साईबाबांमुळे निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेबांनी आपले सिंहासन सोडले होते.
मध्यंतरी साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी की शिर्डी यावरून वाद निर्माण झाला होता जेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साईबाबांच्या जन्मस्थळ असणाऱ्या पाथरीस निधी देण्याची घोषणा केल्यानंतर हा वाद उफाळून आला. शिर्डीच्या नागरिकांनी यावर तिव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचं आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. आत्ताही बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचं “साईबाबा देव नाहीत” या वादग्रस्त वक्तव्यामुळे साईभक्तांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय.
असाच एका वादाचा सामना खुद्द बाळासाहेबांना देखील करावा लागला होता व त्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी आपले चांदिचे सिंहासनाचा देखील त्याग केला होता.
किस्सा असा आहे की,
शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन करण्याचा प्रस्ताव साईबाबांच्या भक्तांकडून मांडण्यात आला होता. साईबाबांना सोन्याचे सिंहासन करण्याबद्दल भक्तांच्या प्रामाणिक भावना होत्या. हा विषय राज्यपातळीवर चर्चेला आला आणि समर्थनात आणि विरोधात अनेकांची मते येवू लागले. याच विषयात बाळासाहेबांनी देखील आपलं मत मांडलं.
बाळासाहेबांच मत होतं की,
“साईबाबा देवस्थानच्या माध्यमातून जो पैसा जमा होत आहे तो लोककल्याणासाठी वापरायला हवा. साईबाबांनी आपले संपुर्ण आयुष्य फकिराप्रमाणे जगलं आहे. त्यांनी लोककल्याण्यासाठी आयुष्य समर्पीत केलं म्हणूनच त्यांना देवत्त्व प्राप्त झालं.”
इतक्यावरच न थांबत बाळासाहेबांनी सामनामधून साईबाबांना सोन्याचे सिंहासन कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला.
यावर लोकमत वर्तमानपत्राने बाळासाहेबांची भूमिका मांडलीच पण त्याच सोबत दूसरी बाजू म्हणून खुद्द बाळासाहेबांनी २००२ साली शिर्डीतल्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांनी दिलेलं चांदिच सिंहासन भेट म्हणून घेतल्याचं सांगितल होतं. त्याच सोबत तुमच्या चांदिच्या सिंहासनाचे काय करायचे असा थेट प्रश्न देखील बाळासाहेबांना विचारण्यात आला होता.
लोकमतच्या या भूमिकेने तेव्हा सर्वजण हादरले होते. आत्ता बाळासाहेबांची वेळ होती. या विषयाला बाळासाहेब काय उत्तर देतात याची उत्सुकता होती. बाळासाहेबांनी देखील खास ठाकरे शैलीत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.
बाळासाहेबांनी लोकमतचे संपादक दिनकर रायकर यांना फोन करुन सांगितलं की,
“शिर्डीच्या महाशिबिरात शिवसैनिकांनी जे चांदीचे सिंहासन दिले ते चांदिच नाही. त्यावर फक्त चांदिचा पत्रा आहे. आतून ते लाकडाचच आहे. हा पत्रा देखील वारंवार निघतो म्हणून त्यावर आच्छादन घालून मी बसतो. माझ्या गोरगरिब शिवसैनिकांनी प्रेमाने दिलेली भेट आहे म्हणून मी त्यावर बसतो पण शिर्डीतल्या कोट्यावधी रुपये खर्च करुन केल्या जाणाऱ्या सोन्याच्या सिंहासनाला रोखण्यासाठी मी विचार मांडत असताना माझे चांदिचे सिंहासन आडवे येत असेल तर ते तुमच्या ऑफिसवर पाठवून देतो, त्यावर शिपाई बसला तरी चालेल ”.
बाळासाहेब आपल्या शब्दांना पक्के जागणारे नेते होते. त्यांनी लोकमतच्या चिंचपोकळीच्या ऑफिसवर हे चांदिचे सिंहासन पाठवून दिले आणि खळबळ झाली. संपुर्ण माध्यमातून बाळासाहेबांच्या कृतीची चर्चा होती.
आत्ता झालेल्या घटनेवर पडदा टाकून बाळासाहेबांना सिंहासन परत करण्याचा निर्णय लोकमत समुहाकडून घेण्यात आला. लोकमत समुहाचे अध्यक्ष व मुख्यसंपादक विनय दर्डा, संचालक करण दर्डा आणि संपादक दिनकर रायकर यांनी सन्मानपुर्वक मातोश्रीवर जावून हे सिंहासन बाळासाहेबांच्या स्वाधीन केलं. त्यानंतरच या वादावर पडदा पडलं.
हे ही वाच भिडू.
- बाळासाहेब ठाकरेंवर झालेले दोन जीवघेणे हल्ले…
- कोण होते साईबाबा ?
- साईबाबा हेच नानासाहेब पेशवे होते, या अफवेमागे ही कारणे आहेत.