बाबाराव सावरकरांनी मोहम्मद अली जिनाची ५० हजाराची सुपारी दिली होती?

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कोणी टीका करतं तर कोणी थेट त्यांना देवत्वाच्या जागी नेऊन ठेवत. काहीही झाल तरी सावरकरांच्या राजकारणाचा  स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासावरील व त्यांच्या साहित्याचा मराठी समाजमनावर असलेला पगडा कोणी नाकारू शकत नाही.

पण याच भक्तीभाव किंवा टोकाचा द्वेषातून त्यांच्यावरील अभ्यास एकतर्फी होऊन जातो. त्यांच्या इतिहासातील अनेक पाने गाळली जातात.

असंच झालंय बाबाराव सावरकरांच्या बाबतीत.

सावरकरांचे हे मोठे बंधू. ते देखील एक क्रांतीकारी होते. विनायकराव सावरकरांच्या आधीपासून त्यांनी अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.  पण त्यांच्याबद्दल आपल्याला जास्ती माहिती नसते

मूळ नाव गणेश दामोदर सावरकर. विनायक उर्फ तात्यारावांपेक्षा चार वर्षांनी वडील.

त्यांचा जन्म नाशिक जवळील भगूर येथे झाला. तिथे त्यांची परंपरागत जहागीर होती. वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. शिक्षणातही उत्तम होते. मात्र घरच्या जबाबदारीमुळे मॅट्रिकच्या आतच उरकले.

त्यांना ज्योतिषशास्त्राचा आणि आयुर्वेदाच्या अभ्यासाचा नाद होता. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. आईच्या अकाली मृत्यू मुळे घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांचे लवकर लग्न लावून देण्यात आले.

त्यांची पत्नी यशोदा हिनेच बाबाराव आणि तात्याराव या दोघा भावांना स्वातंत्र्यलढयासाठी प्रेरित केलं अस म्हणतात.

शिक्षणासाठी बाहेर पडलेले तात्याराव सावरकर यांनी आपल्या मित्रांसह एका गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. कालांतराने बाबाराव सावरकर देखील यात सामील झाले.

अनेक तरुणांना प्रेरणा देण्यासाठी १ जानेवारी १९०० या रोजी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली.

बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. यासंस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंती, अकबर जयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्‍या केल्या जायच्या. टिळकांच्यासारखी मोठमोठ्या वक्त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जायचं.

पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षणासाठी परदेशी गेले. तिथून त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे काम चालू ठेवले. बॉम्ब बनवण्याच तंत्रज्ञान, पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.

इकडे बाबाराव सावरकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक हे राष्ट्रीय चळवळीचे केंद्र बनले. सावरकरबंधू तरुणाईत प्रसिद्ध झाले.

दुर्दैवाने १९०९ साली इंग्रजांनी बाबाराव सावरकरांना अटक केली व त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना झालेल्या शिक्षेने भडकलेल्या अनंत कान्हेरेने जॅक्सनचा खून केला आणि फासावर गेले.

या घटनेवरून बाबाराव सावरकरांची मराठी तरुणांच्यातील लोकप्रियता लक्षात येईल.

बाबाराव सावरकरांना आजन्म जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला पाठवण्यात आले. काही काळाने तात्याराव सावरकर देखील याच सेल्युलर जेलमध्ये आले. या दोघा भावांच्या सुटकेसाठी त्यांच्या सर्वात धाकट्या बंधूने नारायणराव याने अनेक प्रयत्न केले.

अर्जविनंत्या, आंदोलने यानंतर अखेर इ.स. १९२१ दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली.

पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले. तात्याराव सावरकर यांना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्धतेमध्ये ठेवण्यात आले होते.

सुटकेनंतर सावरकरांना राजकीय लढ्यात सहभागी होण्याची बंदी घालण्यात आली होती. याच काळात सावरकर बंधूनी हिंदुत्वांवर लक्ष केंद्रित केले. त्यावरील पुस्तके लिहिणे, प्रकाशित करणे हे त्यांचे मुख्य काम होते. हिदू धर्मातील अनिष्ठ रूढी परंपरावर टीका करणे, समाजसुधारणा, जनजागृती अशी कार्य सुरु केली.

