गांधींच्या पुतळ्यास गोळ्या घालण्याचा विकृतपणा करणाऱ्या हिंदू महासभेने मुस्लीम लीगला पाठिंबा दिला होता.

काल एक जाहीर घटना घडली. कालच्या त्या घटनेचं बातमीमुल्य अस की ती घटना जाहिर घडली. नाहीतर अशा घटना म. गांधींच्या हत्येनंतर रोजच घडत असतात. सुरवातील रद्दीच्या भावात विकल्या जाणाऱ्या पुस्तकातून असा प्रचार चालायचा जो आज व्हॉटस्अप आणि फेसबुकच्या माध्यमातून होतोय.

आत्ता काल काय झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पूजा पांडेय नावाची एक विकृत महिला आहे. हि महिला अखिल भारतीय हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. तिने काय केल तर आपल्या अशाच विकृत सदस्यांना घेवून  म. गांधींच्या ७१ व्या स्मृतीदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या झाडताना त्यांना पुतळ्यामधून रक्त येईल याची देखील सोय केली. पुढे पुतळा जाळण्यात आला. नथुराम गोडसेच्या नावाने अमर रहें च्या घोषणा देण्यात आल्या. 

तर पूजा पांडेय अर्थात डॉ. पूजा शकुन पांडेय. उत्तरप्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यातल सहरानपुर हे तिचं गाव. उच्चशिक्षीत असणाऱ्या या महिलेने एम.फिल, पी.एच.डी गणित विषयात पुर्ण केलीय. बर पाच ते सात वर्षांपुर्वी हि महिला गणिताचे प्राध्यापक म्हणून काम देखील करत होती. पण सध्या ती अखिल भारतीय हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. 

अखिल भारतीय हिंदू महासभा म्हटल की आठवतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हिंदू महासभा नेमक प्रकरण काय आहे याची सुरवाती पासून समजून घेऊ.

१९०५ साली भारताचे व्हईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी सुप्रसिद्ध फोडा व राज्य करा या धोरणाला अनुसरून बंगालची धार्मिक तत्वावर फाळणी केली. त्याच्या पुढच्याच वर्षी मुस्लीम लीगची स्थापना करण्यात आली. मोर्ले मिंटो सुधारणाच्या नावाखाली भारतात मुसलमानांना राखीव मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव पुढे आला.

यामुळे हिंदू हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी लाला लजपतराय, लाल चंद, शादीलाल यासारख्या नेत्यांनी पंजाब हिंदू सभेची १९०९साली स्थापना केली. त्याच्या लाहोर सभेचे अध्यक्षपद मदनमोहन मालवीय यांना देण्यात आले.  पुढे काही वर्षात संपूर्ण देशात अशा हिंदू सभा स्थापन झाल्या.

डिसेंबर १९१३ साली पंजाब हिंदू सभेने प्रस्ताव ठेवला या सगळ्या सभांना एकत्र करणारी सर्वदेशक हिंदू सभा स्थापन करावी आणि १९१५ सालच्या हरिद्वार येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात देशातील सर्व हिंदू नेते एकत्र येऊन पहिले अधिवेशन होईल.

१९१६ साली लखनौ येथे कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगचे संयुक्त अधिवेशन भरले. काँग्रेसचे नेते लोकमान्य टिळक आणि मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना यांनी या सभेत हातमिळवणी केली आणि टिळकांनी लीगच्या मुसलमानांना राखीव मतदारसंघाच्या मागणीला पाठिंबा दिला. हिंदू सभेने काँग्रेसने आपली भूमिका बदलल्याचा जोरदार विरोध केला.

एप्रिल १९२१ साली हिंदूसभेचे नाव अधिकृतरित्या अखिल भारतीय हिंदू महासभा असे करण्यात आले.

वीसच्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदू महासभेमध्ये बाळकृष्ण मुंजे, वि.दा स्वर्क्र या नेत्यांचा उदय झाला. याच काळात हिंदू महासभेतून बाहेर पडून हेडगेवारांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ हा सक्रिय राजकारणापासून दूर राहून फक्त हिंदू समाजाच्या सेवा समर्पण कार्यासाठी वाहून घेतलेली संघटना होती.

हिंदू महासभा मात्र सक्रीय राजकारणात सहभागी होती. गोलमेज परिषदेमध्ये बाळासाहेब मुंजे हजर राहिले. गांधीजींच्या अहिंसक धोरणे, त्यांचे सविनय कायदेभंग आंदोलन याचा हिंदू महासभेने हिरीरीने विरोध केला.

१९३७ सालच्या प्रांतीय निवडणुकांमध्ये हिंदू महासभेने सहभाग घेतला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला मात्र काही वर्षातच त्यांनी व्हाईसरॉयच्या धोरणाविरुद्ध राजीनामे दिले. यामुळे ठिकठिकाणी युती व आघाडी सरकारे स्थापन झाली.

या युती सरकार मध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण सरकार सिंध प्रांतामधले होते. तिथे मुस्लीम लीगला हिंदू महासभेने पाठिंबा दिला आणि गुलाम हुसेन हिदायतुल्ला हे तिथले मुख्यमंत्री ठरले. याच सरकारने पहिल्यांदा विधानसभेमध्ये मुसलमानांना स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मंजूर केली.

हिंदू महासभेच्या मंत्र्यानी याचा निषेध केला मात्र सत्ता सोडली नाही.

हिंदू महासभेने कधीच ब्रिटीशसत्तेला उघड विरोध करण्याची भूमिका घेतली नव्हती उलट १९४२च्या चलेजाव आंदोलनाला बहिष्कार घातला. सावरकर यांच्यावर द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिबा दिल्याचाही आरोप झाला.

साधारण तीसच्या दशकात नथुराम गोडसे नावाचा युवक आरएसएस आणि हिंदू महासभेचा कार्यकर्ता बनला. हिंदू एकता आणि सशक्तीकरण हेच त्याचे ध्येय होते. पुढे फाळणीच्या विरोधात या दोन्ही संघटना सुस्पष्ट भूमिका घेत नाहीत म्हणून १९४६ या दोन्ही संघटनाचा राजीनामा दिला.

३० जानेवारी १९४८ साली प्रार्थनासभेतून बाहेर येणाऱ्या महात्मा गांधींची गोळ्या घालून त्याने हत्या केली. गांधीजीनी फाळणी स्वीकारली हे या हत्येमागील कारण होते. या खुनाचा ठपका आरएसएस आणि हिंदू महासभेवर देखील ठेवण्यात आला. तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी या संघटनावर बंदी आणली.

गांधीजींच्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या शंकेमुळे जनमत हिंदू महासभेच्या विरोधात गेले. हिंदू महासभेच्या श्यामाप्रसाद मुखर्जींसारख्या उगवत्या नेत्यांनी जनसंघ नावाच्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली. हिंदू महासभा राष्ट्रीय राजकारणातून बाहेर पडली.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आलेल्या आत्मविश्वासामुळे हिंदू महासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. वेळोवेळी महात्मा गांधीजींच्या विरुद्ध केलेली वक्तव्ये, नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न यामुळे हिंदू महासभा चर्चेत आली आहे.

यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राम मंदिरचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.