बाबुराव पेंटर यांच्या चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीत ‘सेन्सॉरशिप’ला सुरुवात झाली…!!!

चित्रपटांच्या संदर्भात ‘सेन्सॉरशिप’ हे प्रकरण काही आपल्याला आता नवीन राहिलेलं नाही. दर २-३ महिन्याला कुठला तरी नवीन चित्रपट आणि त्यावरील सेन्सॉरशिप यांमुळे आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच सेन्सॉरशिप म्हणजे नेमकं काय याची कल्पना आहेच. पण भारतीय चित्रपटसृष्टीत सेन्सॉरशिपची सुरुवात नेमकी कधी नि कशी झाली याविषयीची माहिती खूप कमी जनांना असेल.

तर आजचा किस्सा चित्रपटसृष्टीतील सेन्सॉरशिप प्रकरणाच्या जन्मकथेचा.

भारतीय चित्रपटसृष्टीत सेन्सॉरशिपची सुरुवात झाली ती कोल्हापूरच्या विख्यात शिल्पकार, चित्रकार कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटापासून.

बाबुराव मेस्त्री अर्थात बाबुराव पेंटर यांचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात फार महत्वाचं स्थान आहे. १९२० साली त्यांनी स्त्री-पात्रे आपल्या सिनेमामध्ये दाखवण्याचं धाडस दाखवलं होत. १९२० साली पुण्यातील ‘आर्यन थीएटर’ मध्ये सैरंध्री दाखवण्यात आला. या चित्रपटात ‘भीम’ आणि ‘कीचक’ यांच्यामधील युद्धाच्या एका दृश्याचे चित्रण करण्यात आले होते.

युद्धप्रसंगाचे हे दृश्य इतके परिणामकारक झाले होते की ते बघून थिएटर मध्ये चित्रपट बघायला आलेल्या काही प्रेक्षकांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. विशेष म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानाच्या सहाय्याशिवाय बाबुराव पेंटर यांनी अशा प्रकारचे दृश्य चित्रित केले  होते. या दृष्यावरूनच ब्रिटीश सरकारने भारतात सेन्सॉरशिपची सुरुवात केली.

या चित्रपटावरच्या इंग्रज सरकारच्या रागाचे आणखी एक कारण होते. सैरंध्री हा सिनेमा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या सुप्रसिद्ध ‘कीचकवध’ या नाटकावर आधारलेला होता .

कीचकवधाच्या कथेमधून खाडिलकरांनी तेव्हाचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनच्या जुलूमावर टीका केली होती आणि तरुणांना कर्झनच किचकप्रमाणे वध करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. किचक म्हणजे लॉर्ड कर्झन आणि द्रौपदी म्हणजे भारतमाता हे रूपक टिळकांच्या सांगण्यावरून वापरलेले होते असे म्हणतात. ही गोष्ट कळल्यावर ब्रिटीश सरकारने त्या नाटकाला बंदी घातली.

बाबुराव पेंटर यांनाही किचकवधाचे दृश्य चित्रपटातून हटवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सेन्सॉरमुळे काटछाट करण्यात आलेला सैरंध्री हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट ठरला, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

Baburao Painter Biography in Hindi
याच चित्रपटाची कृपा म्हणून मुंबई, मद्रास, कलकत्ता आणि रंगून या शहरात सेन्सॉरबोर्ड स्थापन करण्यात आले. इथून पुढे येणारे सिनेमे या सेन्सॉरबोर्डाच्या कात्री खालूनच जाऊ लागले.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील एक अतिशय महत्वाचं नांव म्हणजे बाबुराव पेंटर हे होय. त्यांचं मूळ नांव बाबुराव मेस्त्री असं होतं, परंतु घरात असलेल्या रंगकामाच्या परंपरेमुळे त्यांना पेंटर हे नांव पडलं.

लहानपणापासूनच त्यांना व त्यांच्या बंधूना आनंदराव पेंटर यांना सिनेमाविषयी आकर्षण होतं. सुरुवातीचा काही काळ दादासाहेब फाळके यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं.

पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९१८ साली बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातूनच निर्मिती केलेला ‘सावकारी पाश’ हा मूकपट भारतीय चित्रपट इतिहासात एक मैलाचा दगड मानला जातो.

महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांची फळी देखील बाबुराव पेंटर यांच्या मार्गदर्शनात कोल्हापुरात तयार झाली. व्ही. शांताराम ,बाबुराव पेंढारकर, फत्तेलाल, दामले , मास्टर विनायक अशा अनेक कलाकारांचा समावेश होतो.

बाबुरावांनी बनवलेल्या ‘सिंहगड’ हा चित्रपट बघण्यासाठी  लोकांची प्रचंड गर्दी उसळली. या चित्रपटात पहिल्यांदाच आउटडोर शुटींग करण्यात आलं होत.
पन्हाळ्यावर सिंहगडावरच्या लढाईचा सेट लावून चित्रिकरणासाठी रात्री दिव्यांचा प्रकाशझोत उभा करण्यात आला होता. बाबुराव पेंटरानी चित्रपट बनवताना आपल्या कलात्मक दृष्टीत आड येईल अशी कोणतीही तडजोड केली नाही.

याच पिक्चरच्या प्रमोशनसाठी बाबुराव पेंटरनी १० बाय २० फुट एवढे प्रचंड पोस्टर स्वतः रंगवले. भारतीय सिनेमामध्ये पोस्टरची परंपरा सिंहगड या सिनेमाने घातली. आणखी एका गोष्टीची सुरवात या सिनेमा मुळे झाली ती म्हणजे करमणूक कर. या सिनेमाच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी इंग्रज सरकारने करमणूक कर घेण्यास सुरवात केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.