मलबार हिलच्या बंगल्याला नकार देऊन छोट्या घरात राहणारा एक मंत्री महाराष्ट्रात होऊन गेला.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ तेव्हा राखीव होता. कॉंग्रेसतर्फे तेव्हा बाबुराव भारस्कर नावाच्या तरुण कार्यकर्त्याला तिकीट मिळाल होतं. बाबुराव भारस्कर हे जेष्ठ गांधीवादी नेते ह.भ.प. बाळासाहेब भारदे यांचे मानसपुत्र मानले जात.

भारस्कर यांच्या मागे पैशाचं पाठबळ नव्हत. पण जनतेत राहून केलेलं काम आणि प्रामाणिकपणा याची शक्ती जरूर होती. एक बैलगाडी आणि सायकलवरून कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार केला आणि अवघ्या १०० रुपये खर्चात बाबुराव भारस्कर निवडून आले.

त्याही काळात बाबुराव भारस्कर यांचा विजय एक आश्चर्य मानला गेला होता. हाच पराक्रम त्यांनी १९६७ साली सुद्धा करून दाखवला. 

त्या निवडणुकीनंतर बाबुराव भारस्कर हे लोणीव्यंकनाथ या छोट्या गावी मुक्कामी होते. त्यावेळी श्रीगोंद्याचे तहसीलदार इनामदार हे ट्रकमध्ये बसून लोणीव्यंकनाथला भारस्कर यांच्या मंत्रिपदाची तार घेऊन आले.

आपला उद्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी आहे, असा निरोप तहसीलदारांनी दिला.

मात्र, भारस्कर यांचा इनामदार यांच्या सांगण्यावर विश्‍वास बसेना.  एका तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला थेट समाजकल्याण खात्याच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल होत. मनमाड मुंबई पसेंजर ट्रेननेबाबुराव भारस्कर मुंबईला पोहचले.

त्यांच्या आमदार निवासातील खोलीत फोनची घंटी वाजली. मुख्यमंत्री वसंतराव नाईक फोनवर होते.

“उद्या सकाळी साडेदहा वाजता राजभवनवर शपथविधीसाठी उपस्थित राहा”

बाबुराव भारस्कर येताना एक कापडी पिशवी आणि एक लाकडी दांड्याची छत्री एवढच सामान घेऊन आले होते. अंगात चांगला ड्रेसदेखील नव्हता. अखेर शिवाजीराव जंगले यांनी दिलेला ड्रेस घालून बाबुराव शपथविधीला गेले.

दुस-या दिवशी अन्न आणि नागरी पुरवठामंत्र्यांबरोबर भारस्कर यांचाही कॅबिनेटमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.

पुढे बंगल्याचे वाटप झाले आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बाबुरावांना थेट ‘सहय़ाद्री’ हा त्या काळचा आलिशान बंगला दिला.

सहयाद्री म्हणजे खरंतर एकेकाळचा मुख्यमंत्र्यांचा बंगला.

मलबार हिल वरील या ब्रिटीशकालीन बंगल्यात मोरारजी देसाई यांच्या पासून ते यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार अशा दिग्गज नेत्यांनी वास्तव्य केलेलं होत. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी आपला वर्षा या बंगल्याला मुख्यमंत्री निवास बनवलं होत.

पण सह्याद्री हा वर्षापेक्षा कितीतर पट अधिक अलिशान होता.

भव्य दालने, त्याच्या मागील सौन्धावर उभ राहिलं तर रात्री मुंबईचा मरीन ड्राईव्ह एकाद्या नेकलेस सारखा चमचमतो. समाजकल्याण मंत्री बाबुराव भारस्कर आपली कापडी पिशवी आणि छत्री एवढ सामान घेऊन या बंगल्यात राहायला आले. पण दीड खणाच्या घरात राहण्याची सवय असलेल्या बाबूरावांना या राजमहालात झोपच लागली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी बाबुरावांनी थेट मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला गाठला आणि

‘एवढा मोठा बंगला आपल्याला झेपणार नाही. छोटे घर द्या,’ अशी विनंती  केली.

त्यावर वसंतराव हसले, त्यांनी बाबुरावांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पण बाबुराव ऐकण्यासाठी तयार नव्हते. अखेर त्यांच्या हट्टापुढे मुख्यमंत्र्यांना माघार घ्यावी लागली.

वसंतराव नाईकांनी बाबुराव भारस्कर यांना मंत्रालयासमोरील छोटा बंगला दिला.

आजकाल आपण आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत चाललेली शासकीय निवासस्थानासाठी चाललेली मारामारी पाहतो. कार्यकाल संपला तरी आपले घर न सोडणारे महाभाग सुद्धा आपण पाहिले आहेत. आपल्या नेत्यांच्या घरासाठी भांडणारे कार्यकर्ते सुद्धा आपण रोज पाहतो, पेपरात वाचतो,

पण मंत्रीपदी असून अलिशान बंगला सोडून छोट्या घरात राहायला जाणारा बाबुराव भारस्कर यांच्या सारखा अवलिया विरळाच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.