजीउद्दीन वजीराकडून 1 कोटी आणि सावकारांकडून 7 कोटी अशी आणखी 12 कोटींची खंडणी वसूल केली. तब्बल 24 कोटींच्या खंडणी सोबतच मुहम्मद शाह बादशाहच्या मुलीशी स्वतःचा विवाह सुद्धा अब्दालीने लावून घेतला.

पण मराठे अतिवेगाने एक एक नदी ओलांडत उत्तरेत येत होते. अब्दाली माघारी वळला. पण मराठ्यांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.

उत्तरेत भयंकर राजकारण सुरू झाले. गाजीउद्दीन वकील, सुरजमल जाट इ. महत्वाच्या राजकीय व्यक्तींनी मराठ्यांशी हातमिळवणी केली. आता मराठे अतिशय बलाढ्य झाले. सरहिंद नजीक मराठे पोचले. मल्हारराव होळकर, राघोबा दादा पेशवे आणि सुरजमल जाट कडे असणाऱ्या शीख सैन्याने जबरदस्त लढाई केली. अब्दालीचा सरदार जंगबाजखान दहा हजार फौजेसहित बुडाला. त्याच्यासोबत असलेला अब्दुस्समदखान जखमी अवस्थेत मराठ्यांच्या हाती लागला. तिथे असणाऱ्या आदिनाबेग याने मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि तो सरहिंदचा अंमलदार झाला.

आता मराठे इर्षेला पेटून उठले होते. अब्दालीच्या पळून जाणाऱ्या फौजेचा पाठलाग सुरू झाला.

त्यातच, आदिनाबेग याने मराठ्यांना दर दिवसा चाल करून जात असता एक लाख रुपये आणि दर मुक्कामी पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले. मराठ्यांना स्वारीसाठी अमाप पैसा उपलब्ध झाला. आता मराठे लाहोर-अटकच्या किल्ल्याकडे वळले.

लाहोरच्या किल्ल्यात अब्दालीचा पोरगा तैमुर शाह आणि सेनापती जहानखान होते. पण मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याआधी मौल्यवान साधनसंपत्ती घेऊन ते अटक किल्ल्याला पळून गेले. न लढताच लाहोरचा किल्ला पडला. आता मराठे अटक कडे वळाले.

अटकेच्या किल्ल्यावर सुद्धा मराठ्यांना कोणताही जोरदार प्रतिकार झाला नाही.

अटकेच्या किल्ल्यात पाय ठेवणारा पहिला मराठा होता सरदार मानाजी पायगुडे. अटकेवर भगवा फडकला. मराठ्यांनी पराक्रमाचा कळस गाठला होता. पण अजून मराठे थांबले नव्हते.

अटकेच्या नंतर मराठे पेशावर ला आले. पेशावरच्या किल्ल्यावर भगवा फडकवून मराठे खैबर खिंडीजवळ जाऊन धडकले.

खैबर चा रक्षक जमरूदचा किल्ला मराठ्यांच्या आधीन आला. खैबर खिंड म्हणजे काबुल-कंदहार चे प्रवेशद्वार. कुठे राजगड, रायगड, तोरणा, सातारा, पन्हाळगड.. आणि कुठे अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला जमरूदचा किल्ला, खैबर खिंड.. मराठे कुठल्या कुठे जाऊन पोचले होते. हा मराठ्यांनी दाखवलेला अत्युच्च पराक्रम होता.

हे थोरल्या शाहू छत्रपतींचे स्वप्न होते.. जे त्यांच्या मृत्यूपश्चात 8 वर्षांनी पूर्ण झाले. याविषयी एक अस्सल पत्र आज उपलब्ध आहे. कान्होजी आंग्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आंग्रे यांनी इसवी सन 1734 साली थोरल्या शाहू छत्रपतींना एक पत्र लिहिले ज्यात त्या म्हणाल्या,

‘महाराजांसारखा धनी सर्व प्रकारे अभिमानी चित्तावरी धरितील तरी रुमशाम शासनाक्रांत करितील.’

म्हणजेच, जर महाराजांनी मनात जरी आणले तरी नक्कीच रुमशामवर जरीपटका फडकेल. सातारा शहरात बसून युरोप जिंकण्याचे शाहू छत्रपतींचे मनसुबे होते. यातूनच पुढे प्रेरणा घेत मराठ्यांनी लाहोर, पेशावर, अटक हे किल्ले जिंकत जमरुदपर्यंत धडक मारली. अफगाणिस्थान आणि तत्कालीन भारताला जोडणाऱ्या ‘खैबर खिंडीवर’ मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

अटकेपार झेंडा फडकला..

आणि तो फडकवणारे मर्द मराठे म्हणजे मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.