मंत्री असले तरी आपल्या मुलांना शाळेत एसटीनेच पाठवणारे बी जी खताळ
बी. जे खताळ. संपूर्ण नाव भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील. जुन्या पिढीचा एक खमका आणि काँग्रेसी विचारांचा खंदा शिलेदार. तितकाच तत्वाने वागणारे..
या नेत्याने प्रदीर्घ राजकीय कारकीर्द गाजवून, अनुभवाचा खजिना जमवून वयाच्या ९३ व्या वर्षी लिखाण सुरु केलं. आता प्रश्न पडेल ९३ वर्षी लिखाणाची सुरुवात म्हणजे असं किती काळ जगले ते ? १०१ वर्ष. हो खताळ हे एका शतकाचे साक्षिदार होते. २६ मार्च १९१९ हि त्यांची जन्मतारीख तर सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांचं निधन झालं.
ते २१ वर्ष आमदार होते. पैकी १५ वर्ष त्यांनी राज्यातल्या महत्वाची खाती संभाळली. राजकारणातून संन्यास कधी घ्यावा यावर बोलताना एकदा ते म्हणाले होते, कुठल्याही नेत्यासाठी ६० नंतरचा काळ हा तरुणपणाचा असतो. या वयातच तो उंचीवर पोहचू शकतो. पण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या खताळांनी वयाच्या ६५ व्या वर्षी राजकारणातून संन्यास घेतला.
खताळ राजकारणात राहिले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असं म्हणतात.
ते मूळचे नगर जिल्ह्यातल्या धांदरफळचे. आई वडील शिक्षित असल्यामुळे भिकाजीरावांचे चांगलं शिक्षण झालं. मॅट्रिकपर्यन्तच शिक्षण पुर्ण करुन ते बडोद्याला बोर्डिंग स्कूलला गेले. १९४२ सालात पुण्यात येवून त्यांनी आय.एल.एस लॉ कॉलेजला वकिलीसाठी प्रवेश घेतला. वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नामवंत वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता. १९४५ ते १९५१ हा काळ वकिली केली. १९५२ च्या दरम्यान त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली.
आणि याच दरम्यान त्यांच्या मूळ गावातून विधानसभेची निवडणूक लढवायला हवी, अशी सूचना काँग्रेस पक्षाने केली आणि खताळ यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि थेट गाव गाठलं, निवडणूक लढवली.
पण त्यांचा पराभव झाला.
तेंव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सक्रिय होती. जरी खताळ काँग्रेसचे होते तरी ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले.
१९५७ सालच्या निवडणुकीत ते उभे नव्हते राहिले. पण त्यानंतर १९६२ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.. आणि त्यानंतर १९७८ चा अपवाद सोडला तर १९६२ ते थेट १९८५ पर्यंत ते सलग निवडून येत राहिले.
महाराष्ट्र स्थापनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्याच मंत्रमंडळात त्यांना स्थान मिळालं. तेंव्हापासून त्यांना अनेक खाती मिळत गेली. सहकार, पाटबंधारे, कृषी,नियोजन, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन, विधी न्याय अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली.
यशवंतराव चव्हाण, मोरोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, अंतुले, बाबासाहेब भोसले अशा मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांची राजकीय कारकिर्द बहरली.
राजकीय नेत्यांना आपली खुर्ची सोडवत नाही आणि इथं खताळ यांनी १९८० ची निवडणूक हि आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं आणि १९८५ मध्ये आपला कार्यकाळ संपला कि त्यांनी निवृत्ती घेतली होती. थोडक्यात तत्वाने वागणारे राजकारणी होते ते.
त्यांच्या तत्वशील असण्याचा एक किस्सा खूप विचार करण्यासारखा आहे…
ते मंत्री असतांना त्यांगाडी नगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर साखर कारखान्याच्या फाट्यावरून जात होती. सकाळची वेळ होतो ती. तितक्यात मंत्री महोदयांच्या खासगी सचिवांचे लक्ष बाहेर गेले..ज्या रस्त्यावरून त्यांची गाडी पास होत होती तिथूनच मंत्री महोदयांची मुलं शाळेत पायी जात होती. तिथून शाळा जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावर होती.
सचिवांनी खताळ यांना विचारलं, “साहेब मुलं शाळेत पळत जातायेत गाडी थांबवूया का”?
त्यावर अगदी शांतपणे मंत्री महोदय खताळ उत्तरले, “सरकारने हि मंत्र्यांसाठी दिली आहे. मंत्र्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी हि गाडी दिली नाही”. हे उत्तर ऐकून सचिव गप्पच बसले.
बी.जे. खताळ हे होतेच कडक शिस्तीचे. आपण मंत्री आहोत आपल्या मुलांना लाल दिव्याच्या सरकारी गाडीतून शाळेत सोडावं असं त्यांना न वाटता ते थेट मुलांना एसटी ने पाठवायचे.
बरं हा किस्सा इथेच संपत नाही तर आणखी एकदा असाच काहीसा प्रसंग त्यांच्या मुलांच्या शाळेत घडला होता.
मुलांच्या शाळेत स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून खताळ यांना बोलवण्यात आलं होतं. संमेलनात खताळ गेले त्यांनी भाषण देखील केलं. कार्यक्रम संपल्यावर ते निघाले. सगळे त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या गाडीजवळ गेले. शिक्षकांना पाहताच खताळ यांनी त्यांना विचारलं तुमच्या शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय शिक्षा आणि दंड असतो ?
शिक्षकांनी सांगितलं कि, आम्ही विद्यार्थ्यांना दंड आकारतो. हे ऐकताच खताळ यांनी खिश्यातून पैसे काढले आणि त्या शाळेच्या शिक्षकांच्या हातावर ठेवले. आणि सांगितलं कि,” आज माझी दोन्ही मुलांना शाळेत पोहचायला उशीर झाला. त्यांना वेळेचा नियम पाळता आला नाही. शाळेच्या नियमानुसार, हा त्यांचा दंड आहे”…
असं म्हणत, त्या दंडाची पावती मुलांबरोबर घरी पाठवा असं सांगायला ते विसरले नाही.
असे होते तत्वांनी आणि नियमांनी वागणारे बी.जे. खताळ.
तत्वनिष्ठ राजकारण्यांची यादी करायची अन त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा असा जर निकष लावायचा असेल तर ती यादी बी. जी खताळ यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे मात्र खरंय..
हे हि वाच भिडू :
- खताळ नसते तर आज देशभरातल्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स भरावा लागला असता.
- डीएसके यांच्या प्रामाणिकपणाचा एक किस्सा
- शेतात राबणाऱ्या कार्यकर्त्याला उचलून नेलं आणि थेट आमदार बनवलं !