जेरुसलेमची ८०० वर्ष जुनी पंजाबी बाबाची सराई आजही भारतीयांचं हक्काचं स्थान समजली जाते..
सध्याच्या जगात सगळ्यात जास्त कुठल्या भाषेतील गाणी वाजत असेल तर ती पंजाबी. पंजाबी गाण्यांमुळे हि भाषा सर्वदूर पसरली आणि जगभरात बोलली जाऊ लागली. पंजाबी भाषेचं प्रस्थ अगदी भारतभरातल्या खेड्यापाड्यांमध्ये गाण्याच्या रूपाने जाऊन बसलंय. पण जर जाणूनच घ्यायचं झालं कि पंजाबी गाणी आणि पंजाबी भाषा नक्की कोणापासून सुरवात झाली, कुणी शोधून काढली तर त्याबद्दल जरा जाणून घेऊ.
फरीदुद्दीन गंजशकर या एका पंजाबी मुस्लिम सुफी संताने आधुनिक पंजाबी भाषेचा शोध लावला.
फरीदुद्दीन गंजशकर याना सगळीकडे बाबा फरीद या नावाने ओळखले जाते. बाबा फरीद गंजशकर हे अगदी कमी सुफी संतांपैकी एक आहेत कि ज्यांचा उल्लेख हा गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात केला गेला आहे.बाराव्या शतकातील अतिशय महत्वाचे पंजाबी- मुस्लिम उपदेशकांपैकी ते एक आहेत.
आरंभीच्या काळात त्यांचं जीवन फरीदुद्दीन मसूद म्हणून व्यतीत झालं, ११७५ मध्ये त्यांचा जन्म पंजाबमधील मुलतानपासून १० किमी अंतरावर असलेल्या कोठेवाल येथे झाला. मुलतान येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तिथे त्यांची भेट त्याचे गुरु कुतबुद्दीन बख्तियार काकी यांच्याशी झाली जेव्हा ते बगदादहून दिल्लीकडे जात असताना मध्ये मुलतानहून जात असत.
प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर ते आपल्या गुरुकडे इस्लामिक सिद्धांत शिकण्यासाठी दिल्लीला गेले. नंतर ते हंसी, हरियाणा येथे स्थायिक झाले. कुतबुद्दीन बख्तियार काकी यांचे निधन झाले तेव्हा फरीदुद्दीन यांनी हरियाणा सोडले आणि ते आपल्या गुरुचे अध्यात्मिक वारस बनले आणि अजोधन [ जे सध्याच पाकपट्टण आहे ] , पाकिस्तान येथे स्थायिक झाले.
फरीदुद्दीन गंजशकर यांचा दरबार पंजाबमधील पकपट्टण येथे आहे.
फरीदुद्दीन गंजशकर यांचं अतिशय उल्लेखनीय आणि महत्वाचं काम म्हणजे पंजाबी भाषा आणि पंजाबी साहित्य यात त्यांनी घडवलेला क्रांतिकारी बदल. पंजाबी साहित्यात फरीदुद्दीन यांनी साहित्यिक हेतूने पंजाबी भाषेचा विकास केला. संस्कृत, अरबी तुर्की आणि पर्शियन ऐतिहासिकदृष्ट्या शिकलेल्या आणि उचभ्रु लोकांच्या भाषा त्याकाळी मानल्या जात असे. पंजाबी भाषा त्याकाळी फारशी प्रचलित नव्हती, आणि त्यामुळे ती लोकांमध्ये जास्त बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता. तुलनेने पंजाबी भाषा कमी महत्वाची मानली गेली होती.
पूर्वीच्या कवी लोकांनी जे लिखाण पंजाबी साहित्यात केलं होतं ती भाषा एकदम अवघड आणि प्रचलित नसलेली होती. फरीदुद्दीनच्या आधी पंजाबी साहित्यात पारंपरिक आणि बोटावर मोजता येतील इतकी गाणी सोडून दीर्घ असं काहीही नव्हतं. सगळ्यात आधी पंजाबी भाषेच्या प्रसारासाठी फरीदुद्दीन यांनी कवितेचा वापर केला. त्यासाठी लोकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या स्थानिक पंजाबी भाषेचा आधार घेतला. पुढे त्यांनी पंजाबी भाषेत अनेक काव्ये लिहिली.
बाबा फरीद यांनी लिहिलेल्या भक्तिमय काव्याचा इंग्रजी अनुवाद राणा नायर यांनी केला होता. यासाठी त्यांना २००७ मध्ये साहित्य अकादमी सुवर्ण महोत्सवी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बाबा फरीद याना गंजशकर हे नाव एका अध्यात्मिक अनुभवातून मिळालं होतं. एक आख्यायिका आहे की त्याची आई तरुण फरीदला चटईखाली साखर ठेवून प्रार्थना करण्यास प्रोत्साहित करते. एकदा, जेव्हा ती विसरली, तेव्हा फरीदला तरीही साखर मिळाली, एक अनुभव ज्याने त्याला अधिक आध्यात्मिक प्रोत्साहन दिले आणि त्याला त्याचे नाव दिले गेले. गंजशकर म्हणजे साखरेचा खजिना असलेला.
बाराव्या शतकात बाबा फरीद जेरुसलेमला गेले. तिथे त्यांनी एका धर्मशाळेत सलग ४० दिवस ध्यानधारणा केली. ती धर्म शाळा आज ८०० वर्षांनंतरही बाबा फरीद कि सराई म्हणून ओळखली जाते. भारतीय मुस्लिम मक्केला जाण्यासाठी जेरुसलेमवरून जातात त्यावेळी फरीद कि सराई येथे जाऊन डोके टेकतात. पहिल्या महायुद्धावेळी इस्त्रायलला गेलेलं भारतीय सैन्य देखील याच धर्मशाळेत उतरलं होतं.
जेरुसलेमध्ये बराच काळ राहिल्यानंतर बाबा फरीद पंजाबमध्ये परत आले आणि चिश्ती समाजाचे प्रमुख झाले.
फरीदुद्दीन यांनी सगळ्यात पंजाब प्रांतात लंगर हा प्रकार सुरु केला जो सामाजिक जाणिवेतून सुरु झाला. पंजाबी समाजातील सामाजिक जडणघडणीत विविध धर्माच्या लोकांना विनामूल्य अन्न आणि पेय फरूदुद्दीन यांनी देण्यास सुरु केलं. एकात्मतेचं हे प्रतीक होतं. पुढे शीख बांधवानी त्यांची हि चळवळ मोठी केली.
पंजाबी कव्वाली आणि गाण्यांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले. बाबा फरीद यांनी रचलेल्या १२३ रचना या शिखांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहे. जगभर पसरलेल्या पंजाबी भाषेचे जनक म्हणून बाबा फरीद याना ओळखले जाते.
हे हि वाच भिडू :
- पंजाबी लोकांनी कॅनडात इतका दरारा कसा निर्माण केला आहे…?
- पंजाबी माणूस तामिळनाडूमध्ये देखील प्रसिद्ध होऊ शकतो हे जसपाल भट्टी ने दाखवून दिलं
- केनियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक पंजाबी वीर योद्धा लढला होता
- शरद जोशी व लाखो पंजाबी शेतकऱ्यांनी राज्यपालांना ६ दिवस घरातून बाहेर पडू दिलं नाही