मात्र पडद्यामागे राहून क्रांतीकारी तरुणांना प्रेरणा देण्याच काम सुद्धा चालूच होतं. अशातच त्यांची ओळख यशपाल नावाच्या तरुणाशी झाली.

यशपाल पंजाबचे, शालेय जीवनातच त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. मात्र काही वर्षांनी ते सशस्त्र क्रांतीकार्याकडे वळले. यातूनच त्यांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्या डाव्या विचारसरणीच्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी या क्रांतिकारी संघटनेमध्ये प्रवेश केला.

तिथे त्यांची ओळख शार्प शुटर अशी बनली होती. 

यशपाल यांची किर्ती बाबाराव सावरकरांच्या कानी पडली. त्यांनी दिल्लीला जाऊन त्याची आणि भगवतीचरण वोहरा यांची भेट घेतली. “राष्ट्रकार्यासाठी एक योजना आहे आणि त्यासाठी मुंबईला ये” अस त्यांनी यशपाल यांना सांगितलं.

डिसेंबर १९२९ रोजी बाबांराव सावरकर आणि यशपाल यांची भेट अकोल्याला झाली. 

यशपाल सांगतात त्यांना पोहचायला खूप रात्र झाली होती. बाबाराव एका छोट्याशा खोलीत एकटे राहात होते. थंडीचे दिवस होते. सावरकरांनी आपल्या जवळची एकमेव चादर यशपाल यांना दिली व स्वतः कुडकुडत झोपले.

यशपाल यांनी बाबारावांना कामाबद्दल विचारले. त्यांना वाटत होते एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करायचा आहे. पण सावरकरांनी सांगितल,

“हां अंग्रेज़ों को तो भगाना ही है, लेकिन इनके अलावा देश के और भी दुश्मन हैं. जो देश की एकता के लिए खतरा हैं. जो अंग्रेज़ों को निकाल फेंकने के हमारे प्रयासों में बाधा हैं. मोहम्मद अली जिना. अगर तुम उसे मारने की ज़िम्मेदारी लेते हो तो स्वतंत्रता के रास्ते का सबसे बड़ा कांटा साफ हो जाएगा और इस काम के लिए हम तुम्हारी ५०,००० रुपयों की आर्थिक मदद कर सकते हैं “

हे अतिशय टोकाचे पाऊल होते. कारण अजून त्या काळात मोहम्मद अली जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली नव्हती. ती त्यांनी दहा वर्षानंतर म्हणजे १९४० मध्ये केली. पण त्यांनी मुस्लीम लीगच्या माध्यमातून मुसलमानांच्या राजकारणास कट्टरतेच वळण देण्यास सुरवात नक्कीच केली होती.  जिनाचा खून म्हणजे मोठ्या हिंदू मुस्लीम दंगलीस कारण मिळण्याची शक्यता होती.

सावरकरांनी देऊ केलेले पन्नास हजार म्हणजे त्याकाळी प्रचंड मोठी रक्कम होती. पण यशपाल यांनी विचार केला आणि ही सुपारी घेण्यास नकार दिला.  ते म्हणतात,

” बाबाराव की लगन और त्याग पर कोई संदेह नहीं था, लेकिन हमारा नज़रिया सावरकर बंधुओं से अलग था”

बाबाराव सावरकरांनी देखील यशपाल यांच्या विचारांचा आदर केला आणि त्यांना परत पाठवून दिले. यशपाल यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत क्रांतीकार्य सुरु ठेवलं. पुढे ते एक लेखक म्हणून देखील प्रसिद्ध झाले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला.

Yashpal 2003 stamp of India

१६ मार्च १९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.

गंमत म्हणजे ज्या मोहम्मद अली जिना यांच्या मृत्यूसाठी बाबाराव सावरकर प्रयत्न करत होते त्याच जिना यांच्या मुस्लीम लिगबरोबर युती करून सावरकरांच्या हिंदू महासभा या पक्षाने निवडणुका लढवल्या.

संदर्भ-

  • Savarkar: The True Story of the Father of Hindutva
  • Friend, Corinne (Fall 1977), “Yashpal: Fighter for Freedom — Writer for Justice”, Journal of South Asian Literature,

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